गझलकार अविनाश...

Total Views |

गझलेच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या पसंतीस उतरलेला, मात्र अध्यापनात करिअर करण्याचे ठरवून गझलेकडे फक्त छंद म्हणून पाहणार्या अविनाश काठवटेविषयी...


पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाटते’ कवितेच्या या ओळींवर आपल्यापैकी कित्येकांनी रील बनवले असतील, तर कित्येकांनी पुन्हा पुन्हा या ओळी ऐकून आपल्या आयुष्याशी या ओळींना जोडले असेल. ही कविता गाणारा एक सर्वसामान्य तरुण मुलगा म्हणजे अविनाश काठवटे. त्याचे आयुष्यच एका रात्रीत या कवितेने बदलले. अविनाश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. अविनाश हा विज्ञान विषयाचे अध्यापनही करतो. नुकतेच त्याने अध्यापनासाठी आवश्यक शिक्षण पूर्ण केले आहे.

अविनाशने स. भु. शि. संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयामधून त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असणार्या पुणे शहराची निवड केली. पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्य अॅण्ड कॉमर्स मधून त्याने कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. पुढे शिक्षकीपेशाची निवड करत अविनाशने पनवेलमधील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणाहून नुकतेच ‘बी.एड.’ पूर्ण केले. मागील चार वर्षे अविनाश आपले शिक्षण घेत असतानाच, कवितेतील गझला लिहित आहे. सुरुवातीला अविनाश कविता लेखन करत होताच, मात्र त्याच्याकडे त्याचे पुरेसे ज्ञान नव्हते. मात्र, सुरेश भट यांचे किमयागार हाती लागले आणि अविनाशला अभ्यासपूर्ण गझल लेखनाचे प्राथमिक ज्ञान मिळाले. आपल्या पठडीबाहेर जात कवितांच्या पलीकडेही काहीतरी आहे, त्याचा शोध घेताना अविनाशला गझल सापडली. आता अविनाश पूर्ण वेळ गझल लिखाण करतो.

महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमात अविनाशला सादरीकरणाच्या संधी मिळाल्या. त्यातूनच त्याच्या कलागुणांना वाव मिळाला. यावेळी त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. यामुळे त्याला गझल कशी लिहावी, यासोबतच ती कशी संगीतबद्ध करावी याबाबतचे ज्ञान हळूहळू वृद्धिंगत होत गेले. अविनाशने पुढे गझल सादरीकरणाचे आणि गायनाचे विविध कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.

’सुखन’ हा कार्यक्रम खर्या अर्थाने अविनाशच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. याची सुरुवात ‘सुखन’साठी झालेल्या एका ऑडिशनने झाली. ऑडिशनच्या शेवटच्या टप्प्यात सात मिनिटे देण्यात आली होती. या सात मिनिटांत काहीतरी सादर करायचे होते. या सात मिनिटांत अविनाशने गझलेची चाल बदलून, त्याचे एक छोटे मॅशअप करायचे ठरविले. हे मॅशअप एकदम हिट ठरले. ’ते इतके यशस्वी ठरेल, अशी मलाही अपेक्षा नव्हती. यामुळे लोकांचा गझल या प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला’, असे अविनाश सांगतो. यातून मला आत्मविश्वास आला की गझल अशीही लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते, असेही तो म्हणतो. या गझलमध्ये नकारात्मक शब्दरचना असली, तरीही त्यातून लोकांनी एक सकारात्मकता शोधली. एक उपरोधिक भाव मांडण्याचा हा प्रयत्न होता, ज्याला लोकांनी अक्षरशः डोयावर घेतल्याचेही अविनाश सांगतो.

अविनाश आज जे काही यश मिळवत आहे, त्यात त्याच्या कुटुंबाचे श्रेय मोठे आहे. अविनाशला त्याची आवड, छंद जोपासण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी कधीही विरोध केला नाही. मात्र, कला जोपासत असताना शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे, हेदेखील त्याला आवर्जून सांगितले. ‘बी.एससी.’ला असताना अविनाशची आवड थोडी मागे पडली होती. कुटुंबाकडून कोणतीही आडकाठी नसल्याने, मला माझी आवड आणि छंद जोपासण्यासाठी अधिक ऊर्जा मिळत गेली. अविनाश करिअरच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, त्याला साहित्य आणि कला क्षेत्रात नवोदित कलाकारांना प्रस्थापित व्यवस्थेकडून अपेक्षित स्वीकार सर्वांत आव्हानात्मक वाटतो. कलाकारांमधील प्रस्थापित आणि कनिष्ठ वर्ग ही दरी कमी व्हावी, अशी इच्छा अविनाश व्यक्त करतो. तुलना होताना लेखनाचा दर्जा, कलात्मकता आणि अनुभव याआधारित असावी. अविनाश म्हणतो, मला वाटे की माझी ओळख ही एखाद्या संमेलनातील सादरीकरणामुळे लोकांना होईल. मात्र, केवळ एका छोट्या रील स्वरूपातील गझल ओळीतून मला ती मिळाली. समाजमाध्यमांवरील वायरल झालेल्या गझलेमुळे नेमके काय बदलेले याबाबत अविनाश सांगतो, खरं तर मान आणि धन दोन्हीही बदलले. आमच्या कविता आणि गझल सादरीकरण कार्यक्रमांना प्रतिसाद वाढला आहे. कार्यक्रम झाल्यावर चक्क ३०० लोक फक्त भेटण्यासाठी थांबतात. हे सर्व माझ्यासाठी अभूतपूर्व आहे.

खरं तर पूर्वीच्या काळी एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला की, त्यातील कलाकार, गायक आणि संगीतकार यांचं आयुष्य खर्या अर्थाने एका रात्रीत बदलून जायचे. त्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आज सोशलमीडियाच्या जमान्यात एका क्षणात लाईव्ह कार्यक्रम किंवा मोबाईलवरील कॅमेरात कैद होतो आणिओ एखादा क्षण क्षणार्धात करोडो लोकांपर्यंत पोहोचतो. अगदी तेच अविनाशच्या बाबतीत घडले. आज प्रेक्षकांचे प्रेम आणि कार्यक्रमांची मागणी असतानाही, अविनाश मात्र गझल या क्षेत्राकडे केवळ एक छंद म्हणूनच पाहतो. भविष्यातही त्याला अध्यापनात रस असल्याने, पूर्ण वेळ अध्यापन करणार असल्याचे अविनाश ठामपणे सांगतो. अविनाशला त्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील आणि लेखन क्षेत्रातील पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.