पत्रकारिता आणि त्यातून पुढे साहित्यसाधनेला समर्पित ‘शब्दमल्हार’ या प्रकाशन संस्थेचे संपादक, कवी असलेल्या स्वानंद बेदरकर यांच्या सर्जनशील प्रवासाविषयी...
आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो. त्यामुळे हे जीवन समृद्ध करण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. या वाटचालीमध्ये जीवनाचा खरा अर्थ सापडतो आणि जीवन अधिक अधिक सुंदर होतो. या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, असा दृष्टिकोन ठेवून साहित्य, संगीत आणि इतर कला यांच्यावर भरभरून प्रेम करणारे नाव म्हणजे ‘शब्दमल्हार’ या प्रकाशन संस्थेचे संपादक, कवी स्वानंद बेदरकर हे होय.
‘उत्तमाचा ध्यास’ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वाचे लक्षण मानता येईल. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा नावाच्या एका लहानशा गावात त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आणि तद्नंतर नाशिक या शहरात ते आले आणि नाशिककरच झाले. नाशकात आल्यानंतरच त्यांना वेगवेगळ्या कलांविषयीची मुळात असलेली आवड वृद्धिंगत करता आली. साहित्यिक मेळावे, सांगीतिक कार्यक्रम, विविध व्याख्यानमाला, चित्र-शिल्प प्रदर्शने यांतून मनात असलेले कलेविषयीचे प्रेम हळूहळू व्यासंगात परिवर्तित होत गेले.
महाविद्यालयीन जीवनात बालपणापासून मनात रुजलेल्या वक्तृत्वाला धुमारे फुटले आणि स्पर्धांच्या निमित्ताने सुरू झाली वक्तृत्वाची यात्रा. महाविद्यालयाच्या पाच वर्षांनंतर स्पर्धात्मक वक्तृत्व थांबून स्वानंद यांनी त्याला अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे रूप प्राप्त करून दिले. आज त्यांची सलग तीन-चार दिवसांची एकेका विषयाची व्याख्यानमालिका होते. गेल्या वर्षी पाँडिचेरी येथे सलग 15 दिवस ‘भारतीय संत आणि महायोगी अरविंद’ या विषयावर व्याख्याने झालीत. बालपणी भजन, कीर्तन, प्रवचन यातून रुजलेला अध्यात्माचा संस्कार त्यांनी संत साहित्याच्या आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासातून त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण, आदि शंकराचार्य, संत निवृत्तीनाथ, स्त्री संत कवयित्री लल्लेश्वरी, अक्कमहादेवी आणि मीराबाई या विषयांवर त्यांची व्याख्याने झाली आहेत आणि होत आहेत.
नाशिक येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या स्मरणिकेचे संपादकपद त्यांनी भूषविले. याबरोबरच काही महत्त्वाचे संपादन कार्य त्यांच्या नावावर आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांनी एक अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली; ती म्हणजे ज्या व्यक्तिमत्त्वांचा भारतीय जनमानसावर प्रभाव आहे, अशा 75 व्यक्ती निवडून त्यांना विद्यमान काळातील अभ्यासकांनी पत्र लिहायचे. असा हा अभिनव प्रकल्प होता. या संकल्पात त्यांना 50 पत्रे प्राप्त झाली, त्याचेच ‘शब्द कल्पिताचे’ हे ग्रंथरूप आहे. महाकवी कालिदासांपासून कवी नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत हे 50 लोक विविध क्षेत्र, अभ्यासविषय आणि प्रचंड कर्तृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. मराठी साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा ग्रंथ यानिमित्ताने स्वानंद बेदरकर यांच्या नावावर आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेचा ध्यास घेतला.
सुरुवातीला मुद्रितशोधक म्हणून आणि त्यानंतर अन्य एका दैनिकात सांस्कृतिक प्रतिनिधी ते पुरवणी संपादकपर्यंतचा जवळपास 12 वर्षांचा अनुभव त्यांनी प्राप्त करून घेतला. पत्रकारिता करीत असताना मूळ साहित्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना आणि त्यामुळेच ‘शब्दमल्हार’ या नावाने त्यांनी स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली. साहित्याशी संबंध म्हणून ‘शब्द’ आणि संगीताची आवड म्हणून ‘मल्हार’ या दोन शब्दांची, कलांची आणि विषयांची ही अतिशय लोभस संधी साधून त्यांनी ही प्रकाशन संस्था आकाराला आणली. आता ते या प्रकाशन संस्थेचे पूर्णवेळ संपादक आहेत. दरम्यानच्या काळात मराठी साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही विषयांचे महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनही त्यांनी केले. हे सारे सुरू असताना सांगीतिक मैफिलींचे निरूपण, ‘शब्दमल्हार’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि इतरही पुस्तक प्रकाशने कालौघात होत राहिली. ‘शब्दमल्हार’ला दहा वर्षे झाली असून, या दहा वर्षांत दिवाळी अंकाला राज्यस्तरीय 23 पुरस्कार आणि चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार लाभले आहेत.
त्यांचे हे यश आज सगळ्यांना दिसत असले, तरी त्या पाठीमागे ‘अभ्यासे प्रकट व्हावे। नाहीतर झाकून असावे। प्रकट होऊनी नासावे। हे बरे नव्हे॥’ ही संतांनी दिलेली शिकवण आहे. त्यामुळेच ‘आधी केले मग सांगितले...’ या न्यायाप्रमाणे ते नव्या येणार्या पिढीला अभ्यासाचे महत्त्व सतत सांगतात. नुकताच त्यांचा ‘पावसाच्या गर्भातळी’ हा पाऊसकेंद्री कवितासंग्रह प्रकाशित झाला असून संपूर्ण संग्रह एका विषयावरचा असल्याची ही कदाचित मराठी कविताक्षेत्रातली पहिलीच घटना असावी. हेही त्यांच्याकडून झाले ते अभ्यासाबरोबरच कवी म्हणून मनाची संवेदनशीलता त्यांनी सतत जपल्यामुळेच. हा संग्रह सध्या सर्वत्र गाजत असून या संग्रहातील कविता अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. सर्जनशीलता हा स्वानंद बेदरकर यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा परिणामकारक विशेष असल्याचे त्यांच्या वाटचालीकडे पाहिल्यानंतर जाणवते. त्यामुळेच संपादन असो वा कविता, व्याख्यान असो वा सांगीतिक मैफिलींचे निरूपण अशा सर्वच ठिकाणी त्यांनी आपल्यातील सर्जनशीलता टिकवून ठेवली आहे. त्यामुळेच त्यांच्या कोणत्याही जीवन व्यवहारात एक प्रकारची ‘लय’ असल्याचे जाणवते. हीच लय नव्या पिढीलाही प्राप्त करून देण्यासाठी ते सतत उत्सुक आहेत; हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण म्हणायला हवे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!