अंधारातील दिवा

    19-Jul-2025
Total Views | 9

yogesh-sonawane
 
आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना मेहनतीच्या जोरावर 17व्या वर्षी राज्य, देश आणि विदेशातही नाशिक जिल्ह्याची पताका डौलाने फडकविणार्‍या योगेश सोनवणे यांच्याविषयी...
 
घरात अठराविश्व दारिद्य्र, आईवडील शेतमजूर अन् सुरू होताच संपणारी छोटीशी झोपडी. अशा अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत, नाशिक जिल्ह्यातील अंतापूर-ताहाराबाद येथील एका आदिवासी कुटुंबातील योगेश नामदेव सोनवणे या 17 वर्षांच्या युवकाने अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणार्‍या ‘आंतरराष्ट्रीय माऊंटेन (बाईक) सायकलिंग चॅम्पियनशिप’मध्ये नेत्रदीपक कामगिरी करत, भारताचे नाव उज्ज्वल केले खरे. परंतु, अखेरच्या क्षणी सायकलचे पॅण्डल तुटल्याने, हातात आलेल्या पदकाने त्याला हुलकावणी दिली. या आव्हानात्मक क्षणीदेखील योगेश तुटलेली सायकल घेऊन, डोंगर-दर्‍या तुडवत तब्बल दोन किमी धावला परंतु, त्याला अंतिम लक्ष्य गाठता आले नाही. अन्य स्पर्धक खूप पुढे निघून गेल्यामुळे, योगेशला पदकापासून लांब राहावे लागले.
 
योगेशची हीच जिद्द बघून, एका हिंदी चित्रपटातील ‘हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते हैं’ हा डायलॉग आठवतो. खरंच, एका अतिसामान्य कुटुंबातील योगेश तिथपर्यंत पोहोचला हेच देशासाठी अभिमानास्पद असल्याने, तो भारताचा ‘रिअल हिरो’ अर्थात ‘बाजीगर’ ठरला. या स्पर्धेत निवड होण्यापूर्वी योगेशने ‘राष्ट्रीय माऊंटेन (बाईक) सायकलिंग चॅम्पियनशिप’मध्ये रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके मिळवून, तो शिक्षण घेत असलेल्या ‘मविप्र’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेतील कामगिरीमुळेच त्याची चीनमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ‘आंतरराष्ट्रीय माऊंटेन (बाईक) सायकलिंग चॅम्पियनशिप’मध्ये 18 वर्षांच्या आतील मुलांच्या गटात निवड होणारा योगेश सोनवणे हा पहिला महाराष्ट्रीय खेळाडू ठरला.
‘सायकल फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘हरियाणा सायकलिंग स्टेट असोसिएशन’ यांच्यावतीने, हरियाणातील ’मोरनी हिल्स’ येथे दि. 28 ते दि. 31 मार्च रोजी दरम्यान 21व्या सिनियर, ज्युनियर आणि सब ज्युनियर ‘राष्ट्रीय माऊंटेन (बाईक) सायकलिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्षांच्या आतील वयोगटामध्ये योगेश सोनवणे या विद्यार्थ्याने अप्रतिम कामगिरी करीत, क्रॉस कंट्रीमध्ये कांस्य आणि टीम रिलेमध्ये रौप्य अशा दोन्ही पदकांवर आपले नाव कोरले.
 
या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे ‘एशियन सायकलिंग फेडरेशन’च्यावतीने दि. 23 ते दि. 27 एप्रिल रोजी दरम्यान चीनमध्ये झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय आशियाई माऊंटेन (बाईक) सायकलिंग स्पर्धे’साठी योगेशची निवड करण्यात आली. योगेशला थोरला भाऊ भरत सोनवणे, क्रीडाशिक्षक प्रशांत कुमावत, गणपत आहेर यांचे मार्गदर्शन लाभले असून, नितीन नागरे, तुकाराम नवले आदींकडून वेळोवेळी आर्थिक मदत झाली. दरम्यान, हरियाणातील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्याची सायकल 15 लाखांची, रौप्यपदक विजेत्याची आठ तर कांस्यपदकावर नाव कोरणार्‍या योगेशची सायकल अवघ्या दोन लाखांची होती. त्या स्पर्धकांच्या सायकलच्या चाकांची किंमतदेखील योगेशच्या सायकलपेक्षा अधिक होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी डोंगरांवरून राईड करताना, सुरक्षेच्या दृष्टीने डबल पूल सस्पेन्शन असलेल्या महागड्या सायकलींची आवश्यकता असते. मात्र, परिस्थितीअभावी योगेशला नाइलाजाने जुन्याच सायकलवर आपली आंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्ण करावी लागली. योगेशचा थोरला भाऊ भरत यानेही, याच खेळामध्ये तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये यश मिळविलेले आहे. परंतु, हलाखीच्या परिस्थितीमुळे भरतने स्वतःचा खेळ थांबवून योगेशसाठी कंबर कसली. भरतने एका सायकल दुकानात अनेक महिने काम करून जमविलेले पैसे, लोकवर्गणी आणि कर्ज काढून योगेशसाठी दोन लाखांची सायकल घेतली.
 
योगेशला सरावासाठी भरतने आपल्या अनुभवाच्या जोरावर गावातील डोंगर-दर्‍यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने ट्रॅकदेखील तयार केला. त्यामुळे योगेशला सराव करणे सोपे गेले. मागील तीन वर्षांमध्ये योगेशने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, शेकडो पदके मिळविली आहेत. 2024 साली पंचकुला (हरियाणा) येथे झालेल्या 16 वर्षांच्या आतील स्पर्धेतही योगेशने क्रॉस कंट्री, टाईम ट्रायल, टीम रिले या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. अत्यंत मेहनतीने पटकावलेली मोलाची पदके, प्रमाणपत्रे सुरक्षितपणे ठेवायला देखील योगेशच्या झोपडीवजा घरामध्ये जागा नाही. योगेश हा ‘मराठा विद्या प्रसारक समाज’ संचलित ताहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात, इयत्ता बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहे. ‘नाशिक जिल्हा विनायक कार्य समिती’, सटाणा संचलित अंतापूर येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीला असताना योगेशने प्रथमतः राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेले. योगेशसारखे असे अनेक अंधारातील दिवे आहेत, ज्यांच्या परिस्थितीअभावी त्यांच्यातील गुणवत्ता हरवून बसते परंतु, योगेशला ‘मविप्र’ संस्थेने वेळोवेळी मदतीचा हात दिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून योगेशने मिळविलेले यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. योगेशने मनी बाळगलेले स्वप्न पूर्ण व्हावे आणि त्याने ठरविलेल्या लक्ष्यापर्यंत त्याची झेप पोहोचावी, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल...

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121