ठाणे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संध्या भेरे गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या माहेरी अस्नोली तळेपाडा येथे तीन मुलींसह राहत होती. सोमवारी (दि. २१ जुलै) तिन्ही मुलींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानं संध्याने त्यांना स्थानिक डॉक्टरकडे नेलं. प्रकृती चिंताजनक झाल्यानं पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर काव्या व गार्गी यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात तर, दिव्याला धामणगावजवळील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेमुळे संपूर्ण शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानं शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालातून तिन्ही मुलींना जेवणातून कीटकनाशक दिल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संध्या भेरे हिला तातडीने ताब्यात घेतलं. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे