सुतार पक्षी ओळखताना गडबड होतेय; हे 'ई-बुक' करेल तुम्हाला मदत

    08-Oct-2025
Total Views |
Woodpeckers



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जंगलात गेल्यावर सुतार पक्ष्यांच्या काही प्रजाती ओळखताना तुम्ही संभ्रमात पडत असाल, तर 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'ने प्रकाशित केलेले 'वेन इन डाऊट; ट्राय दिस आऊट' हे पुस्तक तुम्हाला मदत करु शकते (Woodpeckers). 'ई-बुक' स्वरुपात उपलब्ध असलेले हे पुस्तक एकसारख्या वाटणाऱ्या आणि ओळखण्यास क्लिष्ट असणाऱ्या सुतार पक्ष्यांमधील प्रजातींची ओळख करुन देण्यास मदत करते (Woodpeckers). भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात जागतिक वन्यजीव सप्ताहाचे निमित्त साधून पार पडलेल्या 'वण्यवाणी वन्यजीव महोत्सवा'त या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे (Woodpeckers).
 
 
'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'ने संभ्रमात पाडणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची ओळख करुन देण्यासाठी 'ई-बुक' पुस्तकांची मालिका तयार केली आहे. यामधील सुतार पक्ष्यांमधील प्रजातींची ओळख पटवून देणारे 'वेन इन डाऊट; ट्राय दिस आऊट' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. भारतात सुतार पक्ष्याच्या साधारण ३३ प्रजाती आहेत. मात्र, या पुस्तकात केवळ संभ्रमात पाडणाऱ्या सुतार पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती देण्यात आली आहे. 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'चे संस्थापक डाॅ. निखिल भोपळे यांनी या पुस्तकांचे संपादन केले आहे. बदाम ठिपक्यांचा सुतार (हार्ट-स्पॉटेड वुडपेकर), पांढऱ्या पोटाचा सुतार (व्हाईट-बेलीड वुडपेकर), ग्रेट स्लेटी वुडपेकर यांसारख्या सुतार पक्ष्यांच्या प्रजाती खूप वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्यांना ओळखणे सोपे आहे. मात्र, फ्लेमबॅक किंवा पायड्स सारख्या उप-गटांमधील काही प्रजाती सारख्याच दिसतात, म्हणून पक्षीप्रेमींना त्यांना ओळखताना संभ्रम निर्माण होतो.
 
 
या पुस्तकात अशा पद्धतीने संभ्रमात टाकणाऱ्या सुतार पक्ष्यांच्या दोन प्रजातींमधील फरक स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. उदा. रुफस वूडपेकर आणि बे वूडपेकर, लेसर यलोनॅप आणि ग्रेटर यलोनॅप, ब्लॅक रॅम्पड फ्लेमबॅक आणि काॅमन फ्लॅमबॅक या प्रजातींची ओळख पटवाताना बऱ्याचदा गल्लत होते. ही गल्लत दूर करण्यासाठी हे 'ई-बुक' मदत करणार आहे. हे 'ई-बुक' https://gwtindia.org/downloads/ इथून डाऊनलोड करु शकता.