आयुष्यभर कष्ट आणि संघर्ष करून मिळालेला आनंद इतरांच्या नशिबातही आणण्यासाठी झटत, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी झटणार्या सविता कारंडे यांच्याविषयी...
मानवी आयुष्य म्हणजे संघर्ष आणि यश यांचा अद्भुत संगम. बालपणापासून तारुण्यापर्यंत आणि प्रौढत्वापासून वृद्धत्वापर्यंत मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, नवनवीन आव्हाने समोर उभी राहतात. कधी नात्यांचे ओझे, कधी आर्थिक ताण, तर कधी सामाजिक अपेक्षा या सगळ्या लाटांना सामोरे जाताना, माणूस स्वतःला पुन्हा पुन्हा घडवत राहतो. आलेले अपयश शेवट नसून, जीवनाच्या नव्या सुरुवातीची पायरी ठरते. संघर्षातून मिळालेलं यश अधिक गोड वाटतं. कारण त्यात श्रम, धैर्य आणि चिकाटी असते. म्हणूनच म्हणतात, अडचणींशिवाय मानवी आयुष्य बेचव होईल आणि संघर्षाशिवाय यशाच्या निर्भेळ आनंदाची गोडी चाखायला कधीच मिळणार नाही. असाच संघर्ष सविता सूर्यकांत कारंडे यांच्या वाट्यालाही आला. सविता यांचा जन्म सातार्यातील पांदेवाडी या खेड्यात झाला. वयाची अवघी दीड वर्ष झाली असताना, सविता यांच्या जीवनातून पितृछत्र हरपले.
पदरी असलेल्या चार लेकरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेऊन संसाराचा गाडा हाकण्याची मानसिक तयारी आईने दाखवली, तोच दुसरा धक्का सविता यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागला. त्यांचे गावाकडील राहते घरच अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामध्ये नुसते घरच नाही, तर सविता यांच्या कुटुंबाची उमेदही भस्म झाली. या घटनेचा सविता यांच्या आईंना प्रचंड मानसिक धक्का बसल्याने, त्यांची मानसिक स्थिती खालावली. त्यामुळे घरामध्ये सविता यांच्या आजीवरच सर्व जबाबदारी आली. सुनेचे उपचार आणि चार नातवंडांचा सांभाळ एकाचवेळी करणे, वयोमानानुसार सविता यांच्या आजीला शक्य नव्हते. त्यामुळे सविता यांच्या मामा आणि आत्यांनी एकत्र येऊन चारही भावंडांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. सविता लहान असल्यामुळे त्यांच्या आईबरोबर मुंबईमधील शीव येथे आल्या. शीव रुग्णालयातच सविता यांच्या आईंवर उपचार सुरू होते. काही दिवसांतच सविता यांच्या आईंची प्रकृती सुधारली. मात्र, आयुष्य जगण्याचा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर कायमच होता.
अशा वेळी पुन्हा एकदा सविता यांच्या आत्याने पुढाकार घेऊन एक पर्याय त्यांच्यासमोर ठेवला; तो म्हणजे माथेरान येथे स्थलांतरित होण्याचा. माथेरान येथे सविता यांच्या आत्याचा पादत्राण निर्मितीचा व्यवसाय होता. त्यांच्या घरातील लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकजण या व्यवसायामध्ये शक्य ते योगदान देत असे. आत्याने याच व्यवसायात जम बसवण्याचे सूचवले. हा सल्ला योग्य मानून सविता यांची आई आणि चारही भावंडे माथेरानला वास्तव्यास आली. यानंतर सविता आणि त्यांची भावंडे माथेरान येथे पादत्राणे विकू लागली. आत्याने त्यांच्याच शेजारी कच्चे मातीचे घरही उभारून दिले. त्यानंतर सविता यांच्या आईला पादत्राणेनिर्मितीचे कौशल्यही शिकवले. त्यानंतर सविता यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न काहीसा सुटला. यामुळेच सविता आणि त्यांच्या भावडांचे शिक्षणही सुरू झाले. वर्षाला मिळणार्या एक जोडी कपड्यावरच सविता यांनी दहावी पूर्ण केली. घरामध्ये पादत्राणेनिर्मितीचा व्यवसाय असूनही, पायांत चपला घालण्याची चैन सविता यांना परवडणारी नव्हती. दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्याच्या सविता यांच्या इच्छेलाही न्याय देणे घरातील परिस्थितीमुळे शक्य झाले नाही.
लहानपणापासून समोर वाढलेली आणि संस्कारी कन्या म्हणून आत्यानेच सविता यांचा सून म्हणून हसतमुखाने स्वीकार केला. सविता यांचा संसार सुरू झाला. सविता यांचे सासर सुरुवातीपासूनच पादत्राणे व्यवसायात कार्यरत होते. सविता यांनाही या कामाचा अनुभव असल्याने, त्यांनीही लगेचच या कामामध्ये सहकार्य करण्यास सुरुवात केली. कालौघात सविता यांच्या संसाररुपी वेलीवर दोन फुलेही फुलली. सविता यांनी या दोन्ही मुलांना उच्चविद्याविभूषित करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवले. सविता यांच्या सासरची परिस्थिती तुलनात्मकदृष्ट्या बरी असली, तरीही चांगल्या शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी सविता आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक कठोर परिश्रम करावे लागले. सविता यांच्या अपत्यांमधील गुण पाहून, एका स्वयंसेवी संस्थेच्या चालकांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षणाचे अर्धे शुल्क भरले.
या काळामध्ये सविता यांनी प्रचंड परिश्रम घेतले. एकीकडे संसाराचा गाडा हाकताना, दुसरीकडे व्यवसायही वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या काळात अनेक अडचणींचा सामनाही त्यांना करावा लागला. दरम्यानच्या काळात काही आपत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना राहते घरही विकावे लागले मात्र, त्यांनी स्वतःचे राहते घर विकून कुटुंबाला प्राथमिकता दिली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी नेरळ येथे वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी भाड्याच्या जागेमध्ये राहण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद योजने’च्या मदतीने त्यांनी आदिवासी बचत गटामध्ये प्रवेश मिळला. मुंबईतील एका प्रदर्शनामध्ये पादत्राणांची विक्री करून एक लाखापेक्षा जास्त कमाई दहा दिवसांत केली. ही त्यांची आजवरची सर्वांत मोठी कमाई होती. ही कमाई नवर्याच्या हाती देताना दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते, अशी आठवण सविता सांगतात. आज वर्षाला १५ लाखांपेक्षा अधिक कमाई व्यवसायातून त्या करत आहेत. आज नेरळ येथेच त्यांनी स्वतःचे घरही घेतले आहे. सविता यांना आयुष्यात ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्या अडचणी इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी महिलांना मार्गदर्शन करत आहेत. वर्षाला पाच महिलांना उद्यमी बनवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. एक महिला स्वावलंबी झाल्यास, संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होते. त्यामुळे महिलांनी प्रामाणिकपणाने त्यांच्या ध्येयावर निष्ठा ठेवली पाहिजे, असे सविता सांगतात. आयुष्यभर कष्ट आणि संघर्ष करून मिळालेला आनंद इतरांनाही अनुभवायला मिळावा, यासाठी झटणार्या सविता कारंडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
कौस्तुभ वीरकर
(अधिक माहितीसाठी संपर्क- ९४२३८२२०३२)