“नवी मुंबई शहराच्या हितासाठी संघर्ष सुरूच राहील. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी शहराचे अहित होऊ देणार नाही,” असा निर्धार नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला. संदीप नाईक विधानसभा निवडणूक लढविणार का, या प्रश्नावरही “मी निवडणूक लढवावी, अशी तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून, त्यांच्या भावनेचा मी सन्मान करतो. पक्ष योग्य न्यायपूर्ण निर्णय घेईल,” असा विश्वासही त्यांनी अधोरेखित केला. संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.
आपला जिल्ह्यातील सर्व घटकांशी ‘कनेक्ट’ आहे. त्याविषयी काय सांगाल?
होय, मी सर्व घटकांच्या संपर्कात असतो. स्थायी समिती सभापती असताना ‘सभापती आपल्या अंगणात’, आमदारपदी असताना ‘आमदार आपल्या दारी’, ‘जनसंवाद’ असे उपक्रम राबविले आणि आजही ते सुरू आहेत. जनतेने त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येण्याऐवजी मीच जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करतो.
राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून आपण आजवर मोठं सामाजिक कार्य उभं केलं आहे. त्यामागील आपली भूमिका नेमकी काय?
‘एसएससी बोर्डा’च्या धरतीवरील सराव परीक्षा 32 वर्षे सुरू आहे. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देऊन मुख्य परीक्षेत यश संपादित केले आहे. क्रीडा महोत्सवातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देतो. तसेच त्यांच्या अडीअडचणीही आपण सोडवतो. एक खेळाडू बीजिंगला गेला. एका दिव्यांग खेळाडूने ‘अथेन्स गेम्स’ गाजवले. तसेच रोजगार मेळाव्यांमधून युवतींना रोजगा, स्वयंरोजगार प्राप्त करून दिला आहे. शैक्षणिक आणि अन्य कारणांसाठी लागणारे शासकीय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियमित शिबिरे आयोजित केली जातात. त्यामुळे समाजकार्य करण्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. पण, आमच्या कामावर तुमचा बिल्ला लावला तर मात्र बोलणार. आम्ही सामाजिक चळवळ पुढे नेतो, कामाचे ‘इव्हेंट’ नाही , ‘मूव्हमेंट’ निर्माण करतो.
‘कोविड’ काळात आपल्या याच समाजकार्याने नवी मुंबईकरांना मोठा आधार दिला. त्याविषयी काय सांगाल?
‘कोविड’मध्ये कर्तव्यभावनेतून मदतकार्य उभं केलं. त्याचे कधी फोटो काढले नाहीत. कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली. महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधी सभागृह अस्तित्वात नाही. 20 वर्षांच्या सत्ताकाळात लोकनेते आमदार गणेश नाईक तीन-चार वेळादेखील महापालिका मुख्यालयात गेले नाहीत. परंतु, कोरोनाकाळात जनतेला दिलासा देण्यासाठी तब्बल 90 पेक्षा जास्त वेळा त्यांनी प्रशासनाबरोबर बैठका घेतल्या. कोरोना उपचार आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करून घेतली. विविध मार्गाने होणारी नवी मुंबईची लूट थांबवली. या काळामध्ये काहींनी स्वार्थ पाहिला. समान पद्धतीने सर्वत्र सुविधांची कामे व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही.
बेलापूर विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय?
कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, मी निवडणूक लढवावी. त्यांच्या इच्छेचा मी सन्मान करतो. माझा पक्ष योग्य निर्णय घेऊन मला न्याय देईल. बेलापूर शहरात आपण सर्वाधिक काम केले आहे. स्थायी समिती सभापती म्हणून सर्वाधिक बेलापूर शहरात काम केलं. या भागातील बहुसंख्य कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. तीन वेळा स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. या काळात बेलापूर शहरासह संपूर्ण नवी मुंबईमध्ये अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. अनेक दूरगामी विकासाचे निर्णय घेतले.पालिकेचा पर्यावरणपूरक अर्थसंकल्प मांडणारा मी पहिला सभापती होतो. ‘स्कूल व्हिजन’अंतर्गत महापालिका शाळांच्या इमारती प्रशस्त बनवल्या आणि त्यामधून आधुनिक डिजिटल शिक्षणाचे पर्व सुरू केले. आधुनिक उपचार देणारी माता-बालरुग्णालये उभी राहिली. उद्यानांचे सुशोभीकरण झाले. नेरूळ येथे ‘वंडर्स पार्क’सारखे पर्यटकप्रिय थीम गार्डन उभे राहिले. जनतेच्या सुरक्षिततेसाठी एनआरआय पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध होऊन हे पोलीस ठाणे उभे राहिले. सानपाडा येथे सुविधा भूखंड उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिराची निर्मिती झाली. ‘तलाव व्हिजन’अंतर्गत आधुनिक पद्धतीने सर्व तलावांची स्वच्छता होऊन त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. शहरातील सांडपाणी 100 टक्के शुद्ध करणारी अतिरिक्त एसटीपी केंद्रे स्थापित करण्यात आली. याच एसटीपी केंद्रांचा विस्तार होऊन आज त्यापेक्षाही आधुनिक टीटीपी केंद्र नवी मुंबईत स्थापित झाली आहेत. मोरबे धरणाचे पाणी नवी मुंबईतील विविध भागांत पोहोचविण्यासाठी तसेच पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचा प्रकल्प राबविण्यात आला.उड्डाणपूल, रस्ते, अंतर्गत रस्ते, स्कायवॉक, भुयारी मार्ग इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. नवी मुंबई परिवहन सेवेचा विस्तार होऊन वाजवी दरात पर्यावरणपूरक आणि आरामदायी बससेवा उपलब्ध झाली. कंडोमिनियम आणि वसाहतींमधून राहणार्या सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ते, मलनिःसारण वाहिन्या विशेष पाठपुरावा करून मार्गी लावली.शहरवासीयांना खेळण्यासाठी मैदानांचा विकास करण्यात आला. बेलापूर येथे जिल्हा न्यायालयाची इमारत उभी राहिली ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली. देशातील पहिला पर्यावरणपूरक ई-सायकल उपक्रम सुरू केला. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी मटेरियल आणि अभ्यासिका सुरू झाल्या.
नवी मुंबईला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, म्हणूनही आपण प्रयत्नशील आहात. त्याविषयी काय सांगाल?
दहा एमएलडी पाणी कमी झालं तरी भांडी वाजू लागतात. नवी मुंबईला पाणी वाढवून देणार म्हणून एमआयडीसीने महापालिकेकडून बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना कायम केले. नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांना महापालिका आणि सिडकोने कायम करावे. नवी मुंबईचे पाणी अन्यत्र वळवू देणार नाही. नवी मुंबईचे हित जपण्यासाठी कोणीही पुढे यावं. आम्ही नवी मुंबईचे अहित होऊ देणार नाही. आम्ही शहरहितासाठी बोलतो म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं. 25 वर्षांच्या नवी मुंबईकरांचा विश्वास आहे. तो जपणारच.
विरोधकांकडून आपल्यावर सातत्याने टीका केली जाते. त्याकडे आपण कसे बघता?
नगरसेवक, तीन वेळा स्थायी समिती सभापती, दोन टर्म आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. आम्ही जनतेची कामे करतो. अहंकार, गर्वाचे घर खाली असते. विनम्रता तुम्हाला तारुन नेते. अजाणतेपणी अपमान झाला तरी आम्ही माफी मागतो. कामे खूप केली, पण त्याचं कधी मार्केटिंग केलं नाही.
आगामी काळ नवी मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. त्याकडे कसे बघता?
होय, येणारा काळ नवी मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, विशेष आर्थिक क्षेत्र येऊ पाहत आहे. त्यामुळे शहरातील सोयीसुविधांवर आणि पायाभूत सुविधांवर ताण पडणार आहे. त्याचे नियोजन करावे लागणार आहे. मागील 25 वर्षांत नवी मुंबईची ‘इकोसिस्टीम’ तयार झाली. मोरबे धरणामुळे पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत नाही. पण, नाईक साहेबांवर बोलले की विरोधकांचं राजकारण दुरुस्त होतं. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी शहराचे हित जपणारच. पालिका प्रशासनामध्ये समन्वय नाही. एमआयडीसीने महापालिकेला दिलेले सुविधा भूखंड विकले. पालिकेने विरोध केला नाही, वकील दिला नाही. त्यावर कोणीही बोलले नाही. सिडको ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे. नाईक साहेबांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला. गेल्या 20-25 वर्षांत शहरातील 80 टक्के विकास प्रकल्प नाईक साहेबांच्या नेतृत्वात उभे राहिले आहेत. नवी मुंबईच्या कल्याणाची काळजी घेणार्या प्रत्येक अधिकार्याचे स्वागत आहे. आमची कोंडी करणार्यांचा सामना आम्ही समर्थ आहोत. परंतु, शहराची कोंडी होऊ देणार नाही.
प्रकल्पग्रस्त आणि झोपडीधारकांच्या हितासाठी आपण ठोस भूमिका घेतली आहे. ती जाणून घ्यायला आवडेल.
प्रकल्पग्रस्तांची घरे त्यांना मालकी हक्क देऊन नियमित झाली पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांना हवी तशी योजना शासनाने जाहीर केली पाहिजे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध नाही. परंतु, सुरुवातीला खासगी सर्वे कशासाठी सुरू केला होता? झोपडीधारकांनीच त्याला विरोध केला. आजतागायतच्या सर्व झोपडीधारकांना घराखालील जमिनीची मालकी देऊन योजनेत त्यांना घरे मिळाली पाहिजेत. 2011 नंतरच्या झोपडीधारकांना वार्यावर सोडणार आहात काय? शासनाने योजना राबवावी. पात्र आणि अपात्रतेबाबत स्पष्टीकरण असायला पाहिजे. जनतेच्या इच्छेनुसार पुनर्विकासाच सुसंगत धोरण पाहिजे. निवडणुका आल्या की स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आमच्यावर टीका केली जाते.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यापूर्वी कधीही निर्णय घेतले नाहीत यापुढेही निर्णय घेणार नाही.
तुमचा वाढदिवसाचा संकल्प काय आहे?
माझी राजकीय समज, प्रशासकीय कौशल्याचा आणि अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा, यासाठी मी यापुढेही कार्यरत राहणार आहे. नाईक कुटुंबीय ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ जनतेच्या सेवेत आहे. आम्ही घराणेशाही नाही, तर लोकशाही मानतो. जनतेच्या हिताची जास्तीत जास्त कामे करत राहणे, हाच वाढदिवसाचा संकल्प आहे.