ज्ञानदानाचे व्रत हाती घेऊन, दिव्यांगांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी स्वतःच्या अधुपणावर मात करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बाळासाहेब सोनवणे यांच्याविषयी...
उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि वक्ते असलेल्या बाळासाहेब सोनवणे यांचा लोकसंपर्कही दांडगा. दिव्यांग आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ खर्ची घालणारे बाळासाहेब सोनवणे. अभ्यासू आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते संपूर्ण नाशिक जिल्ह्याला परिचित. निफाड तालुक्यातील मांजरगाव हे बाळासाहेबांचे मूळ गाव. पण, त्यांचा सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात दि. 20 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईत जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि पाच भावंडांमध्ये सर्वांत मोठे असलेल्या बाळासाहेबांना लहानपणापासूनच लागलेली काटकसरीची सवय आजतागायत कायम आहे. अगदी पाच महिन्यांचे असतानाच पोलिओ झाल्याने त्यांचा डावा हात कायमचा अधू झाला. परंतु, याचे शल्य त्यांना कधीच वाटले नाही आणि अजूनही वाटत नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण मांजरगावच्या जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण मविप्र संस्थेच्या आरूढ विद्यालय, म्हाळसाकोरे येथे झाले. कळत्या वयापासूनच ज्ञानदानाचे क्षेत्र निवडावे, असे स्वप्न मनी बाळगत बाळासाहेबांनी दहावीनंतर नांदगावच्या शासकीय अध्यापक विद्यालयातून 1994 साली ‘डी.एड.’ पूर्ण केले. लगेचच एकलहरे येथील ‘क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थे’त शिक्षक म्हणून ते रुजूही झाले. त्यानंतर जुलै 1995 साली ‘ज्ञानसाधना शिक्षण संस्थे’त रुजू झालेल्या बाळासाहेबांनी 30 वर्षांपासून सुरू केलेले ज्ञानदानाचे व्रत अजूनही सुरू असून संस्थेसोबत कायमचे ऋणानुबंध जुळले. एका हाताने अधू असले, तरी बाळासाहेबांनी त्याचा कधीच बाऊ केला नाही. शाळेत खेळांचा मनमुराद आनंद उपभोगला. मांजरगाव शाळेच्या क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून धुरा सांभाळत अनेक संघांना धूळ चारल्याचे बाळासाहेब अभिमानाने सांगतात. एकीकडे ज्ञानदानाचे व्रत सुरू असताना, दुसरीकडे उच्चशिक्षण घेण्याचे मनात आल्यानंतर बाळासाहेबांनी 2001 साली मराठी विषयात कला शाखेची पदवी मिळवली, तर 2006 मध्ये मुक्त विद्यापीठातून ‘बी.एड.’ आणि 2008 मध्ये शालेय व्यवस्थापन पदविका प्राप्त केली. स्वतः दिव्यांग असल्याने दिव्यांगांची व्यथा माहीत असल्याने ती सोडविण्यासाठी मागील तीन दशकांपासून ‘महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटने’चे राज्य अध्यक्ष दिगंबर घाडगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते सतत प्रयत्नशील आहेत. तसेच शिक्षक-शिक्षकेतरांच्या मागण्यांसाठी आंदोलने आणि मोर्चामध्ये अजूनही अग्रभागी असतात. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक वेळा लढे दिले आहेत. त्यातील शिर्डी संस्थानातील 48 दिव्यांग कर्मचार्यांना कायम करावे, या मागणीसाठी संघटनेने आंदोलन करत त्या कर्मचार्यांच्या आयुष्याचं सोने केलं. तसेच सर्वच शासकीय निमशासकीय विभाग, शाळा, महाविद्यालय, सहकार, औद्योगिक वसाहती या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग शिक्षक व कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेकदा आंदोलनात भाग घेत न्याय मिळवून देण्याचे काम केले. सर्वच आस्थापनांमध्ये दिव्यांगांच्या भरती व पदोन्नतीचा अनुशेष भरला जावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतात. स्वतः संबंधित विभागांमध्ये जाऊन अधिकार्यांची भेट घेत दिव्यांगांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम ते तळमळीने करत असतात. दिव्यांग बेरोजगारांना व्यवसाय, निवृत्तिवेतनासोबतच केंद्र व राज्य शासनाकडून मिळणार्या सोयी-सवलतींबाबतही ते सतत मार्गदर्शन करत असतात. जिल्हा परिषद, आदिवासी विकास भवन, महापालिका येथे दिव्यांग कर्मचार्यांचा चार टक्के अनुशेषअंतर्गत पदोन्नती मिळवून देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. दिव्यांगांबरोबरच इतरांचेही विवाह जुळवत अनेकांचे संसार फुलवण्याचे पुण्य बाळासाहेबांच्या मस्तकी लागले. सध्या बाळासाहेब महिरावणी येथील मातोश्री गी. दे. पाटील माध्यमिक विद्यालयात दिव्यांग उपशिक्षक म्हणून मराठी विषय शिकवतात. यासोबतच, चित्रकला, क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत मार्गदर्शन करतात. त्यामुळेच बाळासाहेबांनी राबविलेल्या अनेक उपक्रमांची आणि दिव्यांगांसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल अनेक सेवाभावी संघटनांनी घेत आतापर्यंत 75 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित केल्याचे ते अभिमानाने सांगतात. ‘महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटने’च्या स्थापनेपासून आजीव सदस्य असलेले बाळासाहेब नाशिक विभागीय अध्यक्ष आणि राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच तामिळनाडूच्या रामेश्वरम् येथील ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन’च्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी कार्यरत आहेत. या फाऊंडेशनच्या माध्यमातून दीड वर्षांपूर्वी क्रितिका खांडबहाले व ऋतुजा काशीद या बालवैज्ञानिकांनी बनविलेले हायब्रीड रॉकेट चेन्नईजवळील पट्टीपलम् येथून फेब्रुवारी 2024 मध्ये अवकाशात यशस्वीरित्या सोडत जागतिक विक्रमाला गवसणी घालत शाळा, संस्था, गाव व जिल्ह्याचाही नावलौकिक वाढविला. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला पुढील आयुष्य आणि समाजसेवेसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
विराम गांगुर्डे
9404687608