‘भगवंतांच्या कीर्तीचे गायन म्हणजे कीर्तन’ असे सांगणार्या कॉर्पोर्रेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांच्याविषयी...
कीर्तन परंपरा अतिशय प्राचीन! सहसा या गोष्टीचा अध्यात्माशी मूळ संबंध असला, तरी कालानुरूप तो समाजपरिवर्तन आणि ‘कॉर्पोरेट कीर्तन’ अशी सुखद मात्र प्रेरकयात्रा करीत, ‘कीर्तन’ हा प्रकार आजच्या पिढीशीदेखील जोडलेला दिसतो. समाजमाध्यमांमुळे कीर्तने आता युट्यूब आणि अन्यप्रकारेही अगदी सहज ऐकता येतात. तशी ही परंपरा खूप जुनी. पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या नगरीत तर ती अधिकाधिक फुलली आणि विस्तारलीदेखील. आफळे बुवा असोत की भिडे, औरंगाबादकर अथवा बडवे असोत यांनी ही परंपरा अखंड जोपासली.
याच परंपरेतील औरंगाबादकर यांच्या नवव्या पिढीतील तरुण कीर्तनकार पुष्कर यांची अदाच निराळी! आज विख्यात असलेल्या या तरुणाने अध्यात्माशी सांगड घालून आजच्या धकाधकीच्या जीवनात, कधी कधी किंवा बहुतांश वेळा निराशेत असलेल्या आपल्याच समवयस्क आणि थोरांनादेखील ‘कार्पोरेट कीर्तना’च्या माध्यमातून आनंदाच्या समाधानाच्या एका वेगळ्या दुनियेत नेले आहे.
पुण्यातच बालपण आणि शिक्षण घेतलेल्या पुष्कर यांच्यावर कीर्तनकार असलेल्या आजोबांच्या कलेचा आणि मधुरवाणीचा प्रभाव पडला. तेथेच हार्मोनियमचे शिक्षण घेत त्यांनी कीर्तनातील सर्व बारकावे हेरून ठेवले. अर्थात, कालानुरूप शिक्षणासाठी त्यांनी आधुनिक जगात प्रवेश केला. कोलकाता येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मधून ‘एमबीए’देखील केले, त्यानंतर नोकरीही केली. मात्र, त्यांचे मन रमेना. त्यांना आजोबांच्या कीर्तनातील उपदेशांची साद स्वस्थ बसू देईना. मग काय याचाच अतिशय स्तुत्य असा उपयोग त्यांनी आपल्या उद्बोधक शैलीतून आजच्या तरुणाईसाठी केला आणि ‘कार्पोरेट कीर्तनकार’ म्हणून पुष्कर जगविख्यात झाले.
संत रामदासांचे श्लोक व संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘खळांची व्यंकटी’ यांचा उत्तम मेळ ते आपल्या शैलीतून आजच्या तणावग्रस्त पिढीला पटवून देतात आणि त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलवितात.आजच्या ‘टेनोसॅव्ही’ जगातील मेंदूसभोवती घिरट्या घालणारे नेहमीचे शब्द म्हणजे ‘मेटाफोर्स’, ‘आईसब्रेकर’, ‘एनर्जायजर’, ‘केसस्टडी’ यांचा अनुक्रमे दृष्टांत, नमन, भजन अथवा नामस्मरण आणि उत्तररंग यांच्याशी असलेला नेमका संबंध ते उकल करून सांगतात; तेव्हा ही तरुणाईदेखील थक्क होते. आजकाल कार्पोरेट जगतात कामाच्या व्यापातून मनःशांतीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. प्रशिक्षण, खेळ किंवा अन्य ‘अॅटीव्हिटीज’ आयोजित केल्या जातात, जेणेकरून सर्वांना नेहमीच्या कामातून दिलासा मिळतानाच कामाच्या स्वरूपात कसे बदल करायचे, हेदेखील उमजते. तथापि, हे सर्व कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना पटवून द्यावे, ही कल्पनाच विकसित करण्यात पुष्कर यांनी पुढाकार घेतला आणि आज ते सर्वांचे आवडते कीर्तनकार ठरले आहेत.
थोर, महान संतांनी लिहिलेली कीर्तने, श्लोक, अभंग आजच्या आधुनिक काळातही तितकेच लागू पडतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मनाचे नियोजन करण्यासाठी कीर्तने, श्लोक कशाप्रकारे आपल्या जीवनात, आचरणात आणता येईल, यासाठी उच्चशिक्षित युवक ‘कॉर्पोरेट कीर्तन’ या स्वरूपात पुष्कर मार्गदर्शन करीत आहेत.
पुण्यातील नऊ पिढ्यांची कीर्तनपरंपरा असलेल्या औरंगाबादकर घराण्यातील पुष्कर यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांपर्यंत कसे पोहोचावे, कॉर्पोरेट आयुष्यात येणार्या समस्यांना कसे तोंड द्यायचे, कामातून निर्माण होणार्या ताणतणावातून कसे मुक्त व्हायचे, यश-अपयश आणि आनंदाची सांगड कशी घालायची, आपल्या कामातील कार्यकारणभाव कसा ओळखायचा, याबाबत ते कंपन्यांमधील कर्मचार्यांना बहुमोल मार्गदर्शन करत असतात.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजातील सामान्य माणसाला धैर्य आणि शौर्याची शिकवण देत, कीर्तनकारांनी प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले. कीर्तनामध्ये नारदीय, रामदासी, नाथसंप्रदायाचे आणि वारकरी कीर्तन अशा वेगवेगळ्या परंपरा आहेत. पूर्वरंगामध्ये तत्त्वज्ञानाच्या आधारे विषयाची सोप्या भाषेत मांडणी करून उत्तर रंगामध्ये रामायण, महाभारत या विषयांवर रसाळ वाणीद्वारे केलेले आख्यान ही कीर्तनाची मांडणी असते. त्यामध्ये आता ‘कॉर्पोरेट कीर्तना’ची भर पडत आहे. एखाद्या कीर्तनकाराची वेशभूषा करून पुष्कर हे मार्गदर्शन करत आहेत.
"कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम साधन आहे. आम्ही कीर्तनाला सध्याच्या धकाधकीच्या आणि ‘टेनो’ जगात पोहोचविण्यासाठी मनुष्यबळ विकास, नेतृत्व विकास या विषयांवर कंपन्यांमध्ये कीर्तन देण्यास सुरुवात केली. तसेच, कीर्तनानंतर कंपनीतील कर्मचार्यांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे निरीक्षण कंपनीतील अधिकार्यांचे आहे,” असे पुष्कर औरंगाबादकर सांगतात. "सध्याच्या तरुणांना त्यांना समजेल अशा भाषेत आणि पद्धतीने कीर्तन केल्यास ते तरुणांना पटते. कंपनीच्या कार्यपद्धतीवरदेखील त्याचा प्रभाव पडतो. आम्ही कीर्तन करताना कंपनीतील सर्व स्तरातील कर्मचारीवर्गाचा आदर ठेवतो,” असे त्यांचे म्हणणे. पुष्कर यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क ः ९९७५५८८०२५)