म्हाडा संभाजीनगर व नाशिकमधील घरांसाठी नोंदणी सुरु

Total Views |

मुंबई
: म्हाडाचा छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा-बीड व नाशिक शहरामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४१८ निवासी सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता नोदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेसाठी 'गो लाईव्ह' शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते रविवार,दि.३० रोजी करण्यात आला. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात हा कार्यक्रम झाला.

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १ हजार १४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३९ सदनिका/भूखंडांचा समावेश आहे. तसेच नाशिक मंडळातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ६३ सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ०४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता ११४८ सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता २६६ सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता ०४ सदनिकांचा समावेश आहे.

सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस रविवार,दि.३० रोजी दुपारी १२वाजेपासून प्रारंभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या विक्री सोडतीत सहभागी होण्यासाठी दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. दि. ११ ऑगस् रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. दि. १२ ऑगस्ट रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराचे या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.