श्री पंडरगे विठ्ठल

    05-Jul-2025
Total Views | 41

विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प पूर्ण केला आणि आता हा विषय देखण्या ग्रंथरूपात प्रकाशित झाला आहे.


भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा गाभा नानाविध संप्रदाय व परंपरा यांनी परिपूर्ण आहे. मराठी संत परंपरा हा संप्रदायाचा एक दिव्य आविष्कार. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, रामदासी संप्रदाय व महानुभाव संप्रदाय यांचे भरणपोषण संप्रदायिक जीवन प्रवाहाने केले. क्षेत्ररूपाने स्थान आणि तीर्थरूपाने त्या स्थानाची निश्चितता आणि देवतारूपाने माहात्म्य असे तीर्थक्षेत्र देवता, विचार, सूत्र आणि सांस्कृतिक इतिहासाचे देणे आहे. ज्ञानदेव, तुकाराम नामघोष करीत पंढरपूरला निघालेला भक्तांचा थवा विष्णुशयन अर्थात ‘आषाढी एकादशी’ आणि ‘विष्णु प्रबोधन’ अर्थात ‘कार्तिकी एकादशी’ला अद्भुत दर्शन, अलौकिक आनंद आणि प्रसन्न सुखाचा ठेवा असतो. विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प पूर्ण केला आणि आता हा विषय देखण्या ग्रंथरूपात प्रकाशित झाला आहे.

श्री पंडरगे विठ्ठल... आपल्यापैकी अनेकांना ‘पंडरगे’ या नावाबद्दलही ऐकून नव्याने माहिती झाली असेल. ‘पंडरगे’ अर्थात पांडुरंग स्थान कर्नाटकात आहे, अशी घट्ट धारणा अनेकांची आहे. शके ११५९ मध्ये होयसळ वीर सोमेश्वर पंढरपुरी आहे. तत्पूर्वी मंगळवेढ्याचे कलचुरी राजे मंगळवेढा व नंतर कल्याणहून राज्य करीत असताना पंढरपूर (पंडरगे) कुन्तल देशात होते. कलचुरी पूर्वी कल्याणी चालुय व राष्टकूट ही दोन राजघराणी मान्यखेट कर्नाटकांतून राज्य करीत असताना पंढरपूर कुन्तल कर्नाटकात होते. अशा प्रकारे राष्टकूट, चालुय, कलचुरी व होयसळ काळांत पंढरपूर पंडरगेचा समावेश कुन्तल कर्नाटकात होत असला, तरी शके १०८९ साली कलचुरीपासून पंढरपूर कुन्तल देशातून माणदेशात आले व तेथे मराठीचा प्रभाव दिसू लागला. सिंघण यादव काळात पंढरपूर माणदेशात आले असण्याची संभावना नाकारता येत नाही. धारवाड, विजापूर, वनवासी या कर्नाटकांतील प्रदेशावर यादव सिंघणाचे राज्यच असल्यामुळे या प्रदेशात मराठी, कन्नड भाषा दिसून येतात. अशीच परिस्थिती मंगळवेढा, पंढरपूर, मिरज या कुन्तल देशातील प्रदेशांची होती. त्यामुळे संस्कृत, कन्नड आणि मराठी या भाषा पंढरपूर, मंगळवेढा परिसरात प्रचलित होत्या. त्यामुळे पंढरपूरचा उल्लेख ‘पांडर’, ‘पांडरीपूर’ (दक्षिण द्वायवती) या कन्नड, मराठी मिश्र भाषेतून आला. येथे पांडरीपूर-पंडरगे असे दोन निर्देश स्थानवाचक आहेत. याचा मूळ क्रम पंडरगे-पांडर-पांडरिपूर-पंढरपूर असा आहे.

स्कंद पुराणाच्या भक्कम आधाराने म. रा. जोशी यांनी पांडुरंग माहात्म्याचा विस्ताराने विचार या ग्रंथात केलेला आहे. सहा प्रकरणांत पुस्तकाचे वर्गीकरण केले आहे. पौण्डरिक क्षेत्री पुंडलिक वरद विठ्ठल, डिंडिश पांडुरंग आणि शैव संप्रदाय, पांडुरंग माहात्म्य रचना, पांडुरंग विठ्ठलच्या संबंधित ताम्रपट आणि शिलालेख यांच्यावर विस्तृत भाष्य केले आहे. तसेच, त्यांचे वाचनही दिलेले आहे. ‘दक्षिण भारतातील विठ्ठल’ यावर दक्षिणेतील काही नामवंत इतिहास संशोधकांनी केलेल्या मांडणीवर विवेचन म. रा. जोशी यांनी केलेले आहे. याशिवाय वारकरी समाज आणि संत विषयांवर सविस्तर लिखाण या ग्रंथात केलेले आहे. पंढरपूर क्षेत्र भक्त पुंडलिक श्रीविठ्ठलासंबंधी पटण्यासारखा विचार त्यांनी मांडला आहे. एवढा सविस्तर विचार कोणत्याही संशोधक, लेखकाने केल्याचे आढळत नाही. ग्रंथाला ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठलभक्तीचे हे क्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला येणारे संत, सत्पुरुष, योगी, तपस्वी, आचार्य, माहात्मे अनेक आहेत. असंख्य आहेत. हे सर्व पंढरपूरचे यात्रेकरू आहेत. आपापल्या योगभक्ती विद्येच्या ज्ञानाच्या वैदिक परंपरा व उपपरंपरा उराशी बाळगून पंढरपूर क्षेत्राला येणार्या शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू, त्यांचे वडीलबंधू, नरसी मेहता, परमवैष्णव ताताचार्य, त्यास तीर्थ व रामानुजादि सर्व प्रकारचे वैष्णव व शैवयोगी परमश्रद्धेने पंढरपूरला येत आहेत. राधा व राधाभक्त वृंदावनातून येतात, तसे आंध्रातूनही कृष्णभक्त येतात. अशा या सर्व कृष्णभक्तांचे पंढरपूर हे क्षेत्र आहे व विठ्ठल देव आहे. दुसरे म्हणजे, श्रीकृष्णाचे हे आद्य रूप महायोगपीठ स्थानात होते. महायोगपीठ हे विठ्ठलाचे विशेषण नसून, तो ज्या स्थानावर उभा आहे, त्या स्थानाचे नाव आहे.

महायोगपीठात पुंडलिक मुनींना वर देण्यासाठी रुमिणी प्राण संजीवन श्रीकृष्ण गोपासह भीमातीरावर आल्यानंतर त्याचे मंदिर व मूर्तिस्थापना पुंडलिकांनी केली होती काय? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. कारण, श्रीकृष्ण ‘पांडुरंग’ नावाने गोवर्धनाहून पंढरपूरला आला. पुंडलिकाच्या द्वारी उभा राहिला. त्याला पाहून उभे राहण्यासाठी वीट भिरकावली व विटेवर उभा राहिला. हेच श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप परंपरेने स्वीकारले आहे.

पंढरपुरी भीमा चंद्रभागा तीरावर पुंडलिकाचे स्थान आहे. हे स्थान पुंडलिकाची समाधी आहे. येथे पूर्वी पुंडलिकाची मूर्तीही होती. अफझलखानने पंढरपूरवर केलेल्या स्वारीत पुंडलिकाच्या मूर्तीचा विध्वंस करून ती नदीत फेकण्यात आली. समाधी ही शिवलिंग रूप असते, अशी हिंदू परंपरा आहे. त्यानुसार आजही तेथे शिवलिंग आहे. तुकारामांनी पंढरीनाथ पंढरीचा उल्लेख केला, तर शंकराचार्यांनी पांडुरंग हे परब्रह्मलिंगच असे नमूद करून पांडुरंग शिवाचा उल्लेख केला. मात्र, दोघेही ‘पांडुरंगक्षेत्र’ नावाने विठ्ठलाच्या स्थानाचा उल्लेख करतात आणि पांडुरंग क्षेत्रात विठ्ठल आहे, हे सांगतात. वेगळ्या भाषेत शिवक्षेत्रात श्रीकृष्ण विठ्ठल आहे. शिवशंकर हा महायोगी आहे. योगशास्त्राचा जनक आहे. योगशास्त्राचा प्रवर्तक शिव आहे, म्हणून येथे योगी, तपस्वी, मुनी, ज्ञानी येतात आणि आपल्या तपस्येची इतिकर्तव्यता शिवज्ञानाने श्रीकृष्ण अवतार दर्शनात मानतात. तसेच, श्रीकृष्ण हा साक्षात महाविष्णु आहे. परंपरेप्रमाणे विष्णुची शयनयोग यात्रा आषाढी एकादशीला सुरू होते व कार्तिकी पौर्णिमेला प्रबोधनास सुरुवात होते. विष्णुचे शयन आणि प्रबोधन फक्त पंढरपूर महायोगपीठ क्षेत्रात होते.

पंढरपूर हे पांडुरंग क्षेत्र आहे. शिवाला मस्तकावर श्रद्धेने धारण करणारा विठ्ठल हा ‘पांडुरंग’ नावाने प्रसिद्ध आहे. पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनास येणारे भक्त दिंडोश दर्शनास जे येत, त्यावरून ‘दिंडी’ शब्दप्रयोग सुरू झाला. आज हा शब्द लोकप्रिय आहे. ‘वारी दिंडी’ आणि ‘फड’ हे वारकरी संप्रदायाचे प्रधान वैशिष्ट्य असून, हे तिन्ही पंढरपुरी येणार्या वारकर्याशी संबंधित आहेत. स्कंद व पद्म पुराणातील पांडुरंग माहात्म्यात नमूद केलेल्या माहितीवरून डिंडिरवनातील शिव व त्याच्या दर्शनास येणारे भक्त यावरून ‘डिंडि’ ही संज्ञा प्रचलित होऊन गटागटाने पंढरीस येणार्या गटांना ‘डिंडी’ नाव प्राप्त झाले. वेगवेगळ्या स्थानाहून शु. ११ ला हरिदर्शनास येणार्या भक्तांच्या प्रथेला वारी करणे किंवा वारीपदाने संबोधू लागले.

पंढरपूरचा श्री विठ्ठल हा कृष्ण, विष्णु आहे. दारावती द्वारका व व्रजमंडळातून गोपासह सवत्स धेनुसह तो पंढरपुरी आलेला आहे. म्हणून त्याच्या दर्शनार्थ हरीदिनी म्हणजे शुद्ध पक्षांतील एकादशीला आपल्या स्थानाहून भक्त येतात, तसे कोणत्याही १२+१२=२४ एकादशीपैकी एकादशीला भक्त दर्शन घेऊ शकतो. परंतु, संकल्प करून एकादशी दर्शन चारपैकी कोणत्याही एकादशीला दर्शनास येणे, या प्रथेला कालांतराने वारी संज्ञा मिळाली आणि वारी म्हणजे निश्चित केलेल्या एकादशीला पंढरपुरी विठ्ठल दर्शनास येणे. वारकर्याचा हा नेम आहे. तुळशी माळ व गंध लावून ‘पुंडलिक हरी वरद श्री विठ्ठल’ नामघोष करून विठ्ठलाचे दर्शन घेणे, अशी ही वारीची प्रथा अतिप्राचीन आहे. पुंडलिकासाठी श्रीहरी विठ्ठल प्रगटल्यापासूनच या वारीप्रथेला एकादशी दर्शन तिथीला गावोगावींचे विठ्ठल भक्त पंढरपूरला येण्याची पद्धत सुरू झाली. शके ११५९ पंढरपूर लेखात वारीचा उल्लेख येतो. तसेच डॉ. जोशी यांच्या मते, ‘दिंडी’ हा शब्द कानडी असावा. ‘वारी’ शब्दावरून ‘वारकरी’ शब्द प्रचारात आला, जो वारी करतो तो वारकरी! पुढे वारकरी विठ्ठलभक्त संप्रदायवाचक अर्थाने रूढ झाला. पंढरपूरला विठ्ठल दर्शनार्थ जाणारा नियमाने जाणारा विठ्ठलभक्त, तो ‘वारकरी’ असा अर्थ प्रचारात आला.

या ग्रंथातील शेवटच्या प्रकरणात वारकरी संतमंडळींचा परिचय लेखकाने करून दिलेला आहे. श्रीविठ्ठलासंबंधी हजारो अभंगांची रचना या संतांनी केलेली आहे. त्यात मूर्तीबद्दल वारकर्यांच्या आचरण धर्मावर, अद्वैत तत्त्वज्ञासंबंधी मूलगामी विचार आहेत. विठ्ठलाच्या संबंधात तसेच, वारकरी पंथाबद्दल एवढी रचना तेरावे ते सतराव्या शतकापर्यंत अन्य मूर्ती व संप्रदायासंबंधीचे वाङ्मय क्वचितच असावे आणि खरे तर हा ग्रंथ सर्वस्पर्शी झाला आहे. असे देगलूरकर प्रस्तावनेत लिहितात आणि संपूर्ण ग्रंथ वाचल्यावर विठ्ठलासंबंधी इतके सखोल आणि संशोधन पद्धतीने विश्लेषण करणारा दुर्मीळ ग्रंथ यानिमित्ताने वाचकांना उपलब्ध झाला आहे. आवर्जून ग्रंथ वाचायला हवा आणि मुळात संशोधनात्मक लेखणीतून ही ग्रंथनिर्मिती झाली. त्यामुळे एक चांगला दस्तऐवज आता मराठी साहित्यविश्वात यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे. वाचनीय आणि संग्रही असावा, असा ग्रंथ श्री पंडरगे विठ्ठल. रामकृष्ण हरी...

पुस्तकाचे नाव : श्री पंडरगे विठ्ठल
लेखक : म. रा. जोशी
पृष्ठसंख्या : ४१६
मूल्य : ६०० रुपये
प्रकाशक : अपरांत प्रकाशन, पुणे
पुस्तकासाठी संपर्क क्रमांक : ९४०३६०५७८३

सर्वेश फडणवीस
८६६८५४११८

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121