मुंबई, दि. २६ : विशेष प्रतिनिधी ''स्वयंपूर्ण विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण श्वेतांबरीचे उद्घाटन केलेले आहे. श्वेतांबरीचे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते हे त्या मला लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आत्मनिर्भरता आली, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उदघाटन व चावी वाटपाचा कार्यक्रम मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व केंद्रीय मंत्री खासदार पीयुष गोयल, माजी मंत्री आमदार योगेश सागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी म्हाडा अधिकाऱ्यांचेही मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला म्हाडा मुंबई गृहनिर्माणला सांगायचंय तुम्ही मागच्या काळात चांगलं काम केलं आहे. आपण सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली या सिंगल विंडो सिस्टीम मध्ये 45 प्रस्ताव तुमच्याकडे प्राप्त झाले त्यापैकी 42 प्रस्तावांना तुम्ही मान्यता दिली, पण मी या गतीने समाधानी नाही. कारण आमच्याकडे 1600 प्रस्ताव आहे आणि तुमच्याकडे 42-45 प्रस्ताव का? आले हे सगळे सोळाशे प्रस्ताव तुमच्याकडे का आले नाहीत. याचा अर्थ असा आहे की आपण ही जी सिंगल विंडो सुरु केलेली आहे याच्यामध्ये अद्यापही लोकांना अडचणी आहेत. मी आजच सांगतो स्वयं पुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही.
स्वयंपूनर्विकासात प्रीमियमवर तीन वर्षे व्याज नाही
यात एक महत्त्वाची मागणी आहे की, स्वयंपूर्ण विकासाच्या संदर्भात सुरुवातीला प्रीमियम भरावा लागतो आणि काम सुरू व्हायला दोन वर्ष तीन वर्ष लागतात आणि मग त्याचा बोजा तिथल्या नागरिकांवर पडतो. स्वयंपूर्ण विकासामध्ये आधीचे पैसे कुठनं भरायचे हा प्रश्न होता. आपण मागच्या काळामध्ये त्याच्याकरता मुभा दिली. आपण सांगितलं की हे पैसे तीन वर्षात भरता येतील. त्याच्यामध्ये आपण एक रायडर टाकला तीन वर्षात भरा पण त्याच्यावर साडेआठ टक्के व्याज आपण घेतो. यावेळी सोसायटीवर बँकेचे व्याज आणि प्रीमियमचे व्याज म्हणजे डबल व्याज त्याला भरावे लागते. म्हणून आज मी घोषणा करतो की, स्वयंपूर्ण विकासाच्या बाबतीत हे व्याज रद्द केलं जाईल त्याला व्याज लागणार नाही. हे व्याज केवळ वर्षापर्यंत माफ होईल. मार्च 2026 पर्यंत स्वयंपूर्ण विकासाचे जेवढे प्रपोजल येतील त्या सगळ्या प्रपोजल करता ही व्याज माफी लागू असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
आमदार प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात समितीची घोषणा
मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात एक समिती यावेळी नेमण्यात आली. या समितीने स्वयंपूर्ण विकास आणि क्लस्टर स्वयंपूर्ण विकास याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घ्यावा. राज्यातील सर्व आमदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या भागामध्ये काय अडचणी आहेत त्या त्यांच्याकडून समजून घ्याव्यात अनेक समग्र रिपोर्ट हा जर सरकारला सादर करावा. या सूचनांचा नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये विचार करून स्वयंपूर्ण विकासमध्ये त्याचा समावेश करता येईल. हा स्वयंपूर्ण विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
चारकोप येथील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाजूलाच सेक्टर १ मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी राजे मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार स्नेहा दुबे, आमदार अतुल भातखळकर, विधानपरिषदेचे आमदार चित्रा वाघ, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार गोपाळ शेट्टी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे संचालक व आमदार प्रसाद लाड, मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत. म्हाडा मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
--------------
हा केवळ चावी वाटपाचा कार्यक्रम नाहीतर स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून एक एक व्यक्ती ज्यांना आज दिवस चावी देणार आहोत ते व्यक्ती करोडपतीच्या यादीमध्ये त्याचं नाव सामील होणार आहे. 450 चौरस फुटांमध्ये राहणारा व्यक्ती 1100 चौरस फुटांच्या घरात राहायला जातो आहे.
- योगेश सागर, आमदार
मुंबईतील मराठी माणूस आता मुंबई बाहेर जाणार नाही. आज इथे चहूबाजूला सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या इमारती विकसित होत आहे लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे की महाराष्ट्र सरकार स्वयंपूर्ण विकासाला त्या ठिकाणी चालना देत आहे आणि त्याच्यामुळे मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. सेल्फ रिडेव्हलपमेंटचे शिल्पकार हे देवेंद्रजी आहेत. मुंबई हौसिंग सेक्टरमध्ये आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही. बिल्डरशाही आपल्याला नष्ट करायची आहे. आमच्याकडे स्वयं पुनर्विकासासाठी १६०० प्रस्ताव आले आहेत.
-प्रवीण दरेकर, अध्यक्ष, मुंबई जिल्हा बँक
या 15 नाहीतर १५०० सोसायटी तयार होतील. या पुनर्विकासासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केली जाईल. कोस्टल रोडचे काम वर्सोव्हा पासून पुढे उत्तर मुंबई पर्यंत येईल. अर्धा तासात विधानभवन जाणे शक्य होईल. सेल्फ रिडेव्हलपमेंट साठी आजचा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ३८ हुन अधिक नगरसेवक आम्ही पालिकेत पाठवू हा विश्वास मी देऊ इच्छितो. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ट्रिपल इंजिन सरकार नागरिकांच्या सेवेत येईल.
- पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री