शहापूर : राज्यभरात ७०० किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण झाला असताना, शहापूर–मुरबाड–खोपोली या महत्त्वाच्या मार्गाचे काम मात्र गेली सात वर्षे रखडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३४८ अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे प्रवासी, वाहनचालक तसेच महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
२ मार्च २०१७ रोजी केंद्र सरकारने या महामार्गाची अधिसूचना जाहीर केली होती. त्यानंतर भूमिपूजन पार पडले. मात्र सात वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्णच आहे. कामाच्या विलंबामागे सतत बदलणारे ठेकेदार, शासनाच्या विविध परवानग्यांचा अभाव, भूसंपादनातील अडथळे, तसेच स्थानिक राजकीय हस्तक्षेप कारणीभूत ठरले आहेत.
शहापूर तालुक्यातील शहापूर–सापगाव मार्ग वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून, ही मार्गिका म्हणजे परिसरातील जीवनवाहिनीच मानली जाते. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये–जा करतात. मात्र मागील दोन–तीन वर्षांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सदर रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) वर्ग करण्यात आला असला तरी, भूसंपादनासंदर्भातील अडचणींमुळे रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. विशेष म्हणजे शहापूर–मुरबाड–कर्जत आणि शहापूर–किन्हवली–डोळखांब या मुख्य मार्गांना हा रस्ता जोडलेला असल्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक राजकीय पक्षांनी निवेदने दिली. मात्र प्रशासनाकडून ‘खडी टाकणे’, ‘पाणी मारणे’, ‘खड्डे भरणे’, ‘सायड पट्टी करणे’ अशा तात्पुरत्या उपायांवरच समाधान मानले गेले. आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, रस्त्याचे सुधारित काम तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.
अलीकडेच माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत या रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या पडसादातून आता काही सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी अपर्णा ताई खाडे