प्रवाही प्रवानंत!

    29-Jul-2025   
Total Views | 29

संगीताच्या माध्यमातून एकीकडे मायबाप रसिकांच्या काळजात घर करत, दुसरीकडे कलेच्या नव्या विश्वात स्वप्नांच्या शोधार्थ स्वच्छंद विहार करणार्या प्रवानंत तांबे याच्याविषयी...

एखादा कलाकार ज्या वेळेस मोठा होतो, त्यावेळी त्याच्या सभोवताली असलेलं वातावरण त्याला घडवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावतं. एकाच वेळेला तो समाजाचा भागसुद्धा असतो आणि त्या समाजासाठी तो आपली कलासुद्धा सादर करत असतो. आपली अभिव्यक्ती लोकांसमोर मांडताना, कलाकाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भले बुरे अनुभव पचवून, त्याला चालत राहावं लागतं. कलाकाराला डबकं होऊन थांबता येत नाही, नदीचा खळखळणारा प्रवाह त्याच्याकडून अपेक्षित असतो. हेच प्रवाहीपण आपल्या अंगी बाणवणारा युवा कलाकार म्हणजे प्रवानंत तांबे.

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, अण्णा भाऊ साठेंची छक्कड गाताना अनेकांनी त्याला ऐकलं आहे. त्याच्या आवाजाची फेक, गाणं यामुळे त्याचं कौतुकही झालं. रंगमंचावर आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा प्रवानंत, एके काळी या सार्या प्रवाहापासून दूर होता. मुंबईच्या सातरस्ता भागातला प्रवानंतचा जन्म. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयामधून त्याने शिक्षणाचे धडे गिरवले. जन्मापासूनच संयुक्त कुटुंबात वाढलेला प्रवानंत, सगळ्यांचा लाडका होता. कालांतराने त्याच्या जीवनात स्थित्यांतर झालं, राहण्याची अनेक ठिकाणं बदलली. लहानपणापासूनच, लांब पल्ल्याचा प्रवास त्याने अनुभवला. प्रवानंतचे वडील प्रकाश तांबे आपली नोकरी सांभाळत, रंगभूमीवर काम करायचे. त्याच्या काकांनासुद्धा त्याने लहानपणापासून लेखन करताना, पथनाट्य करताना बघितलं होतं. त्यामुळे रंगभूमी, सादरीकरण या सार्या विश्वामध्ये प्रवानंत लहानपणापासून रमत होता, कला आत्मसात करत होता. अशातच लोकशाहीरांची गाणी त्याच्या ओठांवर खेळू लागली आणि शाहीर निवृत्ती पवार, शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप अशा श्रेष्ठ लोककलावंतांची गाणी त्याने पाठ केली. अल्पवधीतच त्याला गाण्यातील सूर सापडला. कळत नकळत लोककलेच्या विश्वात त्याने आपलं पाऊलं ठेवलं होतं. संगीतविश्वाच्या या प्रवासात अनेक लोककलावंतांसोबत त्याची भेट झाली. तसेच काही लोककलावंतांसोबत गाण्याची संधीसुद्धा त्याला मिळाली.

हळूहळू रंगमंचावर प्रवानंतचा वावर सहज साध्य होत गेला. आपल्या आप्तजनांकडून, गुरूंकडून त्याने रंगभूमीचे अनेक धडे गिरवले. अभिनयातील बारकावे, आवाजाची फेक या आणि अशा असंख्य गोष्टींसाठी त्याच्या वडिलांनी त्याला मदत केली. त्याचे काका गौतम तांबे यांनी एखादा विषय कसा निवडावा, संहितालेखन कसे करावे, नाटक किंवा नाटिका कशा लिहाव्या, याबद्दल मार्गदर्शन केले. कलेच्या प्रांतात त्याचं जीवन समृद्ध करणारे शिक्षकवृंदसुद्धा त्याला लाभले. यानंतर कला शाखेसाठी प्रसिद्ध डी जी रूपारेल महाविद्यालयात त्याने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत, टप्प्याटप्प्याने त्याला, त्याच्यातील कलाकार उमगत गेला.

एक कलाकार म्हणून घडत असताना, त्याच्या आयुष्यात संघर्षाचेसुद्धा अनेक टप्पे आले. बुजरेपणा, न्यूनगंड या सगळ्या गोष्टींवर मात करणे असो किंवा ‘कोविड’सारख्या महामारीमध्ये घराची जबाबदारी घेणं असो, या सगळ्या प्रसंगातून तावून सुलाखून प्रवानंत घडत गेला. रंगभूमीचा प्रवास सुरू असताना, प्रवानंतने कॅमेर्याच्या मागच्या बाजूने आणखी एका नव्या जगाचा शोध लावला. हे जग होतं लघुपटांचे. आपल्या मित्रांसोबत लघुपटांच्या विश्वाचासुद्धा अत्यंत सक्षमपणे धांडोळा घेण्याचा निर्णय प्रवानंतने घेतला. लघुपटाच्या प्रतिमांचीसुद्धा एक विशिष्ट भाषा असते. प्रवानंत म्हणतो की, ही प्रतिमांची भाषा आता त्याला आवडायला लागली आहे. सध्या तो याच लघुपटांच्या संहितेवर काम करतो आहे. विविध विषयांवरचे लघुपट बघायला जितके अद्भुत असतात, किंबहुना त्यापेक्षा जास्त अद्भुत असते त्याच्या निर्मितीची प्रक्रिया. येणार्या काळात, त्याचं हे साहित्यसुद्धा वाचकांच्या भेटीला येईल.

प्रवानंतच्या मते, गाणं हे असं माध्यम आहे, जे लोकांच्या काळजाला चटकन जाऊन भिडतं. गाण्याची जी अभिव्यक्ती असते, त्या माध्यमातून अत्यंत थोडयात पण अत्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचवता येतो.आताच्या घडीला प्रवानंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नाट्यलेखन आणि दिग्दर्शन करतो आहे. अभिनय तसेच पथनाट्याच्या कार्यशाळेमध्ये, मार्गदर्शक म्हणूनसुद्धा त्याला बोलवलं जातं. स्पर्धेतील त्याचं यश या केवळ एकच मापदांडातून नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वातील कला-गुणांशी समरस होऊन, त्याच्याकडे शिक्षकाच्या नजरेने अनेकजण बघतात. नाटक शिकता शिकता माणूस प्रगल्भ होत असतो, परंतु त्याचबरोबर नाटक शिकवतानासुद्धा वेगळी दृष्टी आपल्याला लाभते. प्रवानंत सध्या ’विश्व लोककला मंचा’सोबत जोडला गेला असून, वेगवेगळ्या भागांतील लोककलावंतांसोबत काम करताना त्याच्याही विचारविश्वामध्ये परिवर्तन घडतं आहे. प्रवानंत सांगतो की, "अनेक नावाजलेले लोककलावंत आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढतात. एक समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजचे आहे.” अशा या तरुण कलावंताला, त्याच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121