
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मोदी आवास घरकुल योजनेमुळे प्रत्येक गरीब व्यक्तीचे त्याच्या स्वप्नातील घर सत्यात साकारत आहे. याअंतर्गत, २०२३-२०२४ आणि २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात एकूण १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत, येत्या वर्षात १० लाख लाभार्थ्यांना या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळेल, ज्यामध्ये मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या कुटुंबांचा समावेश आहे. हा लाभ इतर मागासवर्ग (OBC) व विशेष मागासवर्ग (SBC) या पात्र लाभार्थ्यांना दिला जातो. या योजनेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत सद्यःस्थितीत १,६६,३२२ घरकुलांचे बांधकाम पुर्ण झाले असून उर्वरित घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती दिली.
मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता ३ लाख घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यांकरीता सन २०२३-२४ मध्ये रु.१२००.०० कोटी आणि सन २०२४-२५ मध्ये रु.२५८८.५९ कोटी असा एकूण रु.३७८८.५९ कोटी इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत मंजूर घरकुलांकरीता आवश्यक असलेला पुर्ण निधी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे उपलब्ध असून बांधकाम पुर्णत्वाच्या टप्प्यानुसार २,९४,७८४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, २,३१,७८३ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, १,९९,४९७ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता आणि १,१६,७२४ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत सद्यःस्थितीत १,६६,३२२ घरकुलांचे बांधकाम पुर्ण झाले असून उर्वरित घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.