मुंबई : 'अनेक विनाषकारी शक्ती गजवा-ए-हिंद करू पाहतायत, परंतु आपले स्वप्न एकच आहे, भगवा-ए-हिंद!', अशी कडक घोषणा बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी रविवारी केली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर 'सनातन महाकुंभ'चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्रासाठी आवाज उठवल्याचे दिसून आले.
या प्रसंगी देशभरातून शंकराचार्य, जगद्गुरू, महामंडलेश्वर, मठाधीश, संत-आचार्य आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अश्विनी कुमार चौबे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान व जगद्गुरू स्वामी श्री रामभद्राचार्य जी महाराज देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, आम्हाला कोणत्याही मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोकांशी कोणतीही समस्या नाही, तर जातीच्या नावाखाली लोकांना फूट पाडणाऱ्या हिंदूंशी आमची समस्या आहे. कुठेतरी भाषेवरून, कुठेतरी जातीवरून तर कुठेतरी प्रादेशिकतेवरून संघर्ष सुरू आहे. माझी एकच प्रार्थना आहे, हिंदूंना मारू नका. आपल्याला जातीयता बाजूला ठेवून राष्ट्रवादासाठी जगावे लागेल."
गांधी मैदानावर आयोजित या सनातन महाकुंभासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमात भजन-संध्या, वैदिक मंत्रपठण, संत मंडळी आणि हवन-पूजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. देशभरातून हजारो भाविक आले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक