उत्सवाचा उत्साह

    02-Aug-2025
Total Views |

लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या स्मरणार्थ पुण्यात समारोह साजरे होत असतानाच, ज्या टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक मंडळे आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनदेखील कामाला लागले आहे. नुकतीच पोलीस आयुक्तांनी याबाबत विविध गणेशोत्सव मंडळांसमवेत मिरवणूक आणि अन्य बाबींवर सकारात्मक चर्चा करून उपाययोजनेबाबत आश्वस्त केले. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आता ठिकठिकाणी यंदा भारतीय संस्कृती संवर्धन आणि अन्य बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.

विशेष म्हणजे, दरवर्षी जो कर्कश्श गोंगाट गणेशोत्सवादरम्यान कानांवर आदळतो, तो यावेळी टाळला जावा, म्हणून अनेक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. याबाबतीत पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांनी देखील पुढाकार घेत, या सकारात्मक दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. शिवाय आगामी गोविंदा उत्सवात देखील डीजे नसेल, हे सांगून त्यांनी आपला ध्वनिप्रदूषणाबाबतीतला निर्धार व्यक्त केला. गेली काही वर्षे डीजेमुळे पुण्यातील गणेशोत्सवात सामान्य नागरिकांना आणि गणेश देखावे बघण्यासाठी येणार्‍या भाविकांना ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाला नाहक सामोरे जावे लागत असल्याने हा प्रकार बंद व्हावा, अशीच सर्वसामान्यांची भावना होती. सुदैवाने गणेशोत्सवापूर्वीच याबाबतीत सकारात्मक पावलं पडत असल्याचे बघून, गणेशमंडळांना देखील विविध देखावे सादर करण्याचा हुरूप आला आहे. वाहतूककोंडीतून या नागरिकांची उत्सवकाळात सुटका व्हावी म्हणून पोलीस प्रशासन नियोजन करीत असल्याचे दिसते.

एकूणच यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करणे आणि त्यास राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने, गणरायाच्या आगमनासाठी आणि तो समाजाभिमुख होण्यासाठी प्रत्येकजण सज्ज असल्याचे सध्या पुण्यनगरीत चित्र आहे. पुण्यात आजकाल काही वेळा चांगल्या गोष्टींना विरोधाची पद्धतही रूढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जात असताना, काहींना त्यावर केवळ आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या असतात. यातून संस्कृती-संवर्धनाची प्रक्रिया बाधित होते, हे मात्र निश्चित!

नियमांचा प्रवाह

कालपासून म्हणजे दि. १ ऑगस्टपासून नागरिकांच्या दैनंदिन खर्चात आणि बँकिंग अनुभवात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यूपीआय बॅलन्स चेक, एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ‘फास्टॅग’ पासशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. संबंधित विमा सुविधेत कपात, पंजाब नॅशनल बँकेची अंतिम मुदत आणि खासगी वाहनांसाठी ‘फास्टॅग’चा नवीन वार्षिक पास यांचा समावेश आहे. तसेच गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल दिसून येणार आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा दर ३३.५० रुपयांनी कमी केला आहे, ज्याचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबेवाल्यांना होईल. त्याचवेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र पुन्हा एकदा स्थिर ठेवल्या गेल्या आहेत. यूपीआय वापरकर्त्यांना आता कोणत्याही एका अ‍ॅपवरून दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स तपासण्याची सुविधा मिळेल.

तुम्ही दोन वेगवेगळे अ‍ॅप वापरत असाल, तर प्रत्येक अ‍ॅपवर ही मर्यादा स्वतंत्रपणे लागू केली जाईल. तसेच ‘पीक अवर्स’मध्ये (सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९:३०) बॅलन्स तपासण्याचा प्रवेश प्रतिबंधित किंवा मर्यादित केला जाईल, जेणेकरून सर्व्हरचा भार कमी होईल. एसबीआयचे क्रेडिट कार्ड नियम आजपासून बदलत आहेत. आजपासून बँकेच्या अनेक को-ब्रँडेड कार्डवर उपलब्ध असलेले मोफत हवाई अपघात विमा कव्हर बंद केले जात आहे. आता प्रत्येक यशस्वी पेमेंटनंतर, बँक स्वतः तुम्हाला एसएमएस किंवा इन-अ‍ॅप नोटिफिकेशनद्वारे तुमच्या खात्यात किती बॅलन्स शिल्लक असल्याची माहिती दिली जाईल. यामुळे दुकानदार, फ्रीलान्सर, लहान व्यावसायिकांना वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज राहणार नाही. १५ ऑगस्टपासून खासगी वाहन मालकांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध असेल. हा पास तीन हजार रुपयांना उपलब्ध असेल आणि एक वर्ष किंवा २०० टोल व्यवहारांसाठी (जे आधी पूर्ण होईल) वैध असेल. आता जर एखादा व्यवहार अयशस्वी झाला किंवा प्रलंबित असेल, तर त्याची स्थिती किमान ९० सेकंदांनंतरच तपासता येईल. दिवसातून फक्त तीन वेळा व्यवहाराची स्थिती तपासता येते. त्यामुळे या बदलांच्या अनुषंगाने आर्थिक नियोजन करणे सोयीस्कर ठरावे.

अतुल तांदळीकर