समाजातील वंचित, शोषित आणि गरजूंना सर्वोपरि मदतीचा हात देणार्या पुण्यातील ‘पतित पावन’ संघटनेचे स्वप्नील अरुण नाईक यांच्या समाजकार्याविषयी...
अगदी शालेय जीवनापासूनच समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन अनुभवाला आलेल्या काही प्रसंगांमुळे बदलत गेला आणि आपले आयुष्य समाजातील प्रत्येक वंचित, शोषित आणि गरजूंसाठी समर्पित करण्याचा निर्धार केला, असे सांगणार्या स्वप्नील अरुण नाईक यांच्या कार्याचा आलेख हा इतरांना प्रेरक असा तर आहेच. मात्र, अनेकांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणणारा आहे.
दि. 6 फेब्रुवारी 1986 रोजी जन्म झालेल्या स्वप्नील यांचे बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने परिश्रमातून मिळवून उदरनिर्वाह सुरू झाला. त्यात सभोवतालचे अर्थात पुण्याच्या पूर्व भागात गुरुवार पेठमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग ते कॅम्पपर्यंत सगळा भाग हातावरचे पोट भरणारा कामगार वर्ग, त्यांच्या रोजच्या येणार्या अडचणी, पीडितांवर होणारे अन्याय अनुभवता आल्याने त्यांना संघर्षाचे बळ मिळाले.
मात्र, संपूर्ण विश्वात विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून विख्यात असलेले, ज्या धरतीवर माँ जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला, त्या पुण्यभूमीत स्वतःला हिंदुत्वाचे सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आणि अभिमान स्वप्नील यांना अधिक आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले अशा असंख्य समाजपुरुषांचा थेट संबंध ज्या शहराशी आला, त्या शहरात राहून अंधश्रद्धा व कर्मकांडांवरच हिंदुत्व नाही, तर अस्तित्वाच्या वास्तविक हिंदुत्वावर कार्य करण्याचा निश्चय त्यांनी केला. दहावीची बोर्डाची परीक्षा चालू असताना स्वप्नील राहत असलेल्या वस्तीत दंगल उसळली. त्याच्या आठवणीत रमताना त्यांनी दि. 9 मार्च 2001 रोजी दहावीचा भूगोलाचा पेपर होता आणि त्याच दिवशी आमच्या घराजवळच संचारबंदी लागल्याचे सांगितले. त्यावेळेस टेन्शन आले दहावी उत्तीर्ण होणार की अनुत्तीर्ण? परीक्षेला कसे जायचे, अभ्यास कसा करायचा? मात्र, यातूनही मार्ग निघाला. घरात आजोबा कै. किसनराव नाईक गणेश मंडळाचे आणि गल्लीत होणार्या उरुसाचे सगळे पुढाकार घेऊन करायचे. ज्यावेळी दंगल झाली, त्यावेळी हिंदुत्वाला पोषक असे वातावरण काहीच नव्हते. कारण, लहानपणी जेव्हा चंद्रशेखर शाखेत जायचे ती शाखा लावण्यालादेखील स्थानिकांचा कडाडून विरोध व्हायचा. अशावेळी या दीनदुबळ्या समाजासाठी काम करणार्या संघटनेत जाण्याचा स्वप्नील नाईक यांनी निर्धार केला.
ते ‘पतित पावन’चे संघटनेत सामील झालेत. त्याच चार-पाच वर्षांमध्ये रोजच होणारी भांडणे हिंदूंची होणारी अवहेलना हे पाहून मन सुन्न व्हायचे. अशावेळी पेठेमध्ये हिंदू तरुण मंडळात बबनरावजी पांडे यांनी ‘पतित पावन’मध्ये जाण्याचे सूचवले आणि त्यानंतर मग समाजकार्यात झोकून दिल्याचे ते सांगतात. 2006 साली पर्वतीच्या शाहू महाविद्यालयामध्ये असताना महाविद्यालयातच ‘पतित पावन’ची महाविद्यालयीन शाखा करायची असे ठरविले आणि संघटनेचा झेंडा हाती घेतला. ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी ‘पतित पावन’ संस्था प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणून परिचित आहे. समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा ही आज संघटनेमुळेच असल्याचे ते आवर्जून नमूद करतात. आपण या समाजाला काहीतरी देणे लागतो, हा ध्यास मनी बाळगून संघटनेमध्ये कार्यरत झाल्याची त्यांची प्रामाणिक भावना आहे.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, वस्ती भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी होणार्या संघर्षाच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम संघटनेमार्फत त्यांनी केले. पुण्यातील नामांकित स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन, बीएमसीसी, मराठवाडा, मॉर्डन, गरवारे, जेधे अशा सर्व महाविद्यालयांमध्ये शाखा उद्घाटन करून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे, पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींचे विरोधात आंदोलन करणे, महाविद्यालयामधल्या तरुणींना स्थानिक रोमिओ यांच्याकडून होणारा त्रास त्याच्याविरोधात आवाज उठवणे आणि जेथे शक्य होते, तेथे अशा रोमिओंना त्यांनी तिथे धडा पण शिकवला. ‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्य संस्कृती अमान्य होती, लेडीज बार चालू झाले आणि ते बंद करून तरुणींचा व स्त्रियांचा अपव्यवहार थांबवा यासाठी संघर्ष केला. त्यांनी आंदोलनात स्वतःला एवढे झोकून दिले की, स्वतःला मुलगा झाला ही वार्ता कळली, तेव्हा आधी इतरांच्या न्यायासाठी संघर्ष आणि नंतर घर, असा पण त्यांनी केला होता. ‘पतित पावन संघटने’त संपर्क प्रमुखांची जबाबदारी मिळाल्यावर पुण्याचे वैभव असलेल्या गणेशोत्सवातील गणेश मंडळांना हा उत्सव साजरा करण्यासाठी ज्या अडचणींना सामोरे जावे लागायचे, त्यासाठी ‘पतित पावन’ने जाहीरनामा तयार करण्याचे काम त्यांनी केले.
आपल्या शहराला पुणे हे नाव ज्या पुण्येश्वरामुळे पडले, त्या पुण्येश्वराची महाशिवरात्र सर्वांच्या उपस्थितीत रस्त्यावर साजरी केली आणि पुण्येश्वराचे मंदिर हे लवकरात लवकर पुणेकरांना दर्शनासाठी मुक्त व्हावे, असा पणदेखील त्यांनी केला आहे. पूर्ण महाराष्ट्रात हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात, महिलांवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात पुण्यामध्ये ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे नियोजन करण्यात आले होते. क्रांतीच्या विचाराची ज्योत तेवत ठेवीत, कायमस्वरूपी पुणे शहराच्या अस्मिता जपण्यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध राहणार असल्याचा त्यांचा निर्धार आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात होणार्या अडचणी, रुग्णालयात रुग्णाचे होणारे वाढीव बिल, सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, अशा अनेक कार्यांत त्यांचा सहभाग असतो. आता पुणे शहरातील निराधार महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणे, त्यांच्या अपत्यांना मुलांना महाराष्ट्र शासनाकडून सर्व उपाययोजना लागू करून देणे, यासाठी ते आग्रही आहेत. त्यांच्या या इतरांच्या आयुष्यात समाधान आणण्याच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
- अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्कः 8793356366)