श्रमाचा गोडवा...

    30-Sep-2025
Total Views |

शहरातून गावाकडे जाऊन संकटांचे रुपांतर संधीत करत मधुमक्षिकापालनातून नवा व्यवसाय साकारणाऱ्या गितांजली चिखले यांच्याविषयी...

मधाचे भारतीयांच्या आयुष्यातील महत्त्व प्राचीन काळापासूनच आहे. म्हणूनच मधाला पंचामृतातील एक घटक मानले गेले आहे. देवपूजेतील पंचामृतापासून वैद्यांकडे मिळणाऱ्या औषधांमध्येही मधाचा वापर होतोच. लहानपणी औषधे घेताना या मधाचा वाटणारा आधार तर माणूस विसरूच शकत नाही. आजमितीला मधविक्री शेतकर्यांच्या आयुष्यातील आर्थिक स्रोताचे एक महत्त्वाचे साधन ठरत आहे. अशाच एक मधुमक्षिकापालक शेतकरी म्हणजे गितांजली दत्तात्रय चिखले होय!

गितांजली यांचा जन्म जुन्नरमधील हिवरे या गावात त्यांच्या मामाकडे झाला. गितांजली यांच्या बालपणीचा काही काळ जुन्नर तालुक्यातीलच धोलवड या त्यांच्या गावी गेला. मात्र, शालेय शिक्षण घेण्यासाठी गितांजली यांनी मुंबईची वाट धरली. गितांजली यांचे वडील ‘बेस्ट’मध्ये कार्यरत, तर आई गृहिणी असल्याने त्यांनी गितांजली यांच्या शिक्षणाची व्यवस्था मुंबई येथेच केली. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर गितांजली यांनी ‘डी.एड.’ पूर्ण केले. त्यानंतर गितांजली मुलुंडमध्ये एका शाळेमध्ये अध्यापनाचे काम करू लागल्या. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने कला शाखेमध्ये पदवीही मिळवली. थोडे अर्थाजन झाले असतानाच, गितांजली यांचे लग्न झाले. लग्नानंतर शहरात राहण्याची स्वप्ने रंगवत असतानाच, लगेचच काही अपरिहार्य कारणास्तव गितांजली यांना गावी यावे लागले. जुन्नरच्या विठ्ठलवाडी तालुक्यातील आंबेगाव हे गितांजली यांचे सासर होते, आता तीच त्यांची कर्मभूमीही ठरली. शहरात राहाणारी एक मुलगी गावाकडे स्थलांतरित झाल्यावर ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या प्रत्येक समस्येचा अनुभव गितांजली यांनीही घेतला. जेवणापासून, भाषेपर्यंत सर्वच पातळीवर गितांजली यांचा वैयक्तिक संघर्ष सुरू झाला होता. हे थोडेच, म्हणून त्यांच्या यजमानांनी शेती व्यवसाय करण्याचे ठरवल्याने त्यांना हातभार लावण्यासाठी शेती करणेही क्रमाने आलेच. पण, गितांजली यांचे आयुष्य शहरात गेल्याने शेतीचा संबंध आलेला तो पुस्तकातच.

त्यामुळे सुरुवातीच्या काळात शेतीमधील प्रत्येक गोष्ट त्यांना शिकावी लागली. पुस्तकी ज्ञान असले, तरी वास्तविक बदल त्यांना आत्मसात करावा लागला. शेती करताना त्यांना ‘कृषी विज्ञान केंद्रा’ची वेळोवेळी मदत झाली. गितांजली यांना शेती करताना आलेल्या प्रत्येक समस्येचे समाधान ‘कृषी विज्ञान केंद्रा’मध्ये झाले असल्याचे त्या सांगतात. एकदा शेतीतील समस्या घेऊन त्या केंद्रात गेल्या असताना, त्यांना परागीकरणाचे महत्त्व समजून आले आणि त्यासाठी ‘कृषी विज्ञान केंद्रा’ने मधुमक्षिकापालन करण्याबाबत सूचवले. त्यामुळे परागीकरण होण्यासाठी गितांजली यांनी मधुमक्षिकापालन करण्याचे ठरवले आणि त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर त्यांनी मधमाशीच्या एका पेटीपासून मधुमक्षिकापालन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये या मधमाशांचा स्वभाव, घ्यायची काळजी याबाबत माहिती असली, तरीही अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. मधमाशांच्या पेट्या सांभाळणे तसे जिकरीचे असते. या पेट्यांची वाहतूक करताना प्रचंड काळजी घ्यावी लागते. तसेच, ही वाहतूक रात्रीचे कारावी लागत असल्याने समस्यांमध्ये वाढ होते. कारण मधमाशांना जराही धोक्याची जाणीव झाल्यास त्या आक्रमक होऊन, हल्ला करण्याची शक्यता असते. अशा कितीही अडचणी आल्या, तरीही गितांजली यांनी हार मानली नाही. तसेच अनेकदा आपल्या शेतात झाडावर फुले नसल्यास, दुसर्या शेतात या पेट्या हलवाव्या लागतात. त्यामुळेच मधुमक्षिकापालकांच्या एका समूहामध्ये गितांजली सहभागी झाल्या. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ओळख वाढली आणि मधउत्पादनामध्येही वाढ झाली. मधुमक्षिकापालनामुळे परागीभवनाचा प्रश्न सुटलाच, त्याचबरोबरच मोठ्या प्रमाणात मधही मिळू लागला. त्यामुळे या मधाची विक्री करण्याचा निर्णय गितांजली यांनी घेतला. मध हा आरोग्याला लाभकारक असल्याने त्याची शुद्धता जपणे आवश्यक असल्याचे गितांजली सांगतात. आज गितांजली यांच्याकडे स्वतःच्या ७० ते ८० मधमाशीच्या पेट्या असून, मधाचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात होत आहे. गितांजली यांनी मधुशक्ती या नावाने स्वतःचा ब्रॅण्ड सुरू केला असून विविध फुलांचा तुळस, जांभूळ आणि विविध फुलांचा मध त्यांच्याकडे मिळतो. आज गितांजली यांच्याकडील मधाला मोठी मागणी असून, ती सातत्याने वाढत आहे. गितांजली मधाची विक्री करण्यासाठी विविध प्रदर्शनातही जातात. तसेच, गितांजली या परागीकरणाचीदेखील विक्री करतात. वास्तविकपणे परागीकरणामध्ये पोषणतत्त्वांचे प्रमाण मोठ्या प्रमाणत असल्याने, शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे लीलया मिळू शकतात. मात्र, आज जंकफूडच्या जमान्यामध्ये देशातील तरुणाई या नैसर्गिक घटकांपासून स्वतःला दूर नेत असल्याची खंत त्या व्यक्त करतात. यासाठीच परागकणांचे महत्त्व विविध प्रदर्शनातून तरुणाईला गेले काही वर्षे त्या समजवून सांगत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून, आज याबाबत तरुणाईमध्ये जागरुकता येत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे गितांजली सांगतात.

गितांजली यांनी त्यांच्या मुलालाही कृषी विषयाचे ज्ञान दिले असून, त्यांचे पदवीचे शिक्षणही याच शाखेतून झाले. आज तेसुद्धा गितांजली यांना त्यांच्या कामात मदत करतात. या क्षेत्रातील नवीन बदल आत्मसात करण्यासाठी विविध ठिकाणच्या शिबिरांनाही त्या जातात. गितांजली यांचे कुटुंब एकत्र पद्धतीचे असल्याने कुटुंबातील सर्वचजण त्यांना प्रोत्साहन देतात. आज गितांजली यांच्या मधाची ३०० ते ४०० किलोंची विक्री महिन्याकाठी होत असून, वर्षाकाठी जवळपास दहा ते बारा लाखांची उलाढाल यातून होते. लवकरच या व्यवसायाला प्रगत स्वरुप देऊन, त्यातून अनेकांना रोजगार देण्यासाठी सध्या गितांजली काम करत आहेत. पुढील पाच वर्षांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मधाची विक्री करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. शहरातून गावाकडे जाऊन संकटांचे रुपांतर संधीत करणाऱ्या गितांजली चिखले यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर