नाना कला आणि विद्यांचा वापर समाजसेवेसाठी करत, जनसेवा करणार्या डॉ. नरेंद्र कदम यांच्याविषयी...
डॉक्टर म्हटले की त्याबरोबर गांभीर्य हे आलेच. सातत्याने कोणत्याही समस्येसाठी तत्पर राहून समाजसेवा करणारे देवदूतच ते! त्यामुळे त्यांचे आयुष्यही तसे कणखरच. अशा आयुष्यात कला जपायला संधी कशी मिळणार? असा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविकच. पण, आजचा काळ वेगळा आहे. त्यानुसार आजचे डॉक्टरही वेगळेच! डॉ. नरेंद्र कदम हे त्यापैकीच एक. नरेंद्र यांचा जन्म कल्याणचा. मात्र, नरेंद्र यांचे बालपण ते तारुण्य हा सगळा कालखंड गेला तो मुंबईच्या चाळींमध्येच. आईवडील, मोठी बहीण आणि लहान भाऊ असे नरेंद्र यांचे कुटुंब. वडील डॉक्टर असल्याने मुलांनीही डॉक्टर व्हावे, अशी त्यांची स्वाभाविक इच्छा होती. नरेंद्र यांच्या मोठ्या बहिणीने वडिलांची इच्छा पूर्ण केली.
मात्र, नरेंद्र यांना अभियांत्रिकी करण्याची इच्छा होती. त्यामुळे बारावीपर्यंत विज्ञान शाखेमध्ये विल्सन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. दरम्यान एकेदिवशी वडिलांनी नरेंद्र यांच्याकडे ‘तू वैद्यकीय शिक्षण घ्यावेस,’ असा मनोदय व्यक्त केला. वडिलांच्या आज्ञेवरून नरेंद्र यांनी ‘एमबीबीएस’साठी प्रवेश घेण्याचे निश्चितही केले. मात्र, गुण कमी असल्याने त्यांना सायनच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यानंतर नरेंद्र यांचा आयुर्वेदाचा अभ्यास सुरू झाला.
महाविद्यालयात असतानाच नरेंद्र यांनी अभ्यासाबरोबरच कलेच्या जोपासनेकडे लक्ष दिले. महाविद्यालयात वर्षातून एकदा वार्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी नाट्य, संगीत अशा अनेक कलांचे सादरीकरण केले. त्यामुळे सभाधीटपणादेखील नरेंद्र यांच्यात आलाच. तसेच, कलेच्या व्यासंगामुळे अभ्यासामध्येही मन लागले. पुढे आयुर्वेदाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर स्वतंत्र सराव करण्यासाठी नरेंद्र यांनी बरीच खटपट केली. मुंबईमध्ये त्याकाळीही जागांच्या चढ्या भावामुळे त्यांना खूपच शोधकाम करावे लागले. मात्र, एवढी मेहनत घेऊनही उपयोग काहीच झाला नाही. दरम्यान, नरेंद्र यांना माथाडी कामगार रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदाची नोकरी मिळाली. आजतागायत नरेंद्र त्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
1994 साली स्थापन झालेल्या ‘वैष्णवदेवी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून दरवर्षी आषाढीची वारी नरेंद्र करतात. 1996 साली वडिलांनी नरेंद्र यांना या ट्रस्टची ओळख करून देताना, यामध्ये सेवा देण्याचे सांगितले होते. त्यानुसार, आजतागायत नरेंद्र या ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. वारीविषयी बोलताना नरेंद्र सांगतात की, अध्यात्माची ऊर्जा नेमकी काय असते? हे अनुभवण्याची सुवर्णसंधी म्हणजे वारी होय. दरवर्षी न चुकता वारीमध्ये सेवा देताना दिवसभर येणार्या वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य आम्ही दिवसरात्र करत असतो. पण, दिवसभर मेहनत घेऊनही आम्हांला जराही थकवा जाणवत नाही. टाळ-मृदुंगाच्या संगतीने कानावर पडणार्या विठ्ठलनामाच्या गजराचा हा महिमा आहे. “वारीतील हे मंतरलेले दिवस वर्षभराची ऊर्जा देऊन जातात,” असेही नरेंद्र नमूद करतात. त्यामुळेच जेव्हा ‘कोविड’ काळामध्ये वारी झाली नाही, तेव्हा त्यांनी ‘डिजिटल वारी’ ही संकल्पना सवंगड्यांच्या संगतीने राबवली. नरेंद्र सांगतात की, “लोकांच्या मनामध्ये वारीविषयी जसा श्रद्धाभाव आहे, तसेच अनेक गैरसमजही आहेत.” त्यामुळेच हे गैरसमज दूर करण्यासाठी नरेंद्र यांनी ‘वारी जनातली, जनांच्या मनातली’ हे एक पुस्तकच लिहिले आहे.
नरेंद्र यांना स्वतः गाडी चालवत प्रवास करण्याची प्रचंड आवड आहे. आजवर त्यांनी स्वतः गाडी चालवत जवळपास 85 टक्के भारताची यात्रा केली आहे. जेव्हा देशात ‘कलम 370’ रद्द करण्यात आले होते, त्याचवेळी लडाख भागामध्ये नरेंद्र गाडी घेऊन गेले होते. जवळपास 16 दिवसांच्या या प्रवासाचे वर्णनही त्यांनी शब्दरूपाने मांडले आहे. या प्रवासादरम्यान आलेले असंख्य अनुभव ‘सिक्स्टीन डेज ऑन व्हील’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केले आहेत.
वाचनाची लहानपणापासून सवय असल्याने नरेंद्र यांच्यातील लेखक अप्रत्यक्षरित्या आकार घेत गेला. लहानपणापासूनच सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय असलेल्या नरेंद्र यांनी मुंबईतील चाळसंस्कृतीचा वारसादेखील अनुभवला आहे. वयाची 25 वर्षे ही संस्कृती नरेंद्र जगले. त्यामुळे त्यातील प्रत्येक अनुभव त्यांचा स्वतःचा आहे. हेच अनुभव त्यांनी ‘चाळवाचळव’ या पुस्तकामध्ये मांडताना मुंबईच्या चाळसंस्कृतीचे विशेष वाचकांसमोर ठेवले आहेत. एक कादंबरी आणि एक कथासंग्रह वाचकांच्या सेवेत लवकरच येणार असल्याचेही नरेंद्र सांगतात.
तसेच, मुलांना अभ्यास करण्यास सांगताना आपणही प्रत्यक्षात केला पाहिजे, असे ठरवून त्यांनी वयाची 40 ते 50 वर्षे ‘एमबीए’, वकिलीचे शिक्षण अशा विविध पदव्याही घेतल्या. तसेच नरेंद्र आणि त्यांचे सहकारी डॉक्टर मिळून संगीताचा एक कार्यक्रम ही करतात. यातून येणार सर्व पैसा वादकांचे मानधन वगळून ते समाजसेवेसाठीच खर्च करतात. अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या या उपक्रमाला प्रसिद्ध केले आहे. नरेंद्र यांच्या या सर्व कार्याला त्यांच्या पत्नींचीही उत्तम साथ लाभली आहे.
त्यांच्या पत्नीही त्यांच्याप्रमाणेच सतत नव्याने शिकण्यास उत्सुक असतात. वयाच्या 50व्या वर्षी आतून आलेल्या उर्मिला न्याय देत चित्रकलेचा सराव सुरू केला. “आज त्या कोणीही न शिकवता हुबेहुब चित्र काढतात,” असे नरेंद्र सांगतात. ‘वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून दरवर्षी एक अंक प्रसिद्ध करण्यात येतो. सध्या त्याचे संपादन नरेंद्र यांच्याकडेच आहे. संपादनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र यांनी त्या अंकाचा चेहरामोहराच बदलून टाकला. पूर्वी अहवाल स्वरूपात येणारा हा अंक गेली दोन वर्षे मात्र ‘आरोग्य’ आणि ‘संतसाहित्य’ अशा विषयांवर प्रसिद्ध होतो. संतसाहित्य समाजापर्यंत पोहोचवणे हीच काळाची गरज असल्याचेही नरेंद्र सांगतात. अनेक कला आणि विविध क्षेत्रांचे ज्ञान असणार्या डॉ. नरेंद्र यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!