उबाठा सेना ही कृतघ्नपणाचे मूर्तिमंत उदाहरण. ज्या नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आणि भाजपच्या मतदारांच्या व्यापक पायाचा लाभ घेऊन या पक्षाने सत्तेचे लाभ उपभोगले, त्याच पक्षावर अभद्र भाषेत बिनबुडाची टीका करताना उद्धव ठाकरे यांनी मनाचीही लाज सोडून दिल्याचे दिसले. भाजपला विषारी फळ म्हणणारे उद्धव ठाकरे, गेली तीन दशके त्याच फळाचा आस्वाद आवडीने घेत होते. कसलाही सकारात्मक विचार नसलेले त्यांचे भाषण हा शाब्दिक चिखलच म्हणावा लागेल.
यंदा पाऊस लांबल्यामुळे ऐन दसऱ्याच्या दिवशीही मुंबईत जोरदार वृष्टी होत होती. त्यामुळे अनेक मैदानांमध्ये पाणी साठून चिखल झाला होता. त्यात दादरमधील शिवतीर्थाचाही समावेश होता. या मैदानावर अनेक ठिकाणी चिखलाचा राडा झाला होता. त्यातच संध्याकाळी तेथे जोरदार पाऊसही पडत होता. पावसामुळे झालेल्या चिखलात होत असलेल्या तोतया शिवसेनेच्या मेळाव्यातच, उरल्यासुरल्या गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची शाब्दिक चिखलफेकही सुरू होती. खरे तर अलीकडे त्यांच्या भाषणात एकच रडगाणे असते. आपल्या भाषणातील टीकेला कसलाही आधार आणि पुरावा न देता, आपण सोडून बाकी सर्वजण (म्हणजे भाजप) कसे चोर आणि चुकीचे आहेत, हेच सांगण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न यंदाही दिसला. त्यांची ही टीका आता इतकी सवयीची झाली आहे की, खरे म्हणजे त्यांचे भाषण न ऐकताही कोणताही वार्ताहर त्यांनी काय भाषण केले, याची बातमी देऊ शकतो. यंदाचे भाषणही त्यास अपवाद नव्हते.
या भाषणात कसलाही नवा विचार किंवा आशादायक असा मुद्दा नव्हता, विकासाची दृष्टी नव्हती. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, त्यामुळे नेते किंवा पक्ष खचून जात नाहीत. उलट ते अधिक जोमाने जनसेवेला लागतात. भारतीय जनता पक्ष 1984 साली लोकसभेच्या केवळ दोन जागांवर विजय मिळवू शकला होता. म्हणून त्या पक्षाचे नेते खचून गेले नाहीत की, त्यांनी निवडणुकीत, मतदानात भ्रष्टाचार झाल्याचे रडगाणे गायले नाही. ते पुन्हा नव्या जोमाने आणि नवा विचार घेऊन कार्यरत झाले. परिणामी पुढील निवडणुकीपासून त्या पक्षाची घोडदौड सुरू झाली आणि 2014 साली या पक्षाला स्वबळावर बहुमतही मिळाले. येती काही वर्षे भाजपच सत्तेवर असेल, ही गोष्ट विरोधी पक्षांनीही आता मनोमन मान्य केली आहे. पण, ठाकरे यांचे भाषण पाहिल्यास ते पूर्णपणे हताश झाले असून, नैराश्याने त्यांचे मन घेरल्याचे स्पष्टपणे जाणवते.
लायकीपेक्षा अधिक लाभ तेही विनासायास मिळाल्यामुळे, उद्धव ठाकरे यांची स्वत:बद्दल भलतीच गैरसमजूत झाली आहे. आपण सोडून अन्य सर्वजण कसे चुकीचे आहेत, हेच रडगाणे ते गात राहिले आहेत. जनतेला हताश आणि भविष्याबद्दल आशावादी नसलेला आणि वितंडवाद घालणारा नेता नको असतो. ठाकरे यांच्या भाषणातून ना त्यांच्या कार्यकर्त्यांना, ना सामान्य जनतेला कसलाही सकारात्मक संकेत मिळाला. आजकाल तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून मनोरंजनही होईनासे झाले आहे. त्यामुळे असे रटाळ आणि अभद्र भाषेने भरलेले भाषण ऐकण्याचेही कष्ट कोणी घेत नाही. यंदा शिवतीर्थावरील रोडावलेली गद हे त्याचेच द्योतक.
मन मानेल तशी कोणत्याही विषयावर टीका करणे म्हणजेच भाषण, अशी ठाकरे यांची समजूत आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, या एकाच संकल्पनेवर पूव भाषणे होत असत. आता त्यातील फोलपणा जनतेला समजल्यामुळे भांडवलदारांच्या हवाली मुंबई आणि महाराष्ट्र करणार, असा नवा विचार दिला जाऊ लागला आहे. ठाकरे यांचे भाषण ऐकल्यास भारतात केवळ अदानी आणि अंबानी हे दोनच भांडवलदार आहेत असेच कोणालाही वाटेल.
राष्ट्रवादी सांस्कृतिक संघटना असलेल्या रा. स्व. संघाला, यंदा विजयादशमीच्या दिवशी 100 वर्षे पूर्ण झाली. पूव भाजपबरोबर युती असताना संघ कार्यकर्त्यांची मतेही ते मिळवतच होते. आता भाजपशी काडीमोड घेतल्यावर त्यांना संघाचेही वावडे वाटू लागले आहे. “संघाचा ब्रह्मराक्षस झाला आहे,” असे ते म्हणाले. म्हणजे संघाने असे काय केले, ते मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. संघाच्या वृक्षाला भाजप हे विषारी फळ लागले आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली. गेली 35 वर्षे याच विषारी फळाचा आस्वाद ते घेत होते, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे. संघाच्या वृक्षाला कसले तरी फळही लागले आहे पण, या उबाठा सेनेचे झाड तर इतके वठले आहे की, त्याला फळे सोडाच, पालवीसुद्धा फुटण्याची आशा आता नाही. या झाडावर ज्या काही काटक्या राहिल्या आहेत, त्याही येत्या महापालिकेच्या निवडणुकीत गळून पडतील अशीच चिन्हे आहेत.
ठाकरे यांचा खरा तिळपापड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतो. शिंदे यांनी घेतलेल्या समंजस निर्णयामुळेच, मराठी माणसाची हितकारी शिवसेना पुन्हा सावरली. पण, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मिळविलेली मुख्यमंत्रिपदाची खुच मात्र त्यांच्याकडून सटकली. शिंदे यांना बहुसंख्य सेना नेते आणि सामान्य शिवसैनिकांचा पाठिंबा मिळाला आणि ठाकरे हे एका कमजोर गटाचे नेते बनले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा खरा राग शिंदे यांच्यावर असणे स्वाभाविकच. यंदाच्या भाषणातही त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गाढव म्हटले. या गाढवाने हिंदुत्वाची शाल पांघरली आहे, असेही ते म्हणाले. चला, म्हणजे हिंदुत्वाचा अस्सल वारसा शिंदे यांच्याकडे असल्याची ही कबुलीच म्हटली पाहिजे. या उरल्यासुरल्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत ‘हमारा वक्फ’ असा उल्लेख करून, ‘वक्फ’ विधेयकाचा विरोध केला. दुसरे एक खासदार संजय राऊत यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांच्या मृत्यूचे राजकारण तर केलेच पण, त्या पर्यटकांना धर्म विचारून ठार मारल्याच्या वस्तुस्थितीचाही विपर्यास केला. हे स्वत:ला कोणत्या तोंडाने हिंदुत्ववादी म्हणवून घेतात? पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि हिंदू असल्याबद्दल त्यांना गोळी घातली. राऊत यांनी असे काही घडल्याचे नाकारले असून, तो या बळींचा सर्वांत मोठा अपमान मानला पाहिजे. एकंदरीतच शिवतीर्थावरील मातीचा चिखल परवडला, इतका शाब्दिक चिखल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गणंगांनी या मेळाव्यात उडविला होता.