निसर्गसखा सलील...

    17-Jul-2025
Total Views |

निसर्गभ्रमंती करताना, वन्यजीवप्रेमी, पक्षीनिरीक्षकांचेही मार्गदर्शन व्हावे आणि जंगलाची चिरशांतता भंग होऊ नये, म्हणून अॅपच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग करणार्या निसर्गसखा सलील चोडणकर यांच्याविषयी...


आपल्या सभोवती काय चालले आहे, याचे केवळ डोळ्यांनी निरीक्षण करून नव्हे, तर त्याबाबत सांगोपांग विचार करून, समस्यांतून समाधान शोधणारी आपल्या समाजात अनेक अभ्यासू व्यक्तिमत्त्वे आहेत. आपल्याला अपरिचित अनेकविध गोष्टी ही मंडळी करीत असतात आणि आपल्या भूतलावरील सूक्ष्म जीवसृष्टीच्या संरक्षणातही त्यांचे योगदान मोलाचे. आज त्यापैकीच एक असलेल्या सलील चोडणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आपण ओळख करून घेणार आहोत.

लहानपणी वाघ पाहून सलील यांच्या मनात भीती नव्हे, तर प्रचंड कुतूहल जागृत झाले. मग काय, भविष्यात त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून, चक्क अशाच वन्यजीवप्रेमींच्या समस्यांवर तोडगा काढायचे ठरविले. त्यांचा हा प्रयास निसर्गभ्रमंती करणार्यांच्या वाटा अधिक सुकर, प्रशस्त करणारा ठरला. एवढेच नाही तर सलील यांचा प्रवास माहितीचे भांडार उघडणारा तर आहेच, शिवाय या जीवसृष्टीला एक नवचैतन्यदेखील देणारा आहे.

निसर्ग भटकंती हा अनेकांचा आवडीचा विषय. परंतु, या भटकंतीमध्ये कळत-नकळत आपल्याकडून निसर्गाला हानीही पोहोचवली जाते. वन्यजीव, पक्षी यांनाही उपद्रवी मानवाकडून लक्ष्य केले जाते. जंगल सफारी, पक्षीनिरीक्षण करणारेही नकळत या वन्यजीवांची शांतता भंग करुन जातात. जंगल सफारी करतेवेळी बहुतांश वेळा असा अनुभव येतो. मग यासाठी काहीतरी करावे म्हणून सलील यांनी एक मोबाईल अॅप विकसित केले. सलील चोडणकर यांचे हे ‘लिस ट्रेल’ नामक मोबाईल अॅप आता भटकंती करणार्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे.

आपल्या अफाट जनसंपर्काचा वापर निसर्ग संवर्धनासाठी करायचा आणि त्यातून संवर्धन करणारे प्रतिनिधी घडवायचे, हा निश्चय सलील यांनी केला. संपूर्ण बालपण, शालेय शिक्षण ते उच्च शिक्षण पुण्यात व्यतीत केलेले सलील यांनी वयाच्या अवघ्या सातव्यावर्षी ताडोबा जंगलात वाघ बघितला. तेव्हापासूनच त्यांच्या मनात प्राण्यांविषयी कुतूहल निर्माण झाले आणि प्राणी-पक्षी अभ्यासाचा छंद जोपासायचे त्यांनी ठरवले. वेळ मिळेल तसे पाठीवर सॅक, सोबतीला कॅमेरा घेऊन सलील भटकंतीसाठी रानवाटा तुडवू लागले. निसर्गातील अशी अद्भुत ठिकाणे अचूकपणे हेरणे, त्यासाठी मित्रमंडळींनाही प्रोत्साहन देणे, यात सलील आघाडीवर. त्यासाठी ते आजही रीतसर मार्गदर्शन करतात.

जंगल सफारी करताना एखाद्या ठिकाणी वाघ दिसला रे दिसला की गर्दी होतेच. त्यामुळे या वन्यजीवांची शांतताही धोक्यात येते. काहीवेळी मग प्राणीही चिडतात व अनेकदा अपघातही घडतात. तसेच प्राणी-पक्षीप्रेमी, संशोधन करणारे यांनादेखील अडथळा निर्माण होतो. त्यामुळे भटकंतीसाठी जंगल सफारी अविस्मरणीय ठरावी आणि वन्यजीवांनासुद्धा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सलील यांनी एका विशेष अॅपची निर्मिती केली. निसर्ग आणि प्राणी, पक्षी संवर्धनाचे काम होईल, हा या अॅपनिर्मितीचा मुख्य उद्देश. या अॅपच्या माध्यमातून सलील यांनी जगभरात निसर्गसंवर्धन करणारे प्रतिनिधीही जोडले आहेत. कोणता प्राणी-पक्षी कुठे आढळून येईल, याबाबत माहिती या अॅपवर अगदी सहज उपलब्ध होते. त्यामुळे त्याठिकाणी होणारी गर्दी टाळता येते. प्राणी, पक्ष्यांचा अभ्यास करणार्या अभ्यासकांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो. या माध्यमातून प्राणी-पक्षीप्रेमीही एकमेकांशी जोडले जातात. माहितीची देवाणघेवाण होते आणि भटकंती करतेवेळी प्राण्यांना होणारा त्रास कमी होतो. एकाच प्रजातीचे प्राणी-पक्षी एकाच ठिकाणी वास्तव्य करत नाहीत. परंतु, दुर्दैवाने अभ्यासकांना आणि निसर्गप्रेमींना प्राणी-पक्षी दिसण्याचे एकच प्रचलित ठिकाण माहिती असते. त्यामुळे त्यांची एकाच ठिकाणी झुंबड उडते. या अॅपमुळे प्राणी-पक्षी निरीक्षणासाठी, अभ्यास करण्यासाठी येणार्यांची एकाच ठिकाणी उसळणारी गर्दी टाळता येते. तसेच, निरीक्षणासाठी वेगवेगळी ठिकाणे निर्माण होऊन, त्या ठिकाणी तशा सोईसुविधाही विकसित होतील. त्यातून रोजगाराच्या विविध संधीदेखील उपलब्ध होतात.

सलील हे व्यवसायातून वेळ काढून दरवर्षी आवर्जून भटकंतीला जातात. फोटोग्राफी करणे, प्राणी-पक्ष्यांचा अभ्यास करणे, हा छंद त्यांनी अजूनही जोपासला आहे. सध्या जंगलांची अवस्था खूप बिकट आहे. त्यात प्राण्यांना मुक्तपणे संचार करता येत नाही. मानवी हस्तक्षेपामुळे या वन्यजीवांची दिनचर्याही कोलमडते त्यामुळेही बरेचदा काही प्राणी आक्रमक होतात. त्यामुळे भटकंती करताना प्रत्येकाने निसर्गाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. यासाठी सलील नित्यनेमाने प्रबोधनदेखील करतात. निसर्गसंवर्धन, प्राणी-पक्षी जपणे ही काळाची गरज आहे. पुढील पिढीला निसर्गाचे महत्त्व समजण्यासाठी, निसर्गासाठी प्रत्येकाने वेळ काढावा, असे आवाहनही ते आवर्जून करतात. अशा या निसर्गसंरक्षक सलील चोडणकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!


अतुल तांदळीकर
अधिक माहितीसाठी संपर्क - ९८९०९०२२०७

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121