गजर हरिनामाचा..

    05-Jul-2025
Total Views |

पंढरपूर म्हणजे मराठी जनमानसाचे प्रेमपीठ! विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन मागची अनेक शतके वारीची ही प्रथा अखंडितपणे, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. मानवी जीवन समृद्ध करणार्या याच विठ्ठलयात्रेचा घेतलेला हा आढावा.


विठ्ठल गिती गावा,
विठ्ठल चित्ती ध्यावा|
विठ्ठल उभा पहावा विटेवरी|
असा हा संताचे सुखनिधान, परमदैवत असणारा विठोबा!


भीमा नदीच्या तीरावर पंढरपूर व पंढरपुरात विठोबाचे देऊळ, ही महाराष्ट्राच्या अध्यात्माची सर्वश्रेष्ठ पेठ आहे. भीमा उर्फ भीमरथी ही नदी महाभारताच्या काळापासून एक पवित्र नदी म्हणून गणली गेली आहे. पंढरपूर व विठोबा पुष्कळच त्यानंतरचा. म्हणूनच आधीच्या दैवताच्या संप्रदायातला सारा गोडवा, सारे वैराग्य, भोळा भक्तिभाव इथल्या वारकरी संप्रदायात भरलेला आहे. इतका की, जे जे कोणत्याही संप्रदायात आहे, ते सारे काही पंढरीच्या संप्रदायात आहे. पण, पंढरीत आहे ते मात्र इतर कुठेही आढळेल, असे संभवत नाही.

पंढरपूरच्या संदर्भात मराठी माणसाची भावना उत्कट असते. भोवतालच्या जीवनाशी इतके बांधलेले, सर्व थरातील आणि जाती-जमातीतील माणसांना आपल्याकडे खेचून घेणारे असे तीर्थक्षेत्र, भारतातील इतर कोणत्याही प्रांतात दिसत नाही. महाराष्ट्रातील सर्व संप्रदायांमध्ये संख्येने निसंशय मोठा, प्रधान आणि लोकप्रिय असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी करणारा तो ‘वारकरी’ यावरून ‘वारकरी संप्रदाय’ असे नाव प्रतिष्ठित झाले असावे. ज्ञानदेव आणि नामदेव यांना आपण वारीचे प्रवर्तक समजतो. महाराष्ट्रातील संतांच्या दिंड्या वारीने पंढरपुरात येतात, त्यापूर्वीचा शोध घेताना परंपरा तपासताना लक्षात आले की, हा जो सोहळा पंढरपूरला होतो तो अलौकिक आहे. संपूर्ण भारतभर पंढरपूर सोडले, तर दिंडी आणि वारीची प्रथा अन्यत्र कोठेही नाही. काशी, रामेश्वर, जगन्नाथपुरी यांसारख्या प्रधान तीर्थक्षेत्रीही नाही. तेथे पूजाअर्चा, यात्रा होतात. पण, वारी नाही तसेच, ‘काला करणे’ म्हणजे ‘काल्याचे कीर्तन’ ही प्रथाही फक्त पंढरपुरातच, गोकुळातही नाही. भागवतात श्रीकृष्ण गवळ्यांसह, सवंगड्यांसह यमुनेच्या तीरी जातात, तेव्हा त्यांच्या खांद्यावर शिंक आणि काठी असते. तो गुरांना राखत असतो, म्हणून असे शिदोरीचे वर्णन आहे. ते सवंगडी गोलाकार व मधोमध श्रीकृष्ण बसत असे, ती प्रथा जशीच्या तशी पांडुरंगाच्या रूपाने पंढरीत आली आहे.

वारकरी प्राधान्याने चार वार्या करतात. पहिली ‘आषाढी’, ‘कार्तिकी’, ‘चैत्री’ आणि ‘माघी.’ यापैकी ‘आषाढवारी’ ही वारकर्यांना विशेष प्रिय. वारकरी पंथांमध्ये एक संकेत आहे. संकेत म्हणजे परंपरेने पिढ्यान्पिढ्या जो चालतो असा. त्यामध्ये देव आणि भक्त यांचे उत्सव परंपरेने होतात. पंढरपूरला वर्षातून कधीही जायचे असेल, तर ते शुल पक्षातील एकादशीला जायचे आणि हरिदर्शन घ्यायचे. म्हणून ही वारी ‘देवाची वारी’ म्हणतात आणि ‘भक्ताची वारी’ ही कोणत्याही वद्य पक्षातच करायची, म्हणजे ज्ञानदेवादि संतांचे दर्शन घ्यायचे. म्हणून या वारकरी पंथाला ‘देवाभक्तांचा पंथ’ असे म्हणतात. देव कसा? आणि भक्त कसा? हे पंढरपूरच्या एका शिलालेखामध्ये आढळते. पंढरपूरच्या मंदिरामध्ये पाच शिलालेख आहेत. ते ज्ञानदेवांच्या पूर्वीचे आहेत. एक शके ११९५चा म्हणजे ८००-९०० वर्षांपूर्वीचा आणि त्याला ‘चौर्यांशीचा शिलालेख’ असे म्हणतात. यामध्ये २०० ते २५० विठ्ठलभक्तांचे उल्लेख आहेत आणि ते विठ्ठलभक्त आंध्र, कर्नाटक, कोकण, रामटेक, मेहेकर या भागांतील आहेत. या शिलालेखात शिलालेखाकाराने खूप गोड वर्णन केले आहे. समारोप करताना तो म्हणतो, "पांडुरंगाचे कथा, कीर्तन करीत असताना भक्त नाचत आहेत, त्यांच्या डोळ्यातून घळघळा आनंदाश्रू येत आहेत, तेव्हा पांडुरंग त्यांना म्हणतो ‘मी कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का? भक्तानुगम श्री विठ्ठलम’ म्हणजे, अनुगम मागे मागे जाणारा; जिथे भक्त तिथे देव म्हणजे मी आहे, असे हे पांडुरंगाचे वैशिष्ट्यपूर्ण बिरुद या शिलालेखात कोरलेले आहेत. म्हणून देव आणि भक्त हे या विठ्ठल परंपरेचे, वारकरी परंपरेचे विशेष लक्षण आहे.”

‘वारकरी’ हा शब्द ‘वारीकरी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे दिसते. ‘वारी’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘येरझारा’ आणि ‘वारकरी होणे’ म्हणजे प्रतिवर्षी विठ्ठलाच्या यात्रेस जाण्याचे व्रत धारण करणे होय. हे व्रत धारण करणारा ‘वारीकर’ म्हणजे ‘वारकरी.’ श्री ज्ञानदेवांनी स्वतःला आणि अन्य भक्तांनाही ‘वारीकर’ म्हटले आहे.

श्री ज्ञानदेव म्हणतात, ‘काया वाचा मने, जीवे सर्वस्वे उदार| बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारीकर|’ ज्याने आपले शरीर, वाणी, मन इतकेच नव्हे, तर जीवही श्रीविठ्ठलास अर्पण केला आहे, तो पंढरीचा वारीकर होय. काया, वाचा, मन आणि जीव विठ्ठलास अर्पण करणे म्हणजे त्यांना विठ्ठलाच्या सेवेस लावणे. ‘आले आले रे हरीचे डिंगर| वीर वारीकर पंढरीचे॥’ असा वारीकर उल्लेख श्री नामदेवांनीही एका अभंगात केला आहे.

पंढरपूर हे सर्वसामान्यांसाठीचे भूवैकुंठच आहे. त्याकडे जाणे सहज नाही. पण, संतमंडळींनी ही पायवाट अगदी सोपी केली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत जाताना, चालताना त्यांना श्रम जाणवतच नाही. ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी| प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे॥’ असे चोखामेळांनी म्हटले आहे. आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वारकरी भक्त चालत, टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगून जातात. तो परिसर, आसमंत विठ्ठलाच्या नामगजराने दुमदुमून जातो. हे वारकरी कित्येक मैल पावसा, पाण्यात, उन्हातान्हात चालत येतात. एकमेवाद्वितीय असेच हे दृश्य असते.

या पायी वारीमध्ये एक प्रकारचे तप असते. ‘कायिक तप’ म्हणजे चालत जाणे. ‘वाचिक तप’ म्हणजे समोरच्यातही माऊली पाहणे आणि ‘मानसिक तप’ म्हणजे, मन स्वच्छ निर्मळ करणे. अंतर्मनाचा विकास करणे, अंतरीचा दिवा जागा करणे; म्हणून ही पायवारी. ही वारी सामाजिक, सांस्कृतिक, मानवी स्वभावाच्या पातळीवर विचार करता आश्चर्यकारक अशीच आहे. या वारीतील वारकरी एका सामायिक भावनेने एकत्र आले असल्याने तेथे गोंधळ होत नाही. कारण, तेथे एक आंतरिक शिस्त असते. पंढरीच्या या पायवारीला श्री ज्ञानदेव ‘विठ्ठलयात्रा’असे संबोधतात. या विठ्ठलयात्रेमध्ये संत वारकर्यांबरोबरच असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ‘देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा|’ त्यामुळे संतांच्याबरोबर आणि संतांच्या रूपाने वारीमध्ये देव असतोच. त्यामुळे पंढरपूरला गेल्यावर राऊळाच्या कळसाचे दर्शन झाले, तरी वारकर्यांना पुरेसे असते. ‘अहंकाराचा नाश’ हे संतांच्या संगतीने संतांचेच अभंग गात पंढरीच्या वारीने जाण्याचे सर्वश्रेष्ठ फळ होय आणि वारी करायची ती याचसाठी!

श्री विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत. हा विठोबा मूळ विष्णुरूपच आहे. या विष्णुचे आणखीन एकरूप म्हणजे श्रीकृष्ण आणि हा गोपालकृष्णच कटीवर हात ठेवून पंढरीमध्ये उभा आहे. विष्णु या शब्दामध्ये ‘विश्’ हा मूळ धातू. जो सगळ्या विश्वाला व्यापून सर्वांगाने उरतो तो विष्णु आणि त्याचेच हे रूप. विठ्ठलाची एक व्युत्पत्ती म्हणजे ‘विटेवर ठेला’ म्हणून ‘विठ्ठल’ होय.

आदी शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकात वर्णन केले आहे, ‘कटीवर हात ठेवले आहेत. कारण, तो आपल्या भक्तांना सांगतो भवसागर फार खूप खोल नाही. कमरेएवढाच आहे. तो मी तुम्हाला तरून नेतो,’ म्हणून कटीवर हात ठेवले आहेत. कटीवर हात असले, तरी त्याच्या हातात शस्त्रे आहेत. उजव्या हातात सुदर्शन चक्र आहे. डाव्या हातात शंख आहे. उजव्या हाताच्या मागे छडी आहे. कारण, तो गोपाल आहे. गाईंना वळणारा आहे. ‘गो’ याचा अर्थ ‘इंद्रिये’ असाही आहे, म्हणजे ती इंद्रियांना सन्मार्गाला लावणारा आहे. तमोगुणी, रजोगुणी लोकांना सत्वगुणांकडे नेणारा आहे.

अशा या विठ्ठल आणि पंढरपूर या दैवतांची स्थापना श्री ज्ञानदेव व श्री नामदेव यांच्या कालखंडापूर्वीची आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात, ‘हे नव्हे आजिकालीचे| युगे अठ्ठावीसांचे॥’ अशा या अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या या दैवतास वारकरी अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने ‘विठ्ठल’, ‘पांडुरंग’ असे संबोधतात. त्याच्या इतके वेड मराठी मनाला अजून तरी कोणी लावलेले नाही. असा हा भक्तांच्या सुखदुःखात नेहमी स्वतःहून सहभागी होणारा, एकांतापेक्षा भक्तांमध्ये सामावून गेलेलाहा पांडुरंग अनेक नावाने संबोधला जातो. ‘तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे| सगुण निर्गुण एक गोविंदू रे॥’ असे अद्वैती गोविंदस्वरूप दैवत श्रीज्ञानदेव सांगतात.तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला ‘पंढरीराव’, ‘विठोबा’, ‘विठाबाई’, ‘विश्वंभरा’, ‘नारायणा’, ‘गोविंदा’, ‘केशवा’, ‘रखुमादेवीवरा’ अशा अनेक नावांनी संबोधतात व अखेरीस म्हणतात, ‘तुका म्हणे जे जे बोला, ते ते साजे या विठ्ठला|’

सर्वच संतांनी श्री विठ्ठलाला भरभरून गायलेले आहे. त्यांच्या दृष्टीने सर्वस्व असलेला हा विठ्ठल पुंडलिकामुळे पंढरपुरात आला. पुंडलिकाच्या भावबळाचे संतांनी अगदी प्रेमभावनेने कौतुक केलेले आहे. तुकाराम महाराज पुंडलिकाला प्रश्न विचारतात,

कारे पुंडया मातलासी,
उभे केले
विठ्ठलासी,
ऐसा कैसा रे तू धीट,
मागे भिरकाविली वीट,
युगे झाली अठ्ठावीस,
अजुनी का न म्हणसी बैस॥


पंढरपूर वारी सोहळ्याचा आनंद जसा जनसामान्यांना, तसाच तो संत मंडळींना आहे आणि प्रत्यक्ष विठ्ठलही हा आनंद सुखसोहळा पाहून सुखावतो. तो नामगजरात तल्लीन भक्तांच्या स्वागताला स्वतः सामोरा जातो. पंढरीच्या या विठ्ठलावर सर्वच संतांचा अपरंपार विश्वास आहे. अढळ भक्ती, विश्वास, नितांत निष्ठा आहे. या संतांची मांदियाळी पहिली, तर असे ध्यानात येते, त्यात श्रीज्ञानदेव, श्री निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, नामयाची दासी जनी, गोरा कुंभार, सेना न्हावी, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका महार, सोयराबाई, कान्होपात्रा असे विविध स्तरातील संतकवी आहेत. या सर्व संतांनी आपल्या भगवत भक्तीच्या बळावर ईश्वराला, पांडुरंगाला जणू सामान्य माणसाच्या दैनंदिन व सपाट जीवनपातळीवर वावरण्यास भाग पाडले आहे; म्हणून विठ्ठलाने संतांच्या घरची कामे केली आहेत. त्याने जनाबाईंच्या बरोबर धुणी धुतली, चोखोबांबरोबर गुरे राखली, गोरोबांबरोबर मातीत रमला, दामाजीपंतांची पावती बादशहाला चुकती केली. नामदेवांच्या कीर्तनात रंगून गेला, कान्होपात्राच्या भजनात रमला, तो सार्यांसाठी सारे झाला. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती| चालविसी हाती धरोनिया|’ असा तो तुकारामांचा सांगाती झाला. नरहरी सोनार यांच्या दुकानात नामाचे व्यवहार करू लागला. ज्ञानदेवांसाठी तो पंढरीचा पाहुणा झाला. त्याने भक्तांसाठी काय केले नाही; म्हणूनच या संतांचे, भक्तांचे, विठ्ठलाशी नातेच असे आहे की ते विठ्ठलाशी बोलतात, त्याच्यावर रागावतात, भांडतात. नामदेव तर विठ्ठलाला फर्मावतात - ‘पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा| पतित पावन नव्हेसी म्हणुनी जातो माघारा॥’ जनाबाई तर विठ्ठलाच्या गळ्यात दोरच बांधून ठेवतात. ‘धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर|’ गणिकेच्या घरात जन्माला आलेली कान्होपात्रा मंगळवेढ्याहून पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आली. बिदरच्या बादशहाने तिच्या सौंदर्याला भूलून तिला पकडून आणण्यासाठी सैनिक पाठवले, तेव्हा ती विठ्ठलास आर्ततेने विनवणी करते, ‘नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे|’

सावता माळींनी विठ्ठलाची तुलना व वर्णन त्यांच्या भाज्यांच्याच शब्दात केली आहे - ‘कांदा मूळा भाजी अवघी विठाई माझी|’ चोखोबांनी तर आपल्यावर आलेल्या चोरीच्या आळाने टाहो फोडून विठ्ठलास हाक मारली आहे. ‘धाव घाली विठू आता, चालू नको मंद|’ अशा या भक्तांच्या हाकेला धाऊन जाणार्या विठ्ठलाचे अतिशय वत्सल रूप जनाबाईंनी रेखाटले आहे - ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा|’ अशा या संतसज्जनांच्या दैवताच्या वारीला जाणे, हे त्या संतानाही गौरवास्पद होते. आमच्या कुळात, घराण्यात वारीची परंपरा होती, असे संत मंडळी मोठ्या अभिमानाने सांगतात.

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी हा मार्ग दाखवला आणि सकल संत परंपरेने त्या मार्गावरून वाटचाल सुरू केली. ज्ञानदेव समाधिस्थ झाल्यानंतर तत्कालीन नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार इत्यादी संत मंडळींनी दिंडी तयार केली. वैष्णवांची संख्या वाढू लागली. श्री एकनाथ, श्री तुकाराम, श्री निळोबा, मल्लप्पा वासकर या संतपरंपरेने हा पुण्य मार्ग वाढवला आणि आज ही वैभव संपन्न परंपरा अखंडितपणे, अविरतपणे, तितयाच श्रद्धेने भक्तिभावाने चालू आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘खेळ मांडीयेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे| क्रोध अभिमान केला पावटणी एकएका लागतील पायी रे|’

डॉ. धनश्री साने
९८३३५७३९२