ही कहाणी आहे अशा माणसाची जो महिलांच्या ‘त्या’ काळातील वेदनांची जाणीव ठेवून, त्या कमी व्हाव्यात म्हणून झटत आहे.
रस्त्यावर आपले घर करून राहणारी अनेक कुटुंब आजुबाजूला दिसून येतात. एक तरुण त्या घरातील लहान मुलांसाठी खाऊ ठेवून जातो. रात्री थंडी-पावसात उघड्यावर अनेकजण झोपतात. त्यांच्या अंगावर तो मायेने पांघरूण घालतो. आदिवासी महिलांसाठी एखादा लघु उद्योग उभा राहतो आणि हाच तरुण महिलांच्या समस्यांबद्दल जागृतीसाठी देशभर भ्रमंतीही करतो. या तरुणाचे नाव आहे, सचिन आशा सुभाष. सचिन मूळ सोलापूरचा. ‘बीए राज्यशास्त्र’, ‘बीए जर्नलिझम’, ‘एलएलबी’ या पदव्या मिळवलेला सचिन महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती करीत आहे. ‘समाजबंध’ या नावाने कपडे संकलन करणारी माणुसकीची पहिली भिंत पुण्यात सुरू केली. ही भिंत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयाजवळ होती. ‘नको ते ठेवून जा आणि हवे ते घेऊन जा,’ या संकल्पेनेवर आधारित या माणुसकीच्या भिंतीला पुणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद केला.
भारतातील ५२ टक्के महिला आजही मासिक पाळीमध्ये पॅड वापरत नाहीत. महिलांनी मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होण्यापासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत कितीतरी आजार होतात. परिणामी, आजारी महिलेचे गर्भाशय काढावे लागते. त्यामुळे सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे दुष्परिणाम त्या महिलेच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. सचिनच्या स्वतःच्या आईला तशा जंतुसंसर्गामुळे तरुण वयात गर्भाशय काढावे लागले होते. त्यामुळे त्या आजाराच्या गांभीर्याची सचिन यांना पुरती जाणीव आहे. महिला मासिक पाळीत योग्य काळजी का घेत नाहीत, याचा अभ्यास करताना ‘समाजबंध’ टीमला जाणवले की, एकतर ग्रामीण आदिवासी महिलांना मासिक पाळीत वापरण्यासाठी महागडे पॅड विकत घेणे परवडत नाही आणि जरी ते गावात ‘केमिस्ट’कडे उपलब्ध असले, तरी त्या ते घेण्यास सामाजिक लज्जेमुळे दुकानात जात नाहीत. घरातील पुरुषही ते आणून देत नाहीत. ‘समाजबंध संस्थे’ने देशभरातील उपलब्ध पॅडचा अभ्यास करून, चाचण्या घेऊन अखेर कापडी ‘आशा पॅड’ विकसित केले आहे.
‘समाजबंध’ ही संस्था सुरू करताना सचिनला खूप मेहनत करावी लागली. त्याच्या मेहनतीची दखल घेत अनेकांनी टाकाऊ कपड्यांची मदत केली, तर कोणी छोटा टेम्पो सचिनला दिला. कापडी पॅड बनवण्यासाठी शिलाई मशीनसाठी अनेकांनी मदत केली. यातून सचिनने ‘समाजबंध’ गावागावांत पोहोचविले. ‘समाजबंध’ पुण्याबाहेरील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पोहोचले. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न आदिवासी पाड्यांवर अधिक गंभीर आहे.
सचिनला हे काम करण्याची प्रेरणा त्याच्या आईमुळे मिळाली. आईला तो धरून तीन मुले. त्याने तिच्या वेदना लहानपणापासून बघितल्या होत्या. पूर्वी साड्या प्युअर कॉटनच्या असायच्या. त्या कापडाचे पॅड घडी करून घेतले, तरी त्रास होत नसे. नंतर टेरिकॉटचे कापड आले. त्याची शोषणक्षमता कमी, ते आरामदायक नाही. घटस्फोटित, गरजू, विधवा महिलांचा कात्रज येथे चालणारा स्वयंसिद्ध, स्वयं अर्थ-साहाय्यित पुनर्वसन प्रकल्प आहे. त्यानंतर पुण्यातील भिंतीचा उपक्रम बंद झाला. सचिनच्याच शब्दात सांगायचे झाले, तर घरातील जुन्या कपड्यांपासून साध्या शिलाई मशीनवर स्वतःच्या घरात बनवता येतील असे पर्यावरणपूरक, पुनर्वापर करण्यायोग्य, जमिनीत विघटित होऊ शकतील असे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केमिकल जेल किंवा प्लास्टिक घटकविरहित कापडी पॅड म्हणजे ‘समाजबंध’चे ‘आशा पॅड.’ ‘आशा पॅड’ शहरातून जमा केलेल्या जुन्या कपड्यांपासून ‘समाजबंध’च्या पुण्यातील कात्रज येथील प्रकल्पामध्ये बनवली जातात. तेथे काही स्थानिक गरजू महिलांना रोजगारही मिळाला आहे. सचिन अनेकदा मासिक पाळीविषयी महिला व किशोरवयीन मुलींचे समुपदेशनदेखील करतो. त्यामध्ये मुलींना मासिक पाळी कशी व का येते येथपासून ते मासिक पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, कशी निगा राखावी इत्यादी सर्व विषयांची माहिती दिली जाते. महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण देऊन, आदिवासी व ग्रामीण भागात जाऊन महिला-मुलींचे समुपदेशन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. तशा एक तासाच्या समुपदेशनानंतर महिलांना वापरून पाहण्यासाठी ‘आशा पॅड’चे मोफत वाटप करण्यात येते. त्यानंतर पॅड कसे बनवावे याचे प्रशिक्षण शिलाई मशीनवर देण्यात येते.
‘समाजबंध’चे काम सध्या पुणे जिल्ह्यातील वेल्हा, पुरंदर व मावळ या आदिवासीबहुल तालुयांमध्ये सुरू आहे. पालघरमधील जव्हार, डहाणू, रत्नागिरी, चंद्रपूर, मेळघाट या दुर्गम भागांतही प्राथमिक समुपदेशन व पॅडवाटप कार्यक्रम घेतले गेले आहेत. त्याठिकाणी स्थानिक टीम बांधणी व्हावी, असे प्रयत्न आहेत. कात्रज येथील प्रकल्पात जमा झालेल्या जुन्या कपड्यांवर प्रक्रिया करून महिला आरोग्य, पर्यावरण, पुनर्वापर आणि स्वयंरोजगार या चार घटकांवर प्रामुख्याने काम होते. मनोरुग्ण, अनाथालय, पुनर्वसन प्रकल्प, नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटकांवर काम करणार्या संस्थांना जमा झालेल्या कपड्यांतील वापरण्यायोग्य कपडे दिले जातात. ज्या कपड्यांची पॅड बनत नाहीत; तसेच जे कपडे वापरताही येत नाहीत अशा कपड्यांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या तयार केल्या जातात. त्या पिशव्यांच्या विक्रीतून प्रकल्पाच्या खर्चाला हातभार लागतो. सचिन स्वतःच्या पैशांवरच सर्व काम करत आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
शशांक तांबे
संपर्क: ७७०९४८८२८६