वन‘विजयी’ संशोधक

    30-Jul-2025   
Total Views | 15

कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतीशास्त्राच्या संशोधनाचे बीज रोवून नवनवीन वनस्पतींचा उलगडा करणार्या प्रा. डॉ. विजय आश्रुबा पैठणे यांच्याविषयी...

विज्ञानाच्या आवडीने वनस्पतीशास्त्रात रमलेला हा माणूस. हा माणूस आपल्या प्राध्यापकीने सध्या वनस्पतीशास्त्रात काम करणारी पुढची पिढी घडवत आहेच. परंतु, संशोधकाचा चष्मा लावून वनस्पतींच्या अनेक नव्या प्रजातींचा तो उलगडादेखील करतो. कोकणच्या अनेक अधिवासांतील वनसंपदा उलगडण्याचा वसा घेतलेला हा माणूस म्हणजे डॉ. विजय पैठणे.

पैठणे यांचा जन्म दि. २० मार्च १९८४ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या ‘सिडको’ भागात झाला. लहानपणापासूनच त्यांचा कल हा ‘विज्ञान’ या विषयाकडे. त्यांच्या या विज्ञानाच्या कुतूहलाला खतपाणी घालण्याचे काम केले तेरणा हायस्कूलचे इंग्रजी शिक्षक नंदकुमार खोत, प्रधान आणि मुंढे यांनी. विज्ञानाच्या याच कुतूहलापोटी पुढे महाविद्यालयीन शिक्षणही ‘विज्ञान’ विषयातच पार पडले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालयात, तर विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण हे शासकीय महाविद्यालयातून झाले. शासकीय महाविद्यालयात असतानाच पैठणे यांना वनस्पतीशास्त्राची वाट गवसली. यासाठी कारणीभूत ठरले, महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्राचे प्रा. डॉ. विकास गंभीरे. डॉ. गंभीरे यांचे ‘पी.एचडी’चे शिक्षण सुरू होते. त्यामुळे वनस्पती गोळा करण्यासाठी ते पैठणे यांना घेऊन जात. त्यावेळी आपले शिक्षक एखादी वनस्पती पाहिल्यानंतर त्याचे शास्त्रीय नाव किंवा गुणधर्म लगेच कसा सांगतात, याविषयीचे औत्सुय पैठण यांच्या मनात वाढत गेले. आपल्यालादेखील वनस्पतींची नावे पाठ हवीत, या ज्ञानेच्छेने त्यांनी वनस्पतीशास्त्रातच अभ्यास करण्याचे ठरविले. मग प्राध्यापक असो वा वरिष्ठ वर्गात शिकणारे विद्यार्थी, त्यांच्यासोबत वनस्पती गोळा करण्यासाठी जंगलाच्या वार्या सुरू झाल्या. पदवी शिक्षणानंतर २००४-०५ साली कोल्हापुरातून ‘बीएड’चे शिक्षण पूर्ण केले. मात्र, डॉ. पैठणे यांचे मन वनस्पतींचा पिच्छा काही सोडेना! त्यामुळे मनाचे ऐकून त्यांनी वनस्पतीशास्त्रामध्येच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी प्रवेश मिळवला.

पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणादरम्यान पैठणे यांना डॉ. दिलीप पोकळे, डॉ. रवी पाटील, डॉ. मिलिंद सरदेसाई आणि डॉ. अरविंद धाबे यांसारखे गुणी शिक्षक मिळाले. पैठणे यांनी पुढे जाऊन वनस्पतींच्या संशोधनाकडे वळावे, अशी शिक्षकांची इच्छा होती. मात्र, मुलाने शिक्षकी पेशात जावे, याविषयी त्यांचे वडील ठाम होते. त्यामुळे डॉ. धाबे यांनी पैठणे यांच्या वडिलांची समजूत काढली आणि वनस्पती संशोधनाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. २००८ साली पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. अनिल भुकतार यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ‘पी.एचडी’चे संशोधन सुरू केले.

२००९ ते २०१५ हा कालावधी डॉ. पैठणे यांना वनस्पतीशास्त्राची दृष्टी प्रदान करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरला. याच काळात त्यांनी वनस्पतीशास्त्राच्या अनुषंगाने परिणामकारक असे काम केले. ‘पी.एचडी’ शिक्षणादरम्यान त्यांना ‘राजीव गांधी राष्ट्रीय फॅलोशिप’ मिळाली. या फॅलोशिपअंतर्गत त्यांनी पुण्याच्या ‘आघारकर संशोधन संस्थे’च्या औषधी वनस्पतीच्या प्रकल्पामध्ये नांदेड विद्यापीठात ‘रिसर्च फॅलो’ म्हणून काम केले. ही फॅलोशिप संपत असतानाच त्यांना ‘सिनिअर रिसर्च फॅलोशिप’देखील मिळाली. या दरम्यानच्या कालावधीत त्यांना ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ वी.एन.नाईक यांचेदेखील मार्गदर्शन मिळाले. मुंबईच्या झेव्हिअर्स महाविद्यालयाचे डॉ. अलमेडा यांच्यासोबत गडचिरोलीत जाऊन वनस्पती गोळा करण्याचे कामही त्यांनी केले. सोबतच विवेकानंद आणि देवगिरी या दोन्ही महाविद्यालयात शिकवण्याचेदेखील काम केले. २००९-१५ या कालावधीत त्यांनी १८ राज्ये पालथी घातली. या माध्यमातून १ हजार, २३४ वनस्पती गोळा केल्या. विवेकानंद महाविद्यालयात त्याचे ‘हर्बेरियम’ तयार केले. २०१५ साली त्यांच्या ‘पी.एचडी’चे संशोधन पूर्ण झाले आणि त्यांना ‘डॉटरेट’ मिळाली.

२०१५ साली डॉ. पैठणे यांनी वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची प्राध्यापकी स्वीकारली. पैठणे यांचे आजवर २८ शास्त्रीय संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी वनस्पतींच्या तीन नवीन प्रजातींचा उलगडादेखील केला आहे. ‘एरिओकॉलॉन गुलनारपेरियनम’ (भूईगोंडा) या प्रजातीला आपल्या विद्यार्थिनीचे नाव, ‘डिमेरिया आनंदीबाईंना’ या प्रजातीला आपल्या महाविद्यालयाचे नाव आणि ‘क्रोटालेरिया ऑरिसेन्सिस वर var नाईक’ या प्रजातीला आपल्या मार्गदर्शकाचे नाव त्यांनी दिले. तसेच, महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी नवीन अनेक वनस्पतींची पहिल्यांदा नोंद केली. तसेच डॉ. पैठणे यांनी गवतांच्या ३०० प्रजातींची नोंद केली असून, याचदरम्यान त्यांना ‘डिमेरिया आनंदीबाईंना’ ही गवताची नवीन प्रजात मिळाली होती. सध्या पैठणे सिंधुदुर्गचा समृद्ध प्रदेश पालथा घालत आहेत. जिल्ह्यात फिरून त्यांनी वनस्पतींच्या ७२० प्रजातींची नोंददेखील केली आहे. या वनस्पतीचे ‘हर्बेरियम’ वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तयार केले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात रमणारा हा माणूस सध्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचे बीज रोवत आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121