बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी... श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीची वाट कुणाला गवसू शकते, कोण या वाटेवर येऊ शकते, त्याचे रहस्यच श्री हरीपाठातील या अभंगांमध्ये सांगितले आहे. प्रत्येक जीवाचे सुकृत उदयाला आल्याखेरीज त्याची ओढ श्री पंढरीकडे होणे नाही. श्री पंढरीनाथ हा सर्व संतांचा ध्येय विषय आहे. हा ध्येय विषय कसा आणि काय, हे सर्वांनीच समजून, जाणून घ्यायला हवे.श्री पंढरी क्षेत्र हे भूवैकुंठ आहे. येथे आषाढच्या विशिष्ट तिथीवर जर वर्षा झाली, पाऊस पडला, तर अजूनही चिंतामणी वृक्ष-आनंद वेली स्वमोक्ष तीर्थ वाहू लागतील. जे जे लाभावे, मिळवावे, हवे असे प्रत्येकाला वाटत असते नी सार्यांच्या जो ते मिळवण्यासाठी जो संघर्ष चालू आहे; ते सारे शांतवण्याची जागा म्हणजेच हे भूवैकुंठ क्षेत्र पंढरी होय. ‘चंद्रमे जे अलांछन-मार्तंड जे तापहीन’ असे हे सारे वातावरण श्रीक्षेत्र पंढरीचेच वर्णन आहे. फक्त हे सारे जाणून घेण्यासाठी जे व्रत करावे लागते, त्याचे नाव आहे ‘श्री एकादशी.’
या एकादशी ‘११ अकरा-अक्रा-अ-करा एकावर एक अकरा-एकास एक, एका सम एक एक’ या सार्या गूढ अशा रहस्यांचा या ब्रह्मांडातील सर्व संकल्पना कल्पनांचा स्पष्टपणे दृश्य स्वरूपात चर्मचक्षुणी पाहू अनुभव शकण्याची ताकद, ती शक्ती या एकादशी व्रतामध्ये आहे. श्री रामदास स्वामी महाराज म्हणतात, "अकरा अकरा-बहु अकरा-काय अकरा कळेचि ना” एवढे हे गूढ आहे. परंतु, उपासना, साधना, व्रत शुद्धता, सातत्य, नित्यता या गुणांची आवड ओढ, जिज्ञासा तयारी यामागे लागते. श्री एकादशी हे व्रत श्री पंढरीनाथ व भगवती श्री रुमिणी देवी परमेश्वरी यांना जाणण्याची जाणून घेण्याची पहिली पायरी होय.
श्री विठ्ठल-रुमिणी चिंतन हा आपला विषय आहे. तेव्हा फक्त रूपाचे चिंतन तर आनंद देईलच. परंतु, रूपातून त्या अरूपाकडे जात जात निर्गुणी निराकार सर्वत्र भरलेला नि व्यापून उरलेला ‘पूर्णात पूर्ण उदच्यते’ या न्यायाने सर्वत्र अगदी रव्याच्या कणापासून अवकाश अंतरिक्षा जो व्याप्त नि इथेही परिपूर्णच. त्या परिपूर्णतेत कुठेही यतकिंचितही उणे नाही. तरीही व्यापून उरलेलादेखील तेवढाच मी तितकाच परिपूर्ण. हे सारेच सामान्य माणसाला उकलणे समजणे अवघडच. परंतु, श्रीक्षेत्र पंढरी ही सारी सर्व रहस्य उद्घाटन करू शकते नि हेच ते श्री विठ्ठल रूप चिंतन होय. युग अठ्ठावीस झाली. पण, ते सावळे परब्रह्म त्याच्या सर्व लीलांसह आजही पंढरी क्षेत्र आपल्या पत्नीसहित शक्ती स्वरूप विद्यमान आहेत. श्रीक्षेत्र पंढरी ही चक्र सुदर्शनावर विराजित आहे.
याचा अर्थ असा की, सर्व ग्रह तारे, वारे, मंडल, नक्षत्र, ऋतुमास, दिनमान, निशासूत्र या सार्या पलीकडे आभा असणारे हे क्षेत्र आहे. या कुणाचाही प्रभाव या क्षेत्रावर नाही. हे मुक्त नि मुक्तीचे प्रबोधन क्षेत्र आहे. या क्षेत्रावर पंढरीवर श्री नामदेव महाराजांना श्री ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी वियोग असह्य झाल्यावर श्री गरुडांकरवी श्री माऊलींना याच क्षेत्री आणून श्री नाम-श्री ज्ञान यांची पुनश्च आनंद अश्व भेट श्री पांडुरंगांनी घडवून दिली होती. त्यावेळी याच क्षेत्रावर श्री रुमिणी देवींनी गाकर दाणे नि गूळ सर्वांना स्वहस्ते वाटप केले होते. त्यामुळे या क्षेत्रावर तीन दगडांची चूल मांडून हातावर काकर करून गौर्यांवर ते भाजून नि चंद्रभागेच्या वाळूत शेंगदाणे भाजून हे सारे गुळाबरोबर उघड्या आभाळाखाली सेवन करणे, खाणे हाही एक साधनेचाच भाग आहे. पंढरी मुक्तक्षेत्र असल्याचेच हे उदाहरण आहे.
श्री पांडुरंगाच्या कंठी कौस्तुभ मणी विराजित आहे. या कौस्तुभामध्ये प्रामुख्याने सर्व नद्यांमधील तीर्थता तसेच, अवकाश अंतरिक्षातील देव विमानस्थाने वेलींवरील फुलांमधली उर्धव गतिशील ओढ बुक्का व अष्टगंधातील संपूर्ण आद्रता प्रस्थापित असते. अनंत कोटी ब्रह्मांडे ही सर्व या मण्यामध्ये खसखशीच्या आकाराएवढे विराजमान असतात. खर्या अर्थाने कुळ परंपरागत श्री एकादशी व्रत करणारा कोणी अत्यंतिक साधक ज्यावेळी श्री पांडुरंगाच्या संमुख दर्शनास येतो, त्यावेळी तो मणी चमकतो. त्यातील शलाका स्पष्टपणे दिसू शकते नि श्री पांडुरंगांचा श्री भगवतींसह या किरण रूपाने त्या साधकाशी संवाद होतो, घडतो. असे हे वेड लावणारे, वेड करणारे नी कधी कधीच शहाणे होऊच नये, असे वाटायला लावणारे श्री रूप आहे, सावळे परब्रह्म.
आपापल्या गावातून म्हणजेच आपल्या स्वजन्म गावातील नदीच्या किनार्यांनी वेशीतील श्री भगवतीची आज्ञा घेऊन पायी पंढरीला येण्याचे माहात्म्य अवर्णनीय आहे. हे चालणे एका वेगळ्या अर्थाने मागे जाणे असते. जसे आपण नामजप करताना माळेतील एकेक मणी नाम घेऊन मागे टाकत असतो, नि नाम घेत पुढे जात असतो. तसेच, हे पुढे चालणे म्हणजेच मागे परतणे होय. जेथून आपला उगम झाला, त्या परब्रह्माचा त्यातील अंश घेऊन आपला या पृथ्वीवर कर्म भोग संचित प्रारब्ध क्रियमन यात्रेस प्रवासास प्रारंभ जेथून झाला, तेथे परत जाणे. असे हे एकमेव जेथल्या तेथे नेऊन घालणारे क्षेत्र आहे. भूमीशी पावलं, हातात स्वर, डोळ्यात विरह, कंठात प्राण, हृदयात ओढ, आत्म्यात आस आणि नामाचा सहवास, असा हा प्रवास पंढरी लाभ करून देणारा असतो. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया हे तीन दिवस खूप महत्त्वाचे या चालण्यामध्ये असतात. प्रतिपदेची चंद्रकोर आभाळात असते. आभाळ व्याप्त असते. परंतु, ती दृष्टी गोचर नेत्रांनी आपल्याला पाहता येत मात्र नाही. मात्र, विजेची आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तिला पाहत पाऊल टाकणे आणि नंतर पौर्णिमेला श्री चंद्रभागेमध्ये पूर्णशा चंद्राचे शशी बिंबाचे पाण्याच्या मधोमध पडलेले बिंब ते प्रतिबिंब काठावरून बघून नाचणे, वाळूत नृत्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे गूढ नि शक्ती चैतन्य जागृत करणारे असते. म्हणून या क्षेत्रीय प्रत्येक पौर्णिमेचे प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व आहे. त्यात श्री गुरुपौर्णिमा तर अवर्णनीयच यात मध्यभागी आभाळात आलेला चंद्र श्री चंद्रभागेच्या मध्यात पाहण्याने दर्शन करण्याने त्या क्षणी वैकुंठाचा वारा पंढरीक्षेत्री वाहत असतो.
काय आणि किती किती वर्णन करणार पंढरीचं... त्या सुंदर ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’ हा अनुभव घेणार. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा’ असे खास करून जे म्हटले आहे, त्यात हे संपूर्ण दर्शन सामावलेले आहे. श्री सद्गुरू श्री गजानन महाराज ज्यास ‘रुमिणी रमण’ म्हणतात, ते हे माधव दर्शन होय. माधव म्हणजे मधाने आर्तयुक्त परिपूर्ण सुगंधाचे आगर असे, जे श्री भगवती रुमिणींचे चरण त्या साक्षात जेव्हा श्री पंढरीनाथाचे दर्शन करतात, तेव्हा पापणी लववून करतात. याचा गुढार्थ फार फार आत्मीय आहे. आत्मसाधना रत हे जाणू शकतील. भगवती श्री पापणी आपल्या स्वचरणांकडे वळवितात, लववितात, त्यांचे ते दिव्य अलौकिक शक्तीरूप मधुररूप स्वनेत्रांनी अवलोकिणारे ते माधव असे श्री माऊली सांगतात. खूप खूपच जाणून अभ्यासण्यासारखे हे सारे आहे. पुढे श्री माऊली म्हणतात, लिहितात, ‘सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर.’ श्री भगवती रुमिणी परमेश्वरींचा वर जो वर तो आपल्या सर्वांचा बाप आहे. पिता पालक जनक आहे. आपल्या उगमाशी आपल्याला जोडून देणारा हा अभंग करणारा भंग पावलेला जीवाला पुनश्य अभंग करणारा अभंग जोड श्री माऊलींनी सर्वांच्या हिताकरिता दिला आहे.
‘वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ या सुवचनाची सुरुवात उदय पंढरीक्षेत्रातूनच होणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर हा सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाचा अग्र नि मध्य आहे. म्हणून नित्य चिंतन, मनन, अभ्यास, ध्यान, ध्येयविषय श्री बाप रखुमादेवीवर हाच मुख्यप्रधान अग्र हेतू आहे. श्रींचे हे उभय रूप सोमवार ते रविवार प्रतिपदा ते पौर्णिमा नि प्रतिपदा ते अमावस्या या सर्वांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात घ्यायचे आहे. जसे सोमवासरे या दिवशी पाण्यात चालणार्या नौकेचे दर्शन वर चंद्र नि परिसर शांत यात तिथीला महत्त्व; पण अशा दर्शनाने माणसाची कर्म शुद्ध होतात. त्याच्या बुद्धीत धबलता विमलता येते.श्री उभय स्वरूप मानस रूपाने नवकेमध्ये ध्यायचे पाहायचे आहे. कारण, श्री पंढरीनाथ व माता रुमिणी या दर्शनातच जीवाचे सर्व सुखच नव्हे, तर सुखाचे आगरच सामावलेले साठवलेले आहे. माता रुमिणींच प्राजक्त पारिजातकाच्या वृक्षाखाली मानस दर्शन षष्ठी-सप्तमीला प्राप्तकाली करणे, याने जीवाची जी सुख, शांतीकरिता चाललेली धडपड असते ती शांत होते. यांनी अशा प्रकारच्या उपासना, साधना, व्रते करण्याचे हे क्षेत्र श्री क्षेत्र पंढरी मग तू अवघाची सुखरूप होसी. असा सर्व संतांनी, सर्व देव दासांनी, महंतांनी घेतलेला अनुभव आहे. तो आपणही येथे खरोखरच घ्यावा.
श्री कपिकुल सिद्धपीठम वेणाभारती महाराज
(अधिक माहितीसाठी संपर्क : श्री उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी
८२०८३६२९५०