रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते रेल वन अ‍ॅपचे लोकार्पण

Total Views |

नवी दिल्ली
: प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या ४०व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार,दि.१ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 'रेलवन' या नवीन ॲपचा प्रारंभ केला. रेलवन हे ॲप रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्यादृष्टीने तयार करण्यात आले आहे.

हे एक व्यापक, सर्वसमावेशक ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आहे. हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. यात सर्व प्रवासी सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३% सवलतीसह अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिट,लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग, तक्रार निवारण, ई-कॅटरिंग, पोर्टर बुकिंग आणि शेवटच्या मैलापर्यंतची टॅक्सी अशा काही सुविधा असतील. आयआरसीटीसीवर आरक्षित तिकिटांची उपलब्धता कायम राहील. आयआरसीटीसीसोबत भागीदारी केलेल्या इतर अनेक व्यावसायिक अ‍ॅप्सप्रमाणेच 'रेलवन अ‍ॅप'लाही आयआरसीटीसीने अधिकृत केले आहे.

डिसेंबर २०२५ पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस)

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सीआरआयएसच्या संपूर्ण चमूचे स्थापना दिनानिमित्त अभिनंदन केले. त्यांनी सीआरआयएसला भारतीय रेल्वेच्या डिजिटल गाभ्याला अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. विद्यमान आरक्षण प्रणालीचे श्रेणीवर्धन करण्याच्या प्रगतीबद्दल मंत्र्यांनी सीआरआयएस चमूचे कौतुक केले. आधुनिक आरक्षण प्रणाली वेगवान , बहुभाषिक आणि सध्याच्या भारापेक्षा १० पट जास्त भार हाताळण्याच्या दृष्टीने प्रमाणशीर असेल. ती प्रति मिनिट १.५लाख तिकीट बुकिंग आणि ४०लाख चौकशींचा सामना करण्यास सक्षम असेल. नवीन आरक्षण प्रणाली सर्वसमावेशक असेल. त्यात आसन निवड आणि भाडे तक्त्यासाठी प्रगत कार्यक्षमता तसेच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण इत्यादींसाठी एकात्मिक पर्याय असतील.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.