रणरागिणी दिपा...

    02-Oct-2025
Total Views |

नारी अबला नाही, तर दुर्गेचे रूप आहे, हे ओळखून शोषित, पीडित महिलांना ‘रणरागिणी’ बनवणार्‍या दिपा परब यांच्याविषयी...

तत्कालीन काळात कमी शिक्षण दिलं गेल्यामुळे आणि ‘दिल्या घरी सुखी राहा’ या मानसिकतेमुळे, अनेक महिला सासरचा जाच सहन करत, अपमानित आयुष्य जगत होत्या. एकदा सासरी गेले की, परत माहेरी फक्त सणावाराला आणि तेही चारच दिवस. आज शिकून स्वतःच्या हिमतीवर उभ्या राहिलेल्या लाखो स्त्रिया समाजात पाहायला मिळतात. तरीही पुरुषी वर्चस्वाची परंपरा, अजूनही ग्रामीण भागांत पूर्णपणे संपलेली दिसत नाही. आजही अनेक स्त्रियांची अवस्था दयनीय अशीच. याच स्त्रियांना नारीमध्ये दडलेली नारायणी दाखवण्याचं काम करत आहेत, महाराष्ट्रातील पहिल्या रणरागिणी महिला दिपा दिपक परब.

‘बाऊंसर’ असा शब्द ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर उभा राहतो, धिप्पाड शरीरयष्टी असलेला पुरुष. पण, या शब्दाची प्रतिमा बदलत, महिलांना या क्षेत्रात आणून त्यांचे आयुष्य घडवणार्‍या दिपा यांनी लहानपणीच पोलीस व्हायचे ठरवले होते. पण, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांना कर्करोगाने ग्रासलेले आणि आई शेतामध्ये रोजंदारीवर कामाला जात असे. चार बहिणी आणि एक भाऊ असणार्‍या या घरात, सर्वांत लहान असूनही दिपा यांनी मोठ्या दोन बहिणींचे विवाह स्वखर्चाने लावून दिले. घरच्या एकूण परिस्थितीमुळे लहान वयातच दिपा यांचा संघर्ष सुरु झाला.

पुण्याच्या सारसबागेजवळ असलेल्या वडिलांच्या वडापावच्या गाडीवर, वयाच्या नवव्या वर्षापासूनच दिपा यांनी काम करायला सुरुवात केली. वडिलांना कर्करोगाची लागण झाल्यानंतर तर, व्यवसायाची पूर्णच जबाबदारी दिपा यांच्या खांद्यावर पडली. त्यामुळे पोलीस व्हायचे त्यांचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले. काम करत करत कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण आटोपल्यानंतर, त्यांनी पार्लरचा कोर्स केला. वडापावचा व्यवसाय आणि सोबत पार्लरची छोटीमोठी कामे करत दिपा यांचा चरितार्थ सुरु होता. याच दरम्यान दिपा यांचे लग्न झाले आणि लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पार्लर चालू करण्यास परवानगी नाकारली. त्यावेळेस पार्लर ही कल्पना बदनाम होती. त्याविषयी समाजात अनेक गैरसमजुती पसरल्या होत्या.

माहेरी असताना वडापावच्या गाडीवर काम केल्यामुळे लोकांशी कसा व्यवहार करावा, बोलणे कसे असावे, याची माहिती दिपा यांना होती. त्यामुळेच अर्थार्जनासाठी मार्केटिंग क्षेत्रात येण्याचे दिपा यांनी ठरवले. मार्केटिंगची बाराखडी शिकण्यापासून त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. पुढे त्यांनी ‘आयसीआरसी’ या कंपनीमध्ये सलग १४ वर्षे काम केले. पहिल्या वर्षी ११० रुपये महिन्याला कमवत असताना, चौदाव्या वर्षी ३५ हजार रुपये मिळवण्यापर्यंतचा प्रवास गाठला. या क्षेत्रात काम करत असताना, अबकडपासून ते लॅपटॉप शिकण्यापर्यंत दिपक लोखंडे यांची खूप मोलाची मदत त्यांना झाली. ते एकप्रकारचे दिपा यांचे गुरूच आहेत.

१४ वर्षे नोकरी केल्यानंतर दिपा पुन्हा पार्लरच्या क्षेत्रात परतल्या. त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हे काम करत असतानाच, एकदा मुंबईला एका अभिनेत्रीच्या मेकअपला जाण्याची वेळ आली. त्यावेळी पहिल्यांदाच त्या अभिनेत्रीबरोबर चार-पाच काळे कपडे घातलेले बलदंड पुरुष पाहिल्यानंतर ‘हे कोण आहेत?’ असा प्रश्न पडला. चौकशीनंतर कळले की, यांना ‘बाऊंसर’ म्हणतात. महिला अभिनेत्रीला पुरुष बाऊंसर पाहिल्यानंतर मनात विचार आला की, महिला बाऊंसर का होऊ शकत नाहीत? त्यावेळी चौकशी केल्यानंतर महाराष्ट्रात अशी महिला बाऊंसर पुरवणारी एकही संस्था आढळली नाही. त्यामुळे आपणच ही सुरुवात करावी असे दिपा यांना वाटले.

मार्केटिंग क्षेत्रात सोबत काम करणार्‍या सहा महिलांना घेऊन, दि. ११ जून २०१६ रोजी ‘रणरागिणी महिला बाऊंसर ग्रुप’ची सुरुवात केली. या महिलांनी शर्ट पॅन्ट घालण्यास नकार दिल्यामुळे, सुरुवातीला काही महिने फिकट गुलाबी रंगाच्या साडीमध्ये महिला बाऊंसर असत. पुण्याच्या डिपी रस्त्यावरील एका लॉन्समध्ये पहिले चार कार्यक्रम त्यांनी मोफत केले. त्यानंतर मग वाढदिवसाचे पोस्टर शोधत त्यांनी संपर्क करून कार्यक्रम मिळवले. समाजमाध्यमांचा उपयोग करायला सुरुवात केल्यानंतर,‘रणरागिणी महिला बाऊंसर ग्रुप’ला चांगली ओळख मिळाली. आजमितीला 350 हून अधिक रणरागिणी दिपा यांच्याकडे कार्यरत आहेत.

रणरागिणींचे कार्य बघून, समाजातील अनेक शोषित महिला त्यांचा त्रास सांगायला लागल्या. त्यातूनच या महिलांसाठी दिपा यांनी ‘रणरागिणी उंबरठा फाऊंडेशन’ची स्थापना केली. ज्या महिला घरातील जाचाला कंटाळून माहेरी येतात किंवा टोकाचे पाऊल उचलतात, त्यांना मार्गदर्शन करून एखादी नोकरी मिळवून देणे किंवा साजेसा व्यवसाय करण्यास मदत करणे, असे कार्य हे फाऊंडेशन करते. अनेक महिलांना बाऊंसर म्हणूनदेखील संधी दिली जाते. दिपा नेहमी सांगतात की, “पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहणार्‍याला वेडं समजलं जातं. पण, जेव्हा तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याचं कौतुक होतं.”

स्त्रीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी करायला सांगितली, तर अनेकांच्या डोळ्यासमोर आखीव-रेखीव बांधा असलेली, सुडौल शरीरयष्टीची नाजूक प्रतिमा उभी राहते. अनेक चित्रकारांनीदेखील अशीच चित्रे रेखाटली आहेत. परंतु, अशाही अनेक स्त्रिया आहेत, ज्या पुरुषी वर्चस्वाला झुगारून त्यांच्या बरोबरीचे काम करून दाखवतात. दिपा यांना यामध्ये महाराष्ट्र सरकारचे तीन पुरस्कार आणि विविध सामाजिक संघटनांचे १४६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नारी अबला नाही, तर दुर्गेचे रूप आहे, हे ओळखून शोषित, पीडित महिलांना ‘रणरागिणी’ बनवणार्‍या दिपा यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!



- चारुदत्त टिळेकर