‘परतवारी’चा ‘माधव’ सूर

    11-Sep-2025
Total Views |

आषाढी एकादशीनंतर पुनश्च वारीची आध्यात्मिक अनुभूती प्रदान करणार्‍या ‘परतवारी’ या सांगीतिक आविष्काराचे संगीतसाधक माधव लिमये यांच्याविषयी...

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी संगीतसाधनेचा श्रीगणेशा करीत, आज सातासमुद्रापार भारतीय संगीताला घेऊन गेलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव लिमये. लहानपणापासून वडिलांसोबत कीर्तन, प्रवचन, तसेच अभंगवाणी या कार्यक्रमांना हजेरी लावत, संगीत क्षेत्राची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तेव्हापासून आजतागायत संगीत शिक्षणापासून ते संगीताच्या जगभर प्रसारासाठी माधव लिमये प्रयत्नशील आहेत.

आध्यात्मिक कुटुंबात बालपण गेलेल्या माधव यांना लहानपणापासूनच संगीत क्षेत्रातील सप्तसूरांचे विश्व खुणावत होते. संगीत ऐकण्याची आवड तर होतीच. पण, लहानपणापासून वडिलांसोबत कीर्तन, प्रवचन तसेच अभंगवाणी या कार्यक्रमांना हजेरी लावल्याने संगीताची गोडी लागली. माधव तसे मूळचे पंढरपूरचे. पंढरपूर ही विठुरायाची नगरी. या आध्यात्मिक नगरीचा वारसा लाभल्यामुळे माधव यांचे अभंग, ओव्या तोंडपाठ आहेत. माधव यांनी द. ह. कवठेकर प्रशालेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असताना शालेय स्नेहसंमेलनात रंगमंचावर विविध कार्यक्रम सादर करण्याचा त्यांचा आत्मविश्वासही दुणावत गेला. ज्येष्ठ संगीत विशारद चंद्रकांत पांडव यांच्याकडून माधव यांनी संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. संगीत शिकताना आपल्याला किमान एक तरी वाद्य वाजवता यायला हवे, असा विचार करून ‘पेटी’ हे वाद्य शिकण्याचे माधव यांनी ठरविले. संगीत साधनेसोबतच पेटीवादनाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर संगीतात अजून शिक्षण घ्यायला पाहिजे, हा विचार करून माधव यांनी पुणे गाठले. पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी ‘संस्कृत’ विषयात पदवी मिळवली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यापीठातून ‘संवादिनी’ विषयात ‘एमए’चे शिक्षणदेखील पूर्ण केले. पुढे भारत सरकारकडून सलग पाच वर्षे संगीत क्षेत्रात माधव यांनी शिष्यवृत्तीही मिळवली.

दुसरीकडे समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, असे बाळकडू माधव यांना घरातून मिळाले होतेच. त्यानुसार त्यांनी त्यांची वाटचाल सुरुच ठेवली. शिक्षण तर पूर्ण झाले. परंतु, संगीतक्षेत्रात खूप काम करायचे आहे, ही इच्छा मात्र माधव यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मूळचे पंढरपूरचे असल्यामुळे वारकरी, अभंग आणि संतांबाबत अतीव आदर आणि जिव्हाळा हा नैसर्गिकपणेच होता. त्यामुळे सर्वांपर्यंत अभंगातील संतांची शिकवण पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला हवेत, हा निश्चय माधव यांनी केला आणि त्यादृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला.

एकीकडे आजची तरुणाई संगीत संस्कृतीचे चुकीच्या पद्धतीनेही अनुकरण करताना दिसते. ते माधव यांना बघवत नव्हते. परंतु, त्यासाठी नेमके काय करावे, हा मार्ग सूचत नव्हता. यामुळे ‘परतवारी’ हा अभंग आधारित उपक्रम सुरू करण्याचे माधव यांनी ठरवले. आपल्या संतांचे अभंग अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘परतवारी’चा उदय झाला. आषाढी एकादशीनंतर ‘वारी’ हा विषय श्रोत्यांच्या डोयातून निघून जातो. त्यामुळे एकादशीनंतरदेखील ‘वारी’ मनात घर करून राहिलीच पाहिजे, यासाठी माधव श्रोत्यांसाठी ‘परतवारी’ हा कार्यक्रम आयोजित करतात. हा कार्यक्रम आषाढी एकादशीनंतर पुन्हा एकदा वारीचे भक्तिमय चित्र श्रोत्यांच्या डोळ्यासमोर आणतो. वारकरी संप्रदायातील श्रोते या उपक्रमात हिरिरीने सहभागी होतात आणि अभंगाचे सादरीकरण ऐकून त्यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावतात. माधव यांनी या उपक्रमाची आखणीच अशी केली आहे की, अभंगांच्या माध्यमातून पंढरीची वारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभी राहते आणि प्रत्येक भक्ताच्या मनात पांडुरंगाच्या भेटीची आस निर्माण होते. अशा या ‘परतवारीचे’ यंदाचे तिसरे वर्ष होते.

केवळ देशातच नाही, तर अगदी परदेशातून या अनोख्या उपक्रमासाठी माधव यांना खास आमंत्रित केले जाते. परदेशातील भारतीय विशेषतः मराठी श्रोतेवर्ग आपली संस्कृती सातासमुद्रापार जपण्यास इच्छुक असतात. परदेशात वारी, गणेशोत्सव, गुढीपाडवा असे सण-समारंभही ही मंडळी अगदी उत्साहाने साजरे करतात. अशावेळी भारतीय पारंपरिक संगीताचीही खूप आवश्यकता असते. ‘परतवारी’ उपक्रमाची ख्याती इतकी की, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई या देशांमधील परदेशस्थ भारतीयांनीही माधव यांना त्या-त्या देशात सादरीकरणाचे आग्रहाचे निमंत्रण दिले. इतकेच नाही तर माधव यांची परदेशात गायनासाठी जाण्याची तयारी सुरू आहे.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीतामध्ये स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करण्याची माधव यांची इच्छा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या श्रवणाने मनःशांती प्राप्त होते. कारण, संगीत ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून, त्या संगीताचा उपयोग हा आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारे केले जातो. त्यासाठीच माधव यांचीही अवघे आयुष्य समर्पित करण्याची इच्छा आहे. लोकांपर्यंत चांगल्या सांगीतिक कल्पना आणि वेगवेगळे प्रयोग हे कार्यक्रमांच्या नियोजनातून, आयोजनातून समोर आणण्याची माधव यांची इच्छा आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत भारताच्या कानाकोपर्‍यात आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. माधव यांच्या या संगीतमयी कार्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेकानेक शुभेच्छा!

शशांक तांबे
७०५८८६७६१६