अभंग रिपोस्ट - भक्तीचा नवसाज, तरुणाईचा गजर

    06-Jul-2025   
Total Views |


आज डिजिटल युगात, व्हिडिओ रील्स आणि स्टोरीजच्या गर्दीत भक्तीचे निवांत अस्तित्व शक्य आहे का? तर हो! आणि हे शक्य करून दाखवले आहे ‘अभंग रिपोस्ट’ या तरुणांच्या जोशात मिसळलेल्या भक्तिगटाने. फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी पारंपरिक अभंगांना आधुनिक सूरांची शाल ओढवली. पण, मूळ भावनेचा गाभा टिकवून! आज खास आषाढी एकादशीनिमित्ताने या ‘अभंग रिपोस्ट’च्या टीमशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...


हरीकथेतें धीकारी, शत्रु माझा तो वैरी
तुका म्हणे क्षण, नको तयाचें दर्शन

अशा ओळी, जेव्हा कोणी एखादा तरुण स्टेजवर उभा राहून ‘ओपन माईक’वर सादर करतो, तेव्हा ती केवळ साद नाही, तर ती विठ्ठलाच्या गाभार्‍यातून आलेली एक आर्त हाक वाटते. ‘विठ्ठल मुक्तिदाता’ या संत तुकारामांच्या अभंगाला ‘अभंग रिपोस्ट’ने दिलेली साद केवळ व्हायरलच झाली नाही, तर तरुणांच्या अंतःकरणात जागा करून गेली.

‘अभंग रिपोस्ट’ ही केवळ एक संगीत मंडळी नाही. ते एक संवेदनेचे आंदोलन आहे. त्यांनी भक्ती आणि आधुनिकतेचा मिलाफ इतक्या सहजतेने साधला आहे की, आजची पिढी विठ्ठलाच्या ओव्या गाताना स्टाईलमध्ये नाही, तर समरसतेत दिसते. त्यांच्या सादरीकरणांमध्ये पारंपरिक कीर्तनाचा गाभा आहे. पण, साद आहे ‘रॅप’सारखी, एक्स्प्रेशन ‘ओपन-माईक’सारखे आणि भावभक्ती अगदी माऊलीच्या शरणागतपणासारखी! वारीच्या वाटेवर चालणार्‍या पावलांतून जशी चिखलातली श्रद्धा दिसते, तशीच श्रद्धा ‘अभंग रिपोस्ट’च्या गाण्यांतूनही प्रकट होते. ‘अभंग रिपोस्ट’ ही केवळ एक कलात्मक प्रयोगशाळा नसून, ती एक भावनिक क्रांती आहे, जी नव्या युगातील माणसाला, त्याच्या शैलीतच विठ्ठलाशी जोडते आणि विठ्ठलभक्तीला नवा आवाज, नवा ओघ, आणि नव्या ओव्या देते.
‘अभंग रिपोस्ट’ या अद्वितीय सांगीतिक प्रवाहात, तबल्याच्या प्रत्येक ठोक्यात विठ्ठलभक्तीचं स्पंदन रुजवणारा, अभंगांना नव्या चालीत गुंफणारा आणि पारंपरिक संतवाणीत आधुनिकतेचा सुरेख सुगंध मिसळणारा एक कलाकार म्हणजे अभंगांच्या नवजीवनाचा शिल्पकार विराज आचार्य. विराजचं तबलावादन केवळ तांत्रिक कसब नव्हे, तर त्यात आहे एक भावमधुर अनुभूती. प्रत्येक अभंगाला तो इतक्या लयदार आणि समरस चालीत सादर करतो की, प्रेक्षक क्षणातच त्या सूरांच्या प्रवाहात वाहत जातात. त्याच्या वादनात एक सच्चा वारकरीही आहे आणि एक प्रयोगशील तरुण कलाकारही.

गिरगावातील कार्यक्रमामुळे ‘अभंग रिपोस्ट’ जनमानसांपर्यंत...

विराज सांगतो की, “आम्ही सगळे सुरुवातीला ‘कॉलेज बॅण्ड्स’मध्ये सादरीकरण करायचो. एके दिवशी गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये गिरगावात एक कार्यक्रम करायचा, असे सगळ्यांनी ठरवले आणि सुदैवाने आम्हाला रंगमंच प्राप्त झाला. पण, कलाकाराच गणित वेगळे असते. आपण काहीतरी वेगळे करून बघूया. पण, वेगळे म्हणजे काय तर पटकन एक संकल्पना सुचली की, अभंग करून पाहुया. मग अभंगांना आधुनिक प्रकारची चाल देण्याचा प्रयत्न केला आणि तो कार्यक्रम इतका गाजला की, आम्ही एक एक अभंग पुन्हा पुन्हा त्या रॅलीमध्ये गात होतो. तिथून ‘अभंग रिपोस्ट’ या बॅण्डची सुरुवात झाली. सुरुवातीला असे काही उद्दिष्ट नव्हते. पण, मग विठ्ठलाची कृपा म्हणावी, आमच्या या कार्यक्रमाला तरुणांनीदेखील उत्तम साथ दिली. शेवटी एक कलाकार म्हणून चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हे आमचे कर्तव्य आहे.”

संतांच्या शिकवणीला चाल देणे हे ‘अभंग रिपोस्ट’चे कर्तव्य

अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे आपले रोजचे जीवन. कुठलाही कीर्तनकार अध्यात्माला याचे संकल्पनेशी जोडतात की, जसे आपण आपल्या घरातला कचरा साफ करतो. तसा आपल्या विचारांचा, मनातला कचरा साफ करून स्वच्छ मन ठेवून चांगले माणूस म्हणून आयुष्य जगणे. हा अध्यात्माचा विचार खूप सोप्या रीतीने माणसाने जीवन कसे जगावे, हे अभंगात अनेक संतांनी सहज मांडलेले आहे. विराज सांगतो की, “आम्हालाही ते अभंग सादर केल्यावर कळले की, याच्यात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला कळेल अशा समाजप्रबोधनाच्या गोष्टी सोप्या पद्धतीत लिहून ठेवल्या आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला जुळवून ठेवण्यासाठी आम्ही आमच्या कार्यक्रमातून थोडे तरुणांच्या कलेने अभंगांची चाल त्या त्या अर्थाशी जुळवून देतो.”

अभंग निवडण्याची आणि त्याला चाल लावण्याची प्रक्रिया

याविषयी बोलताना विराज म्हणाला की, “मुळात आम्ही अभंग निवडताना त्यातून काही समाज प्रबोधनात्मक अर्थ आहे का? त्यातून कोणता उपदेश आहे का? असे अभंग निवडण्याचा आमचा पहिला प्रयत्न असतो. जसे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’; ‘पापाची वासना नको दावू डोळा, त्याहूनही आंधळा बराच मी’ आणि यात गंमत म्हणजे, कोणत्याही अभंगाला चाल लावताना आमच्या सहाजणांमधला प्रत्येकजण या अभंगाला चाल लावत असतो. असा आमचा आधुनिकतेला स्पर्श करणारा अभंग तयार होतो.”

‘अभंग रिपोस्ट’ला सोशल मीडियावर तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘अभंग रिपोस्ट’ला सोशल मीडियावर मिळणार्‍या तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाविषयी विचारले असता, विराज म्हणतो की, “आम्हाला अभंगाचे जे भाव आहेत ते आजच्या पिढीला, रिल्सच्या काळामध्ये जिथे माणूस स्वस्थ बसू शकत नाही, त्या काळामध्ये प्रत्येक अभंगांमधला तो भाव, तो अर्थ जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा अट्टाहास असतो. कधी कधी एक अभंग शोधून तो चालीत आणायला पाच ते सहा महिने लागतात. जोवर आम्हाला त्याचा गाभा सापडत नाही, तोवर आम्ही ते करत नाही. सोशल मीडियावर आमच्या प्रत्येक अभंगाला, ‘लाईव्ह शो’ला तरुणांचा भरघोस प्रतिसाद असतो.”

अभंग केवळ मुंबई, महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे लक्ष्य

‘अभंग रिपोस्ट’च्या अभंगांना चांगला प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळाल्या. पुढे काही नवीन अभंगांना चाल लावून, समाजोपदेशक गाणी बनवून ते सादर करण्याचा टीमने प्रयत्न केला. त्यानंतर ‘अभंग रिपोस्ट’च्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात झाली. जर्मनीतील ‘भक्ती मार्ग’ या संस्थेशी ‘अभंग रिपोस्ट’ जोडले गेले. त्यांच्याबरोबर यंदाच्या आषाढीला ‘सारेगम भक्ती चॅनेल’वर ‘पुंडलिक वरदे 2.0’ हे कीर्तन प्रदर्शित करण्यात आले. यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, हे अभंग केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या बाहेर जाऊनसुद्धा याचे कार्यक्रम होत आहेत आणि ते होत राहतील, हीच विठ्ठल कृपा, असा विश्वास ‘अभंग रिपोस्ट’च्या टीमने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला. त्यांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.