धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

    27-Jul-2025
Total Views |

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा...

साध्या गोवा राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तरच्या तासामध्ये गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, सक्तीच्या धर्मांतराला बंदी घालण्यासाठी कायदा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, गोव्यात वाढता ‘लव्ह जिहाद’ व प्रलोभनाचे धर्मांतरण या विषयावरही त्यांनी, अनेक मुद्दे स्पष्टपणे मांडले. त्यामुळे या गंभीर समस्येला गोवा राज्यात गंभीरपणे दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

गोवा राज्याची सर्व जगभर प्रतिमा वास्तवापेक्षा फार वेगळी आहे. पहिली प्रतिमा गोवा हे ख्रिस्तीबहुल राज्य आहे, तर दुसरी गोवा एक सुखी, सुशेगाद (आरामशीर) लोकांचे राज्य आहे. प्रत्यक्षात गोव्यात ख्रिस्ती लोकांचे प्रमाण 25 टक्क्यांच्या आसपास आहे आणि हिंदू लोकसंख्या 60 टक्क्यांहून अधिक प्रमाणात आहे. दुसरा समज म्हणजे गोवा सुखी, आरामशीर लोकांचे सुखवस्तू राज्य आहे. हा समज मागील काही दशकांपर्यंत काही प्रमाणात खराही होता. परंतु, आता मात्र मागील दोन दशकांत परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. गोवा राज्य 1961 साली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यावर, येथील पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकरांनी प्रत्येक गावात मराठी प्राथमिक शिक्षणाच्या शाळा उघडल्या. त्यासाठी स्वतः खास लक्ष घातले. परिणामी येथील सर्व स्तरातील हिंदू समाज शिक्षित झाला. पुढील दशकातील गावागावातील लोकही उच्चशिक्षित झाले.

गोवा राज्याचा आकार अत्यंत लहान; त्यामुळे सरकारी नोकर्‍याही सहज उपलब्ध होऊ लागल्या. त्यात विदेशी नोकर्‍यांसाठी, गोव्यातील सर्वस्तरातील तरुण विदेशी जाऊ लागले. खाण व्यवसाय व पर्यटन व्यवसाय 80 ते 90 सालच्या दशकांत बहरू लागला. तेव्हा गोव्यात रोजगाराच्या संधीही मुबलक होऊ लागल्या. पण त्यामुळे गोव्यातील स्थानिक पारंपरिक व्यवसाय हळूहळू बंद पडू लागले. सुतारकाम, केशकर्तन, गवंडी, फुले, फळे, मासे, मांसविक्री हे सर्व व्यवसाय, बहुतांशी गोव्याबाहेरून आलेल्या लोकांच्या हाती गेले. त्यातील बहुतेक व्यावसायिक हे मुस्लीम धर्मीयच आहेत. त्यामुळे कधीकाळी अत्यंत अल्प प्रमाणात असणारे मुस्लीम, गोव्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात दिसू लागले.

गोवा राज्याचा इतिहास हा अत्यंत वेदनादायी आहे. मराठी साहित्यातील नामवंत कवी गोव्याचे सुपुत्र बाकीबाब बोरकर त्यांच्या प्रसिद्ध ’गोव्याच्या भूमीत’ या कवितेत गोव्याच्या निसर्ग, सांस्कृतिक समृद्धीचे वर्णन अत्यंत बहारदारपणे करतात. परंतु, गोव्याच्या इतिहासाच्या वेदनाही अत्यंत समर्पक शब्दांत मांडतात. बोरकर म्हणतात, “माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहून थोर व्यथा। रामायणाहून थोर मुक्त उर्मिलेची कथा.” रामायणात उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी. मोठा भाऊ रामाच्या आज्ञेत सावलीसारखा सतत राहणारा. लक्ष्मण राम-सीतेबरोबर वनवासात जातो परंतु, तो उर्मिलेचा जराही विचार करत नाही. असाच प्रकार छोट्या गोवा राज्याबाबत, संपूर्ण भारतवर्षाकडून झाला आहे. गोवा हे असे एकमेव राज्य आहे, जे इस्लामी आणि ख्रिस्ती या दोन्ही धार्मिक आक्रमणाला बळी पडले आहे. बाराव्या, तेराव्या शतकात येथे इस्लामी आक्रमकांनी येथील मंदिरे उद्ध्वस्त केली, लुटालूट, स्त्रियांवर अत्याचार केले. पुढे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचे पांढरे पाय या गोमंतक भूमीला लागल्यावर, येथील हिंदू धर्मसंस्कृतीला समूळ नष्ट करण्यासाठी पोर्तुगीजांनी धर्मसमीक्षा कायद्याने अनन्वित अत्याचार केले. हा आता सर्व इतिहास झाला. आता गोवा स्वतंत्र भारतीय संघराज्याच्या लोकशाही सरकारचा भाग आहे. येथे आता हिंदू धर्मसंस्कृती पुन्हा बहरत आहे परंतु, हे आशादायक चित्र पुढे कायम दिसेलच, अशी लक्षणे नाहीत.

संपूर्ण गोवा राज्य सध्या एक ‘कॉस्मोपोलिटन’ राज्य होऊ पाहात आहे. गोव्यातील स्थानिक हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणात सुशिक्षित, मध्यमवर्गीय आहे. हा हिंदू समाज आपल्या स्वतःच्या कोषातच जगण्यात मग्न आहे. गोव्यात सर्व साधन-सुविधा पुरवणारा वर्ग हा गोव्याबाहेरून येऊन स्थायिक होत आहे. त्यात फार मोठ्या प्रमाणात मुस्लीम आहेत. हिंदू समाजाच्या सर्व अडीअडचणी, कमकुवतपणा हेरून हिंदू महिलांच्या असाहाय्यतेला साहाय्य करण्याच्या बहाण्याने आपल्या मायाजालात पूर्णपणे अडकवत, त्यांच्याशी विवाह करण्याचा सपाटा गोवा राज्यात सर्वत्र दिसतो. तर दुसरीकडे ख्रिस्ती बिलवर्स पंथीय हिंदूंच्या आर्थिक, शारीरिक, खासगी अडीअडचणींना दैवीशक्तीच्या रूपाने ठीक करण्याच्या बहाण्याने, मोठ्या प्रमाणात धर्मांतरित करत आहे. या सर्व बाबतीत येथील हिंदू संघटना वारंवार विरोध करतात परंतु, सर्वच थरातील हिंदूंमध्ये याबाबतीत प्रचंड अज्ञान दिसते. गोव्यात अन्य राज्यातून मोल-मजुरीसाठी आलेला हिंदू समाजही व इस्लामी व ख्रिस्ती बिलवर्सच्या जाळ्यात अडकून, धर्मांतरित होत आहे. अनेक प्रकरणात असे दिसून आले की, बिगर गोमंतकीय हिंदू घरातील कर्ता पुरुष जो मोलमजुरी अथवा व्यवसाय करायचा तो व्यसनाच्या आहारी जाऊन, पूर्णपणे निकामी होतो, मग त्याची बायकामुले मुस्लीम पुरुषाच्या आश्रयाला जाऊन धर्मांतरण करतात. परंतु, स्थानिक हिंदू मत्र या गोष्टीकडे डोळेझाक करतात कारण, तो बिगर गोमंतकीय आहे म्हणून! मी पाहिलेल्या एका घटनेत गोमंतिक मध्यमवर्गीय घरातील तरुण, मुस्लीम तरुणीच्या प्रेमात पडला. जेव्हा ही गोष्ट हिंदू तरुणाच्या घरच्यांना समजली, तेव्हा हिंदूच्या घरात भयंकर गदारोळ माजला. मुस्लीम तरुणीला सून म्हणून स्वीकारण्यास घरच्यांनी, नातेवाईकांनी कडाडून विरोध केला. तेव्हा दुसर्‍या बाजूला शांतपणे मुस्लीम मुलीच्या कुटुंबीयांनी त्या हिंदू तरुणास सर्व प्रकारे साहाय्य करून आपल्या मुलीबरोबर त्याचे लग्न तर लावलेच,पण त्यास धर्मांतरित करून मुस्लीम देखील केले. पुढे त्या शहरातीत बहुतेक सर्व मुस्लीम तरुणांनी, या नवविवाहित जोडप्याला शक्य तेवढी आर्थिक व अन्य मदत करून दूर शहरात त्याला स्थायिकही केले.

मुस्लीम व ख्रिस्ती बिलवर्स अत्यंत सुनियोजतपणे हिंदू धर्मीयांचे धर्मांतर करतात. यावर हिंदू समाज फक्त प्रतिक्रिया देतो; पण प्रत्यक्षात कृती करताना फारसा आढळत नाही. हिंदूंमधील स्थानिक, परप्रांतीय महाजन, बहुजन या भेदभावाचा तसेच, आर्थिक अडचणी, शारीरिक व्याधींचा अचूक फायदा घेण्याचा सपाटा, मुस्लीम आणि ख्रिस्ती बिलवर्स घेत आहेत. या दोघांनाही त्यांच्या धर्मातून सहज साहाय्य मिळते. परंतु, हिंदूंमध्ये अजूनही धर्मबंधुत्वाचा, एकोप्याचा अभाव, जुन्या चालीरितींना कवटाळल्यामुळे मंदिरांत हिंदूंमध्ये भेदभाव, तसेच हिंदू संघटनाबद्दल गैरसमज आहेत. तसेच हिंदू संघटना या राजकीय पक्षासाठी काम करणार्‍या असल्यामुळे, त्या ‘लव्ह जिहाद’ व ‘बिलवर्स’ विषयी खोटा प्रचार करतात असा गैरसमज लोकांमध्ये स्वतःला पुरोगामी, समाजवादी म्हणवून घेणारे हिंदूच पसरवतात. त्यामुळेच हिंदू समाजामध्ये हिंदूच्या संरक्षणासाठी हिंदू संघटनच अस्तित्वात नाही, असा एक गैरसमज निर्माण झाला आहे.

पुढील काळात गोव्यात हिंदूजन संख्येचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात घटण्यची चिन्हे दिसत आहेत. याला कारण, हिंदूंच्या सर्व थरातील मुला-मुलींचे खूप उशिरा होणारे विवाह आणि एकच मूल जन्माला घालण्याचे खूळ. आर्थिक, शारीरिक स्थिती उत्तम असतानाही, फार मोठ्या प्रमाणात हिंदू जोडपी एकच मूल जन्माला घालून थांबली आहेत. त्यामुळे एक मूल जन्माला घालणारे हिंदू आपली भविष्यातील संख्या अर्धी करत आहेत, तर दोन मूल जन्माला घालणारे स्थिर करत आहेत. दुसरीकडे मुस्लीम समाज योग्य वयात लग्न आणि दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुले जन्मास घालत आहे. त्यातच ‘लव्ह जिहाद’ व अन्य जिहाद, ‘बिलवर्स’ यांच्या धार्मिक आक्रमणालाही येथील हिंदू समाज बळी पडत आहे. तेव्हा लवकरात लवकर हिंदू समाजात धर्म एकतेची जागृती होऊन, हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण होईल, यांची आशा करतो.

सचिन मदगे
(लेखक इतिहास अभ्यासक आणि शिल्पकार आहेत.)