भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कामगिरी गेल्या दशकभरात कमालीची उंचावली आहे. अनेक नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करत आहेत. यामागे ‘खेलो इंडिया’ या मोहिमेचा वाटा लक्षणीय असाच. आता भारताला क्रीडा क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये आणण्याचे उदिष्ट ठेवून ‘खेलो भारत निती-२०२५’ हे धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा भारतीय क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...खुश है जमाना आज पहली तारीख है’ हे चित्रपटगीत अनेकजणांनी ‘श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग है’वरून पूर्वी ऐकले असेल. त्या गीताचा मतितार्थ पाहूया. रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना, क्रीडा, संशोधन आणि विकासाशी संबंधित खेलो इंडिया धोरण, तसेच तामिळनाडूमधील परमकुडी-रामनाथपुरम राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता अशा केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या घोषणा ऐकल्यावर, अनेकजण असेच खुश झाले असतील. त्यातील भारतीय क्रीडाविश्वदेखील एक होते कारण की, ’राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५’ अर्थात ’खेलो भारत नीती २०२५’ म्हणून जे ओळखले जाते, त्याला मंगळवार दि.१ जुलै रोजी भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
हे नवीन धोरण दोन दशके जुने असलेल्या राष्ट्रीय क्रीडा धोरण २००१ची जागा घेत असून, भारताच्या क्रीडा परिसंस्थेत परिवर्तन घडवून आणणे आणि खेळांद्वारे नागरिकांना सक्षम करणे, हेच या नव्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. भारतातील क्रीडा कार्यपद्धती बदलण्याचेही उद्दिष्ट या धोरणाने निश्चित केले आहे. जागतिक स्तरावर जिंकण्यापासून ते रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी खेळांचा वापर करून अर्थव्यवस्थेला चालना देण्यापर्यंत, विविध क्षेत्रांत खेळांना चालना देण्याचा मार्ग ही नीती प्रदान करते. हे धोरण सर्वांना पुढे येण्यास प्रोत्साहन देते आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० याच्याशी देखील हे सुसंगत असणार आहे.
आज आपण अनुभवत आहोत की, खेलो इंडियाच्या माध्यमातून २०१८ नंतर कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचा विचार केला, तर ११७ सदस्य असलेल्या भारतीय दलात २८ क्रीडापटूंची निवड खेलो इंडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यातील अनेकजण पदकांसह भारतात परतले होते. मनू भाकरचे ना प्रत्येक घरातील आबालवृद्धांच्या तोंडी झाले, ते खेलो इंडियामुळेच. खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक युवकांनी कमी वेळात यश मिळवले आहे. त्याचा आदर्श देशातील इतरांनी घ्यावा याच पद्धतीने खेलो इंडियाचे नियमन केले जाते आणि खेलो भारत नीतीही तशीच त्यातीलच एक. मुख्यत्वेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यात लक्ष घालताना दिसतात. याचाच परिणाम म्हणजे २०४७ मध्ये भारत जगातील सर्वोत्तम पाच प्रमुख देशांच्या पंगतीत बसलेला दिसेल.
खेळातील पाच प्रमुख देश...क्रीडाविश्वातील भारताच्या वरचढ असलेले जगातील पाच प्रमुख देश निवडणे, तसे म्हटले तर जरा कठीणच आहे. कारण, प्रत्येक देशाचे स्वतःचे आवडते आणि यशस्वी खेळ असतात, त्यांची स्वत:ची एक खुबी असते. तथापि, काही देश त्यांच्या क्रीडा इतिहासातील उत्कृष्ट कामगिरी आणि लोकप्रियतेसाठी ओळखले जातात. त्यापैकी पाच देश खालीलप्रमाणे...
१)
अमेरिका : बेसबॉल, बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल आणि आईस हॉकी यांसारख्या खेळांमध्ये अमेरिकेचा दबदबा आहे.
२)
चीन : टेबल टेनिस, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक आणि वेटलिफ्टिंग यांसारख्या खेळांमध्ये चीनचे वर्चस्व आहे.
३)
जर्मनी : फुटबॉल, हॉकी आणि जलतरण यांसारख्या खेळांमध्ये जर्मनीचा दबदबा आहे.
४)
ब्रिटन : क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बी यांसारख्या खेळांमध्ये ब्रिटनचा इतिहास आहे.
५)
ऑस्ट्रेलिया : क्रिकेट, रग्बी, ऑस्ट्रेलियन फुटबॉल आणि जलतरण यांसारख्या खेळांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे.
या पाच प्रमुख राष्ट्रांनी ऑलिम्पिकमध्ये अनेक पदकेही जिंकली आहेत. जो देश ऑलिम्पिकचा यजमान असतो, त्या देशाला अनायसे अतिरिक्त फायदे मिळतात, पदकेही इतर देशांपेक्षा थोडी जास्त मिळवण्याची संधी असते.
भारत २०३६चे ऑलिम्पिक आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच्या आधारभूत संरचना-सुविधा बनवणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विविध कार्यक्रमांची रुपरेषा आखाण्यात सगळे व्यस्त होत आहेत. केंद्रीय मंत्रालये, नीती आयोग, राज्य सरकारे, राष्ट्रीय क्रीडा संघटना, खेळाडू, क्रीडाविश्वातील विशेष उल्लेखनीय व्यक्ती, सगळे लाभार्थी अशा सगळ्यांमध्येच यावर विचारमंथन होत आहे.
खेलो भारत नीती धोरणाची पंचसूत्री...खेलो भारत नीती धोरणाची पंचसूत्री आपण थोडयात जाणून घेऊ. जागतिक स्तरावर उत्कृष्टता, सामाजिक विकासासाठी क्रीडा, आर्थिक विकासासाठी क्रीडा, लोकचळवळ म्हणून क्रीडा आणि राष्ट्रीय धोरण २०२०शी एकात्मता ही ती पंचसुत्री आहे.
जागतिक स्तरावर उत्कृष्टता हे सूत्र केवळ ऑलिम्पिकसाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करणारी प्रणालीच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करते. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभा लवकर ओळखणे, स्पर्धात्मक लीग तयार करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे त्याचे उद्दिष्ट. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांची भरती आणि प्रशिक्षण देऊन खेळाडूंना आधार प्रणाली वाढवणे, राष्ट्रीय क्रीडा महासंघांमधील प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्याचा आणि कामगिरी वाढवण्यासाठी क्रीडा विज्ञान, औषध आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नदेखील यात आहे. पोषण, मानसशास्त्र आणि दीर्घकालीन खेळाडूंच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून, दुखापती प्रतिबंध आणि दुखापतीतून खेळाडूंना सावरण्यासाठी देखरेख प्रणाली स्थापित करणे हेदेखील या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
आर्थिक विकासासाठी क्रीडा ’एनएसपी २०२५’ क्रीडा क्षेत्राच्या अफाट आर्थिक क्षमतेला ओळखते आणि भारताच्या विकासात हे धोरण एक प्रमुख योगदानकर्ता होण्याचे उद्दिष्टही ठेवते. याच्या पूर्ततेसाठी सरकार खासगी कंपन्यांसोबत काम करेल, जेणेकरून उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण आणि त्यांचे व्यवस्थापन करता येईल. तसेच सीएसआर आणि विविध निधीच्या नवीन मार्गांद्वारे खेळांना पाठिंबाही मिळेल.
२०३६च्या ऑलिम्पिक आयोजनाचे उदिष्ट ठेवून, भारत मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनू इच्छितो. या धोरणाचे उद्दिष्ट कार्यक्रमांचे नियोजन सुधारणे, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि देशभरातील शहरांमध्ये १३ नवीन व्यावसायिक क्रीडा लीगना प्रोत्साहन देणे आहे. सरकार खेळाच्या माध्यमातून व्यवसाय, करिअर निर्माण करण्याची आणि देशाला गौरव मिळवून देण्याची संधी साधण्याची योजना आखत आहे. सामाजिक विकासासाठी खेळ या धोरणामुळे प्रत्येकाला खेळ खेळण्याची संधी मिळेल, याची खात्री करू इच्छिते. विशेषतः महिला, जनजाती समुदाय, गरीब कुटुंबे आणि अपंग लोकांचाही यात विचार करण्यात आला आहे. पारंपरिक भारतीय खेळ परत आणण्याची, खेळाडूंना खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात करिअर घडवण्यास मदत करण्याची आणि भारतीय डायस्पोराशी जोडण्याचीदेखील ही योजना आहे.
शैक्षणिक एकात्मता हे धोरण, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०शी सुसंगत आहे. यामध्ये म्हटले आहे की, शारीरिक हालचाली सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यास, कला आणि इतर कौशल्यांइतकेच खेळांनाही महत्त्वाचे बनवण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या नियमित शिक्षणाचा भाग म्हणून खेळण्याची, तंदुरुस्त राहण्याची आणि खेळाद्वारे सर्वांगिण विकासाची संधी मिळावी हे सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट या धोरणासमोर आहे. राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५चे उद्दिष्ट भारताच्या विकासाचा एक मोठा भाग निरोगी, मजबूत आणि देशातील एकता वृद्धींगत करण्यासाठी खेळांचा वापर करण्याबद्दल भाष्य करते. भारताला एक अव्वल क्रीडा राष्ट्र बनवताना प्रत्येकाला खेळण्याची आणि विकासाची संधी मिळेल, याची खात्री करण्यासाठी ही एक केंद्रीय योजना आहे.
‘क्रीडा भारती’चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख, अखिल भारतीय नियामक मंडळ सदस्य, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशा जबाबदार्या सांभाळणार्या श्री विजय पुरंदरे हे ‘क्रीडा भारती’च्यावतीने खेलो भारत नीतीचे स्वागत करताना म्हणतात: ’एक सामाजिक खेळ संघटन म्हणून ‘क्रीडा भारती’ ही १९९२ पासून क्रीडा क्षेत्रात काम करते आहे. या काळात आपण भारतीय क्रीडा धोरणाबद्दल अनेक अभ्यासपूर्ण गोष्टी, वेळोवेळी भारत सरकारसमोर मांडल्या आहेत आणि त्याबद्दल अपेक्षा ही व्यक्त केल्या आहेत. २०१४ नंतर खेलो भारत आणि ‘फिट इंडिया’ च्यामाध्यमातून आपल्या अपेक्षांबद्दल मिळणार्या सकारात्मक प्रतिसादाची एक झलक आपल्याला दिसली होती. आता ’खेलो भारत नीती - २०२५’ मधून अनेक गोष्टी साकारताना दिसत आहेत. खेळातून राष्ट्रनिर्मिती हे खर्या अर्थाने खेळाचे पोटेन्शियल अनलॉक करणारे आहे. जागतिक उत्कृष्टतेचा पाठलाग करताना किंबहुना त्यासाठीच सगळ्यात आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे, देशात खेळ संस्कृती निर्माण करणे. हे भविष्यासाठी पायाभूत आहे. खेळ सर्वव्यापी केला, तर देशाचे आरोग्य उत्तम राहील, यावर दिलेला भर आश्वासक आहे. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने खेळावे. विद्यार्थांसाठी खेळाला अभ्यासाबरोबर दिलेले स्थान, सर्व उपलब्ध साधनसामग्री, मैदाने यांचा खेळासाठी कटाक्षाने वापर असे अनेक आश्वासक मुद्दे यात दिसतात.
खेळाडूंबरोबरच, प्रशिक्षक, प्रशासक यांचेही प्रशिक्षण, हा अजून एक कलाटणी देणारा मुद्दा. खेळाचा विचार फक्त खेळाडू आणि स्पर्धा एवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता, त्याला प्रशिक्षक, इन्स्टिट्यूट्स, संशोधन, उत्पादन असा सर्वांगीण करून, त्याला पर्यटन आणि इकोनॉमीशी जोडणे हे निश्चितच खूप आनंददायी आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, सुदृढ शरीर आणि मन, सामाजिक समरसता यातून सामर्थ्यशाली राष्ट्रनिर्मितीचा महामार्ग हा खेळाच्या मैदानातून जातो, यावर ‘क्रीडा भारती’चा पूर्ण विश्वास आहे आणि नवीन राष्ट्रीय खेळ नीतीमधून हा महामार्ग अधिकाधिक प्रशस्त होताना दिसत आहे.
खेलो भारत धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये ईशान्य भारत, अंदमान-निकोबार यांसारख्या प्रदेशासहित भारतात सुदूर पसरलेल्या आदिवासी भागात खेळांच्या पायाभूत सुविधा विकसित करणे समाविष्ट आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून, या धोरणात ऑलिम्पिक क्रीडाप्रकारातील खेळ, जलक्रीडांसहित, खेलो इंडिया शालेय खेळ आणि पारंपरिक आदिवासी खेळांचा समावेश करण्याची योजना आहे. या धोरणातील सर्वांत प्रभावी पैलूंपैकी एक म्हणजे खेळाडूंच्या कल्याणासाठीची त्याची वचनबद्धता, ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, संतुलित आहार आणि योग्य पोषण यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या आणि अशा नानाविध योजनांचा समावेश असल्यानेच, भारतीय क्रीडाविश्वात आदिवासी युवक-युवतींचा प्रवेश सुकर होईल. अशाप्रकारे शहरवासी आणि जनजाती असे दोन्ही समाज भारताला प्रथम पाचांमध्ये आणताना, आपल्या सर्वांना लवकरच दिसतील आणि म्हणून जनजाती कल्याण आश्रमाचा खेलकूद आयामदेखील या नीतीचे स्वागत करतो.’
प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने या खेलो भारत नीतीची मुक्त कंठाने प्रशंसा करायला हवी. त्यातील योजना काटेकोरपणे आचरणात आणायला हव्यात आणि तसे केले, तर खचितच २०३६च ऑलिम्पिक भारत नक्की यशस्वी करून दाखवेल आणि ऑलिम्पिक संघटनेचा भारतावरचा विश्वास सार्थकी ठरेल.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४