
आज केवळ गुण मिळवण्यासाठी शिकली जाणारी आणि फक्त ग्रंथांमध्ये सीमित राहिलेली देववाणी संस्कृत ही ‘जनवाणी’ व्हावी, म्हणून सर्वसामान्यांना संस्कृत संभाषणासाठी प्रवृत्त करणाऱ्या समष्टि गुब्बि हिच्याविषयी..संस्कृतमध्ये ‘पीएच.डी.’ केलं तर ती पदवी फक्त माझ्यासाठी राहील. त्यापेक्षा मला त्याच वेळात लोकांना संस्कृतची ओळख करून देत देशासाठी, संस्कृतसाठी कार्य करायचे आहे असे समाजाभिमुख विचार आहेत अवघ्या २४ वर्षांच्या संस्कृतसेविका समष्टि गुब्बि हिचे. ‘गुब्बि’ म्हणजे चिमणी! म्हणून तिने आपल्या सोशल मीडिया चॅनेल्सचे नावही ‘संस्कृत स्पॅरो’ असेच ठेवले आहे.
समष्टि कर्नाटकातील कोप्पल गावात राहते. पाचवीत असतानाच तिने प्रथम कोणालातरी संस्कृतमध्ये बोलताना ऐकलं. तेव्हा तिला कळलं की, संस्कृतमध्ये संभाषणही होऊ शकतं! मग ‘गीतगोविंद संस्कृत संघ’, ‘संस्कृतभारती’ इत्यादी संस्थांची छोटी-मोठी शिबिरं, वर्गांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिला संस्कृतबद्दल रुची निर्माण झाली. तिने आपल्या मैत्रिणींना एकत्र करत, संस्कृतमध्ये संभाषण करण्यास प्रवृत्त केले. घरी आई, बाबा आणि दादासुद्धा अधेमध्ये संस्कृतात संवाद साधायचे. समष्टि यांच्या कुटुंबीयांचा संस्कृतला पाठिंबा असल्याने, ती दहावीपासूनच संस्कृत संभाषण शिकवू लागली. पुढे तिने ‘व्याकरण’ विषय घेऊन, संस्कृतमध्येच पदवीही संपादन केली.
याच काळात समष्टिने लॉकडाऊनमधील विरंगुळा आणि मजा म्हणून, काही रील्स बनवले. ‘ीींहररूळ.ळप’ नावाचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. त्यात ती विविध गाण्यांचं संस्कृत भाषांतर करणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फूड व्लॉग्स, ‘गेट-रेडी-विथ-मी’ अशा सर्व प्रकारच्या रील्सची निर्मिती तिने संस्कृतमध्येच केली.
वेगवेगळे प्रयोग करून बघताना २०२३ साली बंगळुरुमध्ये तिने, ‘रन फॉर संस्कृतम्’ मॅरेथॉन घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यात तब्बल ५०० लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. तेव्हा समष्टिने विचार केला की, मॅरेथॉनला मिळाला तसाच प्रतिसाद बाईक राईडलाही मिळू शकेल! असे करत अष्टपैलू समष्टिने, आपल्या सगळ्या मित्रांना संस्कृतच्या माध्यमातून एकत्र आणलं आणि ‘संस्कृत रायडर्स लब’ची स्थापना केली.
यामध्ये समष्टि एक किंवा दोन-तीन दिवसांची राईड आयोजित करते. रायडिंग आवडणारा कोणीही त्यात सहभागी होतो. तिथे त्यांना संस्कृतची ओळख करून दिली जाते. राईडच्या वेळी गप्पा मारणे, गाणी म्हणणे या सगळ्यासाठी संस्कृतचाच आग्रह धरत, समष्टि हलया-फुलया माध्यमातून लोकांना संस्कृत संभाषण शिकवण्याचा प्रयत्न करते. संस्कृत गाणी म्हणण्यासाठीही समष्टि तरुणांना प्रोत्साहित करते.
एका दिवसात ऐकलेल्या संस्कृतचा विसर पडू नये, यासाठी त्याचा नित्य सराव आवश्यक होता. म्हणून तिने दर रविवारी बंगळुरुमधील ‘कब्बन पार्क’मध्ये भेटून, दोन तास संस्कृतमध्ये गप्पा मारायचाही नेम केला. पहिल्यांदा फक्त ती आणि तिचे काही मित्र एवढेच जण आले. आपल्या गप्पांची त्यांनी एक रील बनवली आणि ती एक रीलच समष्टिला प्रसिद्धी देऊन गेली. रीलला खूप छान प्रतिसाद मिळाला. पुढच्या रविवारपासून साधारण ९०-१०० लोक, स्वतःहूनच ‘कब्बन पार्क’मध्ये जमू लागले. संस्कृत बोलता न येणारे संस्कृतप्रेमीही, त्यात सहभागी होऊ लागले. संस्कृतशी तोंडओळख झाल्यानंतर पुढे शिकण्यासाठी एक मार्गदर्शक आणि व्यासपीठ आवश्यक असते. संभाषणाचा सराव करायला सोबती लागतात, तेच मला लोकांना उपलब्ध करून द्यायचं होतं असं समष्टि सांगते.
या साप्ताहिक मिलन कार्यक्रमाात, सर्वप्रथम स्वतःची संस्कृतमध्ये ओळख े आणि काही दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींची नावे सांगितली जातात. व्याकरणातील काही सोप्पे मुद्दे शिकवले जातात. ‘वर्तमानकाळ’ हा मुद्दा घेतला, तर लोकांना वर्तमानकाळातील वाय तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ‘ट्रान्सलेशन टास्क’, वादविवाद स्पर्धा, संस्कृतमध्ये संकेत देत ‘दमशेराज’ असे भाषेचा स्तर वाढणारे, छोटे छोटे खेळ घेतले जातात. त्याचबरोबर ‘पर्वतमध्ये अग्निरस्ति, धावन्तु धावन्तु’ असे म्हणत, ‘डोंगराला आग लागली पळापळा’सुद्धा खेळले जाते. यात लोकांच्या मनात कुठेही न्यूनगंडाची भावना उत्पन्न होऊ नये, म्हणून संस्कृतसाठी अनभिज्ञ, अल्पज्ञ आणि तज्ज्ञ असे तीन गट करून हे खेळ खेळले जातात.
हे उपक्रम सुरुवात केल्यापासून अगदी चार-पाच आठवड्यांतच, समष्टिच्या उपक्रमाबद्दल वर्तमानपत्रात बातम्या, लेख येऊ लागले. एप्रिल २०२४ मध्ये अवघ्या आठजणांसह सुरू केलेल्या या उपक्रमाचे चित्रिकरण करायला, अवघ्या तीन-चार महिन्यांनी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये एक दिवस अचानक ‘डीडी नॅशनल’चे वार्ताहरही आले. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ते आपल्या उपक्रमाचा उल्लेख करणार आहेत, हे वार्ताहरांकडून ऐकून समष्टि हरखूनच गेली. त्या दिवशी जमलेल्या सर्व संस्कृतप्रेमींसह बागेतच ‘मन की बात’ ऐकत तिने, त्या अविस्मरणीय क्षणाचा आनंद साजरा केला.
आपली ‘थिएटर’ची आवड जपत, आज समष्टि ‘मित्रम्’ नावाचा संस्कृत चित्रपट काढण्यास प्रयासरत आहे. आजघडीला चित्रपट हे भाषेची गोडी लागण्याचं, किंबहुना भाषा शिकण्याचं माध्यम झालं आहे. म्हणून समष्टि माध्यमक्षेत्रात संस्कृतचा आवाका वाढवण्यासाठी झटत आहे. लवकरच तो चित्रपट प्रसिद्ध होवो आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून समष्टिला शुभेच्छा!
ओवी लेले
९८६९३४५७५३