यवतमाळ येथील जनजाती लोकसंख्येच्या शिक्षण व ग्रामविकास क्षेत्रात साहाय्य करण्याचे ध्येय समोर ठेवून कार्य करणार्या नितीन वासुदेवराव नारलावार यांच्याविषयी...
विदर्भातील यवतमाळ जिल्हा विविध जनजाती समुदायांनी समृद्ध. याच जनजाती क्षेत्रातील महिला व मुलांचा सर्वार्थाने विकास व्हावा, हा एकच विचार घेऊन सामाजिक कार्यकर्ते नितीन वासुदेवराव नारलावार सध्या अविरतपणे कार्यरत आहेत. यवतमाळच्या पांढरकवडा गावातलाच त्यांचा जन्म. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातल्याच शाळा क्रमांक 1 या मराठी शाळेत झाले. त्यानंतर सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण केईएस महाविद्यालय येथे झाले, तर श्री. बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडा येथे अकरावी व पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे वडील इथल्याच एका शाळेत क्लार्क म्हणून कामावर होते आणि आई गृहिणी. लहान बहीण, भाऊ, आई आणि वडील असे त्यांचे छोटे कुटुंब. घरची परिस्थितीही एकदम साधारण. वडिलांच्या उत्पन्नातून घर चालायचे; पैसे कमवायचे दुसरे माध्यम नव्हते.
नितीन यांचा महाविद्यालयामध्ये 40 ते 50 जणांचा ग्रुप होता. ते मिळून कधी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम, तर कधी अन्यायाविरोधात आवाज उठवणे असे विविध उपक्रम राबवायचे. कधीकधी लोकप्रतिनिधींना सामाजिक विषयावरील चर्चेकरिता व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे. त्याकाळात तालुका स्तरावर त्यांनी विविध कार्यक्रम केले. असे साधारण दोन वर्षे चालले. त्यानंतर त्यांच्या एका प्राध्यापकांनी नितीन करत असलेले काम पाहून त्यांना स्वतःची संस्था सुरू करण्याबाबत सूचवले. त्यानुसार 1996 साली ‘जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान’ची स्थापना झाली.
सुरुवातीला यवतमाळमधीलच दोन गावांकरिता संस्थेमार्फत काम सुरू झाले. आधी वॉटरशेडचे काम त्यानंतर गावातील जनजाती क्षेत्रातील मुलांसाठी, त्यांच्या विकासासाठी काम करण्यास सुरुवात केली. नंतर मग या मुलांच्या आईकरिता संस्थेने काम केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून जनजाती क्षेत्रातील मुलांच्या आईसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याकाळात जनजातींची विकासाच्या दिशेने होणारी वाटचाल पाहता, स्थानिक सावकार, राजकारणींचा सुरुवातीला विरोध होत होता. मात्र, संघर्ष करणे नितीन यांच्या रक्तातच असल्याने ते मागे हटले नाहीत. त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.
आज ही संस्था महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, पुणे, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील गावांमध्ये ग्रामविकासाचे कार्य करीत आहे. मुख्यतः समाजातील असुरक्षित घटक, विशेषतः महिला, वृद्ध, मुले शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि युवक यांच्या विकासासाठी व त्यांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ग्रामीण भागातील समुदायांसाठी शाश्वत व समावेशक विकास घडवून आणण्यास समर्पित आहोत. विशेषतः वंचित पार्श्वभूमीतून येणार्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांच्या हक्कांचे रक्षण होईल, हे संस्था सुनिश्चित करते.
ही संस्था सुव्यवस्थित सक्षमीकरणासाठी पूरक संस्था म्हणून काम करते, जिथे स्थानिक महिला गटांना सहभागी होण्यासाठी धोरणात्मक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. स्व-शिक्षण, स्थानिक नियोजनात भागीदारी, शासन यंत्रणांमध्ये सहभाग दिला जातो. प्रकल्पांचे प्रत्यक्ष मॉडेल तयार करणे व त्याच्या विस्ताराबाबत शिकवले जाते आणि संस्थात्मक भागीदारांशी संसाधनांचे जुळवून घेणे यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या गेल्या सात वर्षांपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्थेचे कार्य सुरू आहे. ‘टाटा ट्रस्ट’ आणि ‘जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या ‘ज्येष्ठ नागरिक सेवा’ व ‘सुश्रुषा कार्यक्रम’ संस्था राबवत आहे. चंद्रपूर येथे एकूण 75 गावे संस्थेने दत्तक घेतली आहेत. तेथील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवाकार्य सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जोपासणे आणि सामाजिक स्तर उंचावणे, ज्येष्ठ नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मदत करणे, त्यांच्यासाठी विशेष उपक्रम केंद्र चालविणे, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या समस्या व गरजांबाबत सामाजिक जनजागृती करणे, असे साधारण प्रकल्पाचे स्वरूप आहे.
यामुळे अनेक गोष्टींमध्ये सुधारणा होत गेली. गावातील वृद्धांना एकत्रित करून ताणतणाव कमी करणार्या आनंददायक क्रिया करण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. उपक्रम केंद्रात प्रार्थना, गीत, हलके व्यायाम, योग, ध्यान साधना, गमतीशीर खेळ जनजागृती पर कार्यक्रम असे विविध उपक्रमांमुळे ज्येष्ठांमध्ये नव्याने उत्साह निर्माण होऊ लागला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळू लागल्या. एकंदरीत बालसुरक्षा आणि गुणात्मक शिक्षण, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक सेवा व सामाजिक सुरक्षा, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, गाव विकास व स्वयंशासित व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि उपजीविका या प्रमुख घटकांवर संस्थेने केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.
संस्थेच्या माध्यमातून विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमदेखील राबवले गेले आहेत. आजवर या प्रशिक्षणाचा लाभ 616 मुले व 200 मुलींनी घेतला आहे. त्यांपैकी 100 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यापैकी 60 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. संस्थेचे कार्य असेच अखंड ज्योतप्रमाणे कायम तेवत राहो हीच प्रार्थना. नितीन नारलावार यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!