कविता आणि समुपदेशन ते देखील व्यावसायिक समस्यांवर. अमोल पगारिया यांची ही यशस्वी कामगिरी दखलपात्रच...
'कविता’ हे असे माध्यम आहे, ज्यातून प्रेम, दुःख, प्रबोधन तर कोणाला लढण्याची उमेद व्यक्त करण्यासाठी ते वापरता येते. अमोल पगारिया हे त्यापैकी एक कवी मात्र व्यावसायिक आणि समुपदेशकदेखील. कोणाच्या व्यवसायातील अपयशातून बाहेर पडण्यासाठी कवितेतून व्यक्त होणे आणि कोणाला प्रोत्साहन देण्यासाठी कविता करणे, हे अनोखे कार्य यशस्वी करण्यात अमोल पगारिया माहिर आहेत.
कोणाला कसल्याही शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्या फक्त कवितेतून देणार असा निश्चय अमोल यांनी केला आहे. पुण्यात साहित्यिकांची गद आहे, आपल्या प्रतिभासंपन्न कर्तृत्वातून त्यांनी वाचकांना नक्कीच आनंद आणि समाधान दिले आहे. दिग्गज साहित्यिकांच्या प्रेरणेतून नवोदित कवींचादेखील प्रवास पुणे परिसरात स्पृहणीय असाच आहे. हा तरुण कवी त्यापैकीच एक अमोल अशोक पगारिया हे पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागात राहणारे. कविता करणे हा त्याचा छंद. सांगवी भागातील बा. रा. घोलप शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. तर पुण्यातील ‘मराठवाडा मित्रमंडळ’ या महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासून कवी म्हणून ओळख असलेल्या अमोल यांनी आतापर्यंत अनेक कविता केल्या आहेत. कारण, काहीही असो पण, कविता करायची आणि त्यातून प्रबोधन करायचे असा निश्चय त्यांनी केला आहे. आपल्या कविता समाजासाठी उपयोगी आल्या पाहिजेत. कोणी दुःखात असेल, कोणत्या तणावाखाली असेल, तर कवितांमधून बळ आले पाहिजे, यासाठी एखादी कविता केली जाते. त्यातून दुःखात असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील निराशा आलेली मरगळ दूर जाते. तर कोणी आनंदात असेल आणि एखादी उत्तम कामगिरी केली असेल, तर त्याला अमोलकडून कवितांमधून शुभेच्छा येतात. कोणाच्या बाळाचे बारसे असेल किंवा वाढदिवस असेल, तर त्या कार्यक्रमात अमोलकडून त्या बळावर हमखास एखादी कविता लिहिली जाते. कवितेमध्ये संपूर्ण कुटुंबीयांचा उल्लेख अशा प्रकारे असतो की, सर्व पाहुण्यांना ती कविता भावते. कवितेतून संपूर्ण कुटुंब जोडण्याचा अमोलचा हा प्रयत्न असतो. अमोल यांनी आपल्या व्यवसायातील कौशल्य दर्शवित पुरस्कार जिंकले आहेत. ‘सी. ए. फाऊंडेशन’चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. विविध कवी संमेलनांमध्ये त्यांना दाद मिळत असते. मात्र, कवितेला समस्यांवर फुंकर घालण्याचे साधन बनवून अमोल यांची कामगिरी या क्षेत्रात उजवी ठरत आहे.
अमोलला लहानपणापासून समाजसेवेचे बाळकडू मिळाले आहे. वडीलआई दोघेही समाजसेवेत असल्याने अमोलवर लहानपणापासून लोकसेवेचे संस्कार झाले. ‘तेरा पंथी युवक परिषदे’चे अध्यक्ष म्हणून काम करताना अमोलने अनेक उपक्रम घेतले. रक्तदान शिबीर असेल, अन्नदान, कपडे दान असे छोटेमोठे उपक्रम अमोल आणि त्याचे मित्र करत असतात. आपले गुरू पुणे भेटीवर असले की, अमोल आणि त्याचे मित्र जातीने हजर राहतात. गुरूंना काय हवे नको. गुरूंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काळजी घेणे. त्यांना काय हवे नको पाहणे, तसेच येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान झाले की नाही, याची सर्व काळजी ही युवक परिषद घेते.
तसे बघितले तर व्यवसाय-व्यापार यांचा कवितांशी दुरान्वये संबंध नाही. विशेष म्हणजे, कवींपासून दूर राहणारादेखील समाजात एक घटक आहे. मात्र, याच कवितांना सामान्यांच्या सुख-दुःखाशी जोडून त्यातून समाधान काढण्याची किमया अमोल यांनी साध्य केली, हे अत्यंत विशेष आहे. कविता आणि समुपदेशनाची योग्य सांगड घालून ते करीत असलेले कार्य नक्कीच प्रेरक आणि समाजासाठी उपयुक्त आहे यात संदेह नाही.
स्वतः व्यावसायिक असल्याने ते व्यवसाय वाढ सल्लागार म्हणून काम करतात. अनेकदा व्यवसायात नुकसान सहन केलेले, कागदपत्रात फसवणूक झालेल्यांना योग्य सल्ला आणि सेवा पुरवण्याचे कामदेखील ते चोख करतात. त्याच्या व्यवसायात अनेक गोरगरीब ग्राहक असतात. त्यांची फसवणूक झालेली असते. गरजू कुटुंब अक्षरशः धाय मोकळून रडतात. अशा नागरिकांना आपल्या गोड वाणीने समजूत घालणे, हे ते आपले कर्तव्य समजतात. समुपदेशनाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने त्रासात, तणावात असणाऱ्या नागरिकांचे निराकरण कसे करायचे, ते योग्य प्रकारे जाणतात. विशेष म्हणजे यात त्याला त्याच्या कविता उपयोगी येतात. आपली कविता प्रत्येकाच्या कामी आली पाहिजे, हे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. गणेशोत्सवात काळात घराच्या गणपतीचे डेकोरेशन करताना कवितांचा वापर हमखास असतो. डेकोरेशनमध्ये त्यांनी यावष मामाचे गाव साकारले होते. मागीलवष शाळेचे दिवस हा देखावा साकारला होता. आधीच्या वष शेतकऱ्यांच्या व्यवस्था कवितेतून मांडल्या होत्या.
घरात, नातेवाईकांत, ओळखीत कोणताही कार्यक्रम असो. सूत्रसंचालन करण्यासाठी अमोल हेच नाव असते. कोणालाही कसलीही मदत हवी असेल, तर एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे अमोल यांचे. कोणासाठी समुपदेशन, कोणाला बळ देणारा तर कोणाला मानसिक आधार देणारा, कोणाच्या कोणत्याही दुःखावर हळुवार फुंकर घालणाऱ्या अमोलला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
- शशांक तांबे