विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणार्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणार्या अनंत बेदरकर यांच्याविषयी...
जोखीम पत्करणं ज्याच्या प्रवृत्तीत आहे, अडथळ्यांना संधी मानणं ज्याच्या स्वभावात आहे, तोच खरा उद्योजक. कल्पकता, जिद्द आणि ध्येयाची उर्मी याच्या जोरावर तो सातत्याने नव्या वाटांच्या शोधात असतो. अपयशातून तो शिकतो आणि यशाची नवी परिभाषाही घडवतो. केवळ नफा मिळवणं हेच उद्दिष्ट नसतं; तर समाजाला दिशा देणं, रोजगारनिर्मिती करणं आणि नव्या संकल्पनांना मूर्त रूप देणं हेच त्याचे ध्येय असते. उद्योजक हा समाजातील बदलाचा सूत्रधार असून, त्याच्या धाडसामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नवे आयाम मिळतात. असेच एक उद्योजक म्हणजे अनंत बेदरकर!. व्यवसाय करण्याचे ठरवून त्यात यशस्वी होण्याचे भाग्य फार कमीजणांना लाभते, अनंत बेदरकर त्यांपैकीच एक!
अनंत यांचे बालपण मुंबईतील दहिसर येथे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात गेले.शालेय शिक्षण दहिसर विद्यामंदिर येथे पूर्ण केल्यानंतर अनंत यांनी बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी वाट धरली ती अभियांत्रिकी क्षेत्राची. त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पदवी संपादन केली. माणसाचे शिक्षण झाल्यावर अर्थार्जनाची सुरुवात अनिवार्य होते. त्यामधून अनंत यांनाही जावे लागले. सुरुवातीच्या काळामध्ये अनंत यांनी अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र, मनामध्ये उद्योगाचे विचार रुंजी घालत होतेच. परिणामी अल्पकाळातच अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी नोकर्या केल्या आणि सोडल्याही. अखेरीस एकदा त्यांच्या मित्राने अग्निसुरक्षा क्षेत्रातील कंपनीमध्ये कामाची संधी अनंत यांना सांगितली. त्यावेळी सुरुवातीला व्यवसाय करायचा असल्याने आणि त्या क्षेत्रातील शिक्षण नसल्याने अनंत यांनी नकार दिला. मात्र, मित्राने अधिक समजवल्यावर अनंत त्या कंपनीमध्ये रुजू झाले. हीच घटना अनंत यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आजवर काहीही ज्ञान नसलेल्या क्षेत्रामध्ये संधीचे अवकाशच अनंत यांची वाट पाहत होते.
मुळातच उद्योजकासारखा स्वभाव असल्याने संधी साधणे हे त्यांना उत्तम जमले. अग्निसुरक्षा क्षेत्रातील सर्व ज्ञान आणि अनुभव घेताना या क्षेत्रात आपल्यालाही स्वतःहून बरेच काही करता येण्यासारखे आहे, असा विचार अनंत यांनी केला. त्यावेळी घरामध्ये अनंत यांच्या विवाहाची चर्चा सुरू होती. त्यामुळे पुढील आपल्या योजना लक्षात घेऊनच अनंत यांनी नोकरी असलेल्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. साधारणतः १९९२ सालच्या आसपास अनंत यांची ही मागणी थोडी क्रांतिकारी वाटावी अशीच! घरच्यांनी यावर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनंत त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. अखेरीस मनासारख्या जोडीदाराशी विवाह केल्यानंतर अवघे चार महिने नव्या संसाराचे होतात, तोच अनंत यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
अनंत यांचा हा निर्णय घरच्यांसाठी धक्कादायक असाच होता. मात्र, काही निर्णय हे आयुष्याची दिशा आणि दशा बदलवणारे ठरतात, हेच अनंत यांच्या या निर्णयाने भविष्यात सिद्ध केले. नोकरी सोडल्यानंतर इतके दिवस मनात रुंजी घालणारा व्यवसायाचा विचार अनंत यांनी घरच्यांसमोर मांडला. त्यांच्या घरच्यांसाठी हा एक अजूनच मोठा धक्का होता. उद्योगाचे वेड आजसारखे त्यावेळी पसरलेले नव्हते. त्यातच अनंत यांचे मध्यमवर्गीय मराठी कुटुंब, त्यामुळे भांडवलापासून सगळेच प्रश्न आ वासून उभे राहणार याची घरच्यांना काळजी होती.
मात्र, अनंत यांचा स्वतःवर आणि ज्ञानावर पूर्ण विश्वास होता. सोबतीला या अग्निसुरक्षा क्षेत्रात दोन वर्षे काम केल्याचा अनुभवही होता, त्यामुळे अनंत यांची अनेकदा समजूत काढून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न घरच्यांनी केल्यावरही अनंत यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही. याकामी त्यांच्या अनेक मित्रांनीही अनंत यांना मदत केली. त्यांच्या एक सीए असलेल्या मित्राने त्यांना ‘सीझ फायर अॅण्ड इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस’ या कंपनीची स्थापना करून दिली. त्यानंतर अनेक लहान मोठी कामे करत करत, अनंत यांनी एक एक पायरी चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनंत यांना एका मोठ्या उपहारगृहामध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेसंबंधित कामाची माहिती मिळाली. त्यांनी त्या कामासाठीचे टेंडर भरले. मात्र, पहिल्यांदा त्यांना या कामाचे टेंडर लागले नाही. मात्र, ज्याला टेंडर लागले त्याच्याशी व्यवहाराचे काही न जुळल्याने अनंत यांना संधी देण्यात आली. मात्र, त्यावेळी आवश्यक निधी अनंत यांच्याकडे नव्हता. त्यामुळे अनंत यांनी सत्य परिस्थिती कथन करत, माघार घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यावेळी त्या उपहारगृहाचे मालक रोहित नारंग यांनी दोन लाख रुपयांचा धानदेश दिला. हा फक्त धनादेश नव्हता एका उद्योजकाने दुसर्या उद्योजकावर दाखवलेला विश्वास होता. अनंत यांच्यातील प्रामाणिकपणा रोहित नारंग यांना भावला होता. त्यामुळे त्या संपूर्ण उपहारगृहाचे काम रोहित नारंग यांनी अनंत यांच्या कंपनीकडूनच करून घेतले. शिवाय त्यांच्या ओळखीतील इतर कामेही अनंत यांना मिळवून दिली. पुढे प्रामाणिकपणा आणि कामातील सच्चाई या गुणांच्या जोरावर अनंत यांनी अनेक सरकारी आस्थापनांनादेखील सेवा पुरवली. त्यांच्या कामाची दखल घेऊन २००२ साली केंद्र सरकारने कंत्राटदारांसाठी असलेला ‘बेस्ट गव्हर्नमेंट पुरस्कारा’ने अनंत यांना सन्मानित केले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते अनंत यांचा सत्कार करण्यात आला. आता वयाची पासष्ठी गाठलेल्या अनंत यांनी व्यवसायाचा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित केला आहे. त्यांचा मुलगा वडिलांचा हा वारसा समर्थपणे सांभाळतो आहे. अनंत यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नीची साथ लाख मोलाची ठरली. अनंत यांना गडकिल्ले आणि ऐतिहासिक पर्यटनाची आवड असून, आजवर त्यांनी महाराष्ट्रातील २७६ किल्ल्यांना भेट दिली आहे. तसेच, काही शिखरांचे दर्शनदेखील अनंत यांनी घेतले. अनंत उत्तम लेखक आहेतच, शिवाय ते उत्तम वक्तेही आहेत. शिवरायांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. उद्योजकांचा कामाचा आवाका फार व्यापक असतो, त्यामध्येही आपल्यातील कलाकार अनंत यांनी जपला, हे त्यांचे खरे कौतुक! अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणार्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणार्या अनंत बेदरकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
कौस्तुभ वीरकर