भारताच्या नव्या अध्यायाची प्रस्तावना
विजयादशमी ही अडथळ्यांवर मात करून नवा अध्याय सुरू करण्याची शिकवण देते. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काल विजयादशमी उत्सवात मांडलेले विचार आत्मनिर्भरता, सामाजिक ऐक्य, कौशल्य विकास आणि भारतीय संस्कृतीच्या सशक्ततेवर केंद्रित असून राष्ट्रासाठी मार्गदर्शक असेच आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची शताब्दी सुरू असताना, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्राला कोणता संदेश देतात, हे औत्सुक्याचे होते. त्यांनीही भारताच्या यापुढील वाटचालीसाठी देशाची, व्यवस्थेची, समाजाची, तसेच समाजाचा एक घटक म्हणून वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका काय असली पाहिजे, यावर नेमकेपणाने भाष्य केले. विजयादशमीचे सरसंघचालक यांचे विचारांचे सोने ही संघाचे स्वयंसेवक, समाजजीवनातील विविध घटक आणि देशातील विचारवंत यांचे लक्ष वेधणारे असते. संघशताब्दीच्या उंबरठ्यावर डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेले भाषण केवळ परंपरेचे स्मरण नव्हे, तर भविष्याचे मार्गदर्शक असेच आहे. त्यांनी उच्चारित केलेले मुद्दे हे राष्ट्रीय जीवनाला दिशा देणारे, समाजपरिवर्तनाचा अजेंडा निश्चित करणारे आणि भारतीय विचारविश्वाला जागतिक पटलावर नेणारे ठरले. आजच्या काळात भारतीय संस्कृती, सामाजिक ऐक्य आणि स्वावलंबन हीच खरी विजयाची गुरुकिल्ली असून, संघाच्या शताब्दी वर्षातील त्यांचे हे विचार केवळ सांस्कृतिक उद्घोष नव्हे, तर राष्ट्रीय ध्येय आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर टाकलेला प्रकाश आहे.
भाषणाच्या प्रारंभी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. हिंदू तीर्थयात्रेकरूंना ‘तू हिंदू आहेस का?’ असे विचारून दहशतवाद्यांनी मारले गेले, हे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. ही घटना केवळ दहशतवादाची नव्हे, तर हिंदूविरोधी मानसिकतेची क्रूर अभिव्यक्ती होती. अशा वृत्तीचा निषेध करत, केंद्र सरकारने दिलेले प्रत्युत्तर, तत्काळ केलेली कारवाई आणि दहशतवादी तळांचे केलेले निमूर्र्लन याचे त्यांनी कौतुक केले. यामागे एक महत्त्वपूर्ण असा संदेश आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई ही केवळ सुरक्षाबलांची जबाबदारी नसून, संपूर्ण समाजाच्या जाणिवेचा ती भाग असली पाहिजे. धर्म विचारून मारणे, ही वृत्ती भारताला मान्य नाही हे जगाला दाखवून देणे, हीच खरी राष्ट्रीय भूमिका आहे आणि त्यावरच त्यांनी बोट ठेवले. अशा दहशतवादी कृत्यांवर कठोर कारवाई आवश्यक असून, त्यातून समाजाला संदेशही मिळतो की, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण हे प्रत्यक्ष कृतीतून होते. ही भूमिका आजच्या असुरक्षित जागतिक परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची ठरते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नव्या आयातशुल्क धोरणाचा उल्लेखही त्यांनी केला. शुल्काच्या माध्यमातून संरक्षणवादी भिंती उभारल्याने जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत होत असून, विकसनशील देशांना त्याचा फटका बसतो आहे. भारताने अशा परिस्थितीत स्वदेशीचा अवलंब करावाच. त्याचवेळी जगाशी संवाद कायम राहिला पाहिजे आणि सहकार्याचे दरवाजे बंदे केले जाऊ नयेत, हे त्यांनी अधोरेखित केले. कोणताही देश एकटा प्रगती करू शकत नाही. परस्पर व्यापार आणि संबंध हे विकासासाठी आवश्यक असेच. मात्र, अन्य देशांचा दबाव अर्थव्यवस्थेवर नसावा तसेच, गुलामीच्या जोखडाखालीही आपली अर्थव्यवस्था नसावी, हेही त्यांनी स्पष्ट केले. स्वावलंबनाचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नसून उलट, जागतिक परस्पर अवलंबित्व आणि राष्ट्रीय स्वावलंबन यांचे संतुलन साधणे, हीच खरी भारतीय दृष्टी आहे. आत्मनिर्भरतेवर आधारित सशक्त सहभागाचे तत्त्वज्ञान, भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेणारे ठरेल.
त्यांनी मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण नको हा! कदाचित अनेकांना हे विधान आश्चर्यकारक वाटेल मात्र, त्यामागे तर्कशुद्ध असा विचार आहे. डॉ. मोहनजी भागवत यांनी स्पष्ट केले की, आर्थिक शक्ती विखुरली गेली, तर ते समाजाच्या विघटनाला कारणीभूत ठरेल. संघटित राष्ट्रीय जीवनासाठी आर्थिक शक्तीचा आधार केंद्रित व राष्ट्रहिताभिमुख असावा. आज जगभरात बहुराष्ट्रीय कंपन्या, विदेशी गुंतवणूकदार आणि पाश्चात्य वित्तसंस्था, विकसनशील राष्ट्रांच्या अर्थकारणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आर्थिक विकेंद्रीकरणाच्या नावाखाली विदेशी शक्तींना देशाच्या मूलभूत साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची संधी मिळू नये, हा त्यांचा मुद्दा आहे. याउलट त्यांनी आत्मनिर्भरतेचा आग्रह धरला आहे. आत्मनिर्भरता म्हणजे केवळ ‘मेक इन इंडिया’ नव्हे; ती मानसिकता आहे, स्वाभिमान आहे.
पर्यावरणाचे संरक्षण हा आज काळजीचा विषय ठरला आहे. डिजिटल आणि औद्योगिक युगात पर्यावरणीय संतुलन राखणे ही केवळ नैतिकता नाही, तर तो आता अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. उत्तर भारतात यावर्षी सर्वाधिक नैसर्गिक आपदा देशाने पाहिल्या, महाराष्ट्रानेही अतिवृष्टी अनुभवली. या पार्श्वभूमीवर, भारतीय संस्कृतीतील नैसर्गिक साधनांचा योग्य वापर आणि संवर्धन हा संदेश विकासाच्या प्रक्रियेतही निर्णायक भूमिका बजावतो, ही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हवामान बदल, भूस्खलन, हिमालयातील असंतुलन, नद्यांच्या प्रवाहातील अडथळे या प्रश्नांवरही डॉ. मोहनजी भागवत यांनी चिंता व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली निसर्गाशी असलेली नाळ तोडणे, म्हणजेच आत्मघाताचा मार्ग स्वीकारणे होय, हे त्यांचे विधान प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवण्यासारखेच आहे. जग आज अनेक संकटांना सामोरे जात आहे. युक्रेन-रशिया युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन रक्तरंजित संघर्ष, आर्थिक मंदी, हवामान बदल, दहशतवाद या समस्या कुणा एका राष्ट्रापुरत्या मर्यादित नाहीत. अशावेळी भारताची ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही भूमिकाच जगाला तारणारी ठरणार आहे. हीच दृष्टी भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शनात स्पष्ट होते. संपूर्ण विश्व एका विराट तत्त्वाने जोडलेले आहे. या दृष्टीनेच पर्यावरणीय प्रश्न, युद्धविरोधी चळवळी आणि आर्थिक समतेची वाट सापडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
धर्माचा मार्ग जगाला दाखवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. धर्म याचा अर्थ संकुचित कर्मकांड नव्हे, तर तो जीवनव्यवहाराचा संतुलित आणि न्याय्य असा मार्ग आहे. जागतिक समस्या सोडवण्यासाठी भारतीय मूल्यांवर आधारित जीवनशैलीची दिशा देणे, हीच भारताची जबाबदारी आहे. पश्चिमेतून आलेले उपभोगवाद, अति-व्यक्तिवाद आणि हिंसात्मक राजकारण या समस्यांचे मूळ आहेत. त्याला रोखण्यासाठी ‘धर्मो रक्षति रक्षितः’ हा भारतीय संदेशच योग्य ठरेल. धर्म हा फक्त पूजा-पद्धतीत, रीतिरिवाजांत नसून, धर्म म्हणजे जीवनाचा पाया आहे, हे त्यांचे उद्गार म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरतात. समाजात धर्माचा अर्थ बर्याचदा केवळ कर्मकांडापुरता सीमित करून टाकला गेला मात्र, धर्म म्हणजे न्याय, करुणा, परस्पर सहजीवन, जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. तामिळनाडूत रामाची प्रतिमा दहन करण्यासारख्या राक्षसी प्रवृत्ती याच भ्रमाचा भाग आहेत. श्रीराम हे भारतीय समाजाचे सांस्कृतिक दैवत आहे; त्याचा अवमान म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा अवमान.
भागवत यांनी सामाजिक बदलांचा मुद्दाही स्पष्ट केला. समाज बदलल्याशिवाय व्यवस्था बदलू शकत नाही. अन्याय्य प्रथा, भेदभाव, अस्पृश्यता यांचा नाश होणे हीच खरी धर्मसेवा आहे. संघाचे काम केवळ शाखांपुरते मर्यादित नसून, समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांत परिवर्तन घडवणे हेच आहे. त्यांनी पंचपरिवर्तनाचा उल्लेख करताना म्हटले की, काळानुरूप समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि राजकीय प्रणालीत बदल होतात. तथापि, हे बदल भारतीय संस्कृतीच्या मूल्याधिष्ठानाशी सुसंगत असले पाहिजेत. त्यांनी सातत्याने हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडली. हिंदू म्हणून एक झाल्याशिवाय राष्ट्राची शक्ती वृद्धिंगत होणार नाही. हिंदू समाजाची संघटित ऊर्जा हीच राष्ट्रशक्ती आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. एका विचारधारेचा हा विजय आहे.
शतकभरातील संघाचे कार्य म्हणजे काय तर समाजसेवा, राष्ट्रभक्ती, संस्कृतीचे संवर्धन आणि अखंडतेचा संघर्ष. डॉ. भागवत यांनी भाषणातून शताब्दीच्या या प्रवासाचा आढावा घेतानाच, भविष्यासाठीचे ध्येय दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आगामी काळ हा आव्हानांनी भरलेला असेल. आर्थिक वर्चस्वासाठी होणारे जागतिक संघर्ष, धार्मिक दहशतवाद, पर्यावरणीय आपत्ती, सामाजिक विषमता या सगळ्यांवर मात करण्यासाठी, भारताने आपले आदर्श जोपासले पाहिजेत. संघाची साजरी होत असलेली शताब्दी हे केवळ स्मरण नसून, नवी जबाबदारी स्वीकारण्याचा क्षण आहे. शतकभराचा अनुभव, तपश्चर्या आणि विश्वास याच्या आधारावर हे विचारांचे सोने, निश्चितच भारताच्या नव्या अध्यायाची प्रस्तावना ठरली आहे.