स्त्रीचित्रकारांची सशक्त अनुभूती

    06-Jul-2025   
Total Views |

मुंबईतील ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘रंग मल्हार’ या कलाप्रदर्शनात महिला चित्रकारांच्या सशक्त अभिव्यक्तीची प्रचिती येते. त्यांच्या या अभिव्यक्तीमध्ये पावसाची, निसर्गाची वेगवेगळी रूपं उमटलेली बघायला मिळतात. अशा या कुंचल्यातून साकारलेल्या अभिव्यक्तीचा घेतलेला हा आढावा...

पाऊस अनेक ठिकाणी एकाचवेळी पडत असला, तरी प्रत्येकाचे भिजणे वेगळे असते.” वपुंच्या ‘फॅण्टसी एक प्रेयसी’ या पुस्तकातील वाक्य, पावसाळा आला की, आपसूकच कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे अगदी सहज उगवते. ज्याप्रकारे प्रत्येकाचे भिजणे वेगळे असते, अगदी त्याच धर्तीवर पावसाकडे बघणेसुद्धा वेगळे असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पाऊस हा जसा सर्वच कवींसाठी आवडता विषय, तितकाच तो चित्रकारांसाठीही रंगांच्या मुक्त वर्षावाचा वार्षिक उत्सवच! निसर्गाची ही नक्षी टिपताना, चित्रकाराला झाडं, फांद्या जशा दिसतात, तितक्याच उत्कटपणे तो जंगलातील पाऊलवाट आणि त्या वाटेवरले खडेसुद्धा सजीव कोरतो. पावसाच्या याच नाना छटा मुंबईकरांना सध्या अनुभवयाला मिळत आहेत. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरच्या कलादालनात ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या माध्यमातून ‘रंग मल्हार’ या आगळ्यावेगळ्या महिला कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सध्या सुरू आहे. दि. 27 जून रोजीपासून ते दि. 10 जुलै रोजीपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या कालावधीत कलारसिकांना रंग शिल्पांच्या माध्यमातून पावसाचा आणि पावसावर आधारित कलाकृतींचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

या कलाप्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून पावसाची टिपलेली वेगवेगळी रूपं. निसर्गाचे भोर-विभोर रूप ज्यावेळेला कुंचल्याच्या माध्यमातून कागदावर उमटते, तेव्हा ती चित्रे जिवंत झाल्याचाच आभास होतो. पाऊस म्हटले की मोर आणि त्याचा फुललेला पिसारा याचे विहंगम दृश्य चित्राच्या माध्यमातून एका चित्रकाराने साकारले आहे. मुंबई आणि पावसाळा हे एक वेगळंच नातं. आज आपल्या अवतीभोवती आभाळाएवढ्या गगनचुंबी इमारती, चहुबाजूला वाहनांची पळापळ (आणि त्यायोगे होणारी वाहतुककोंडी) हे तर नित्याचेच. परंतु, मागच्या शतकात मुंबईचा पाऊस कसा असेल, याचा विचार करत चित्रकाराने अत्यंत खुबीने एक चित्र रेखाटले आहे. हे चित्र बघताना त्या चित्रामधील राखाडी रंग उठून दिसतो. एकाअर्थी हा रंगसुद्धा मुंबईचेच प्रतिनिधित्व करत असतो. कारण, या शहरात सरधोपटपणे गोष्टी काळ्या आणि पांढर्‍या या दोन रंगांमध्ये विभागलेल्या नसतात. राखाडी रंगाप्रमाणे त्या मिश्रच असतात.

पावसामुळे खुललेली रानफुलं, गावाच्या मधोमध वाहणारी नदी, निळ्याशार आकाशाचे सतत परिवर्तित होणारे रूप यांची उमटलेली चित्रे यांमुळे निसर्गाच्या सशक्त अभिव्यक्तीची आपल्याला प्रचिती येते. ही सारी चित्रशिल्पे कुठल्याही एका विशिष्ट आकारामध्ये बंदिस्त नाहीत. पाऊस जितका मोकळा असतो, तितकाच सैरभैर धावणारा. अगदी त्याच प्रकारे, त्याचे हे मुक्त रूप कलाकारांनी साकारले आहे. चित्रांच्या चौकटीतून बाहेर पडत वेलबुट्टीदार कापडावरसुद्धा या निसर्गाच्या छटा आपल्याला इथे बघायला मिळतात. प्रख्यात निवेदिका उत्तरा मोने यांनीही या चित्रप्रदर्शनाला भेट दिली. या चित्रप्रदर्शनावर आपले मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या माध्यमातून अत्यंत वेगवेगळ्या प्रदर्शनांचे आयोजन या ठिकाणी केले जाते, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अशा या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कलेची, कलाकारांची ओळख आपल्याला घडते.”

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात निसर्गापासून दुरावलेली एक अवस्था आपल्या मनामध्ये तयार होते. निसर्गाशी असणारा संवाद कमी झाला की, एकटेपणा वाढत जातो. पण, निसर्गाच्या सान्निध्यात असताना अवतीभोवतीच्या समृद्ध जगाशी आपली ओळख घडते आणि खर्‍या अर्थाने सृष्टीच्या सौंदर्याचा विचार नेमका काय आहे, याची आपल्याला प्रचिती येते. आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून हे सौंदर्य जगाला उलगडून सांगणारे कलाकार आणि त्यांची कला यांची अभिव्यक्ती जाणून घेणे आणि त्यांना दाद देणे, हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे, असे एक रसिक म्हणून वाटत राहते.

कलासक्त अहिल्यादेवींच्या कार्याला मानवंदना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सध्या सुरू आहे. यानिमित्ताने राज्य शासनातर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली जात आहे. अहिल्यादेवी होळकर जितक्या उत्तम प्रशासक होत्या, तितकेच त्यांचे मन कलासक्त होते. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा अनेक घाट बांधले, देवळे बांधली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महेश्वरी साड्यांच्या व्यवसायाला त्यांनी ऊर्जितावस्था दिली. अशा प्रकारे त्यांचे कलाक्षेत्रातसुद्धा अत्यंत महत्त्वाचे योगदान होते. त्यांना मानवंदना देण्यासाठीच ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्यावतीने सगळ्या महिला चित्रकारांचे प्रदर्शन आपण आयोजित केले आहे. देश-विदेशांतून वेगवेगळ्या महिला चित्रकारांचा प्रतिसाद या कला प्रदर्शनाला लाभला आहे. या प्रदर्शनाला सगळ्यांनी आवर्जून भेट द्यायला हवी.

- मीनल जोगळेकर,
संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
9967826983

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.