शाश्वततेचे स्वर : परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर

    06-Jul-2025
Total Views |

ओडिशा हे देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्य केवळ जगन्नाथ मंदिरासाठीच सुप्रसिद्ध नसून, या राज्यातील अन्य मंदिरेही तितकीच प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण. यापैकी कलिंग स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना असलेल्या परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिरांविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया...

बंगालच्या उपसागराच्या जवळ असलेले भारतातले एक खूप जुने राज्य म्हणजे ओडिशा. कधी काळी ते ‘कलिंग’ या नावाने ओळखले जायचे. इथली मंदिरे बघताना, इथल्या मूर्तींचे निरीक्षण करताना काळही स्तब्ध होतो! या राज्याने खूप काही बघितले. इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात झालेल्या सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धापासून ते जगाला शांतीची शिकवण देणार्‍या बौद्ध धर्माचा प्रसार करण्यापर्यंत अशा खूप गोष्टी या राज्याने बघितल्या, अनुभवल्या. ते ‘कलिंग युद्ध’ असे होते की, तिथून संपूर्ण इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. या प्रदेशावर मेघवाहन, शैलोद्भव, भौमकार, सोमवंशी आणि गंग अशा उत्तमोत्तम राजघराण्यांनी राज्य केले. प्रत्येकाने या राज्याच्या सांस्कृतिक आणि स्थापत्यदृष्ट्या काही ना काहीतरी योगदान हे दिलेले आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ही तर शेकडो मंदिरांची भूमी. यापैकी सर्वांत आधी तयार झालेली जी मंदिर आहेत; परशुरामेश्वर आणि त्यानंतर मुक्तेश्वर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर ही दोन्ही मंदिरे एकत्र घेण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, ही दोन्ही मंदिरे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या अंतराने तयार झालेली असून, मंदिर स्थापत्यामधले महत्त्वाचे टप्पे इथे आपल्याला अभ्यासता येतात. परशुरामेश्वर मंदिर हे कलिंग वास्तूकलेची सुरुवात असून मुक्तेश्वर मंदिर हा त्याचा परमोच्च बिंदू अशा पद्धतीने आपल्याला ही मंदिर बघायची आहेत.

परशुरामेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून आकाराने जरी लहान असले, तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे. साधारण इसवी सनाच्या सातव्या शतकात शैलोद्भव राजवटीच्या कालखंडामध्ये या मंदिराची निर्मिती झाली. ओडिशामध्ये मंदिरांच्या बाबतीत वापरले जाणारे शब्ददेखील वेगळे आहेत बरं का! ‘विमान’ म्हणजेच ‘गर्भगृहाचे शिखर’ आणि ‘जगमोहन’ म्हणजेच ‘सभामंडप.’ शिखर हे उंच सखल असून वक्राकार आहे; तर त्याच्या समोरच्या बाजूला म्हणजेच शुकनासिकेच्या भागावर आपल्याला एक उत्तम शिल्पदेखील बघायला मिळते. जगमोहन म्हणजे मंडपाचे छत हे थोडेसे उतरते असे आपल्याला दिसते. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये केली गेलेली ही रचना आहे. त्यामुळे मंदिरासाठीच वेगळे अधिष्ठान, मंडोवराची वेगळी भिंत अशा गोष्टी इथे फारशा आपल्याला बघायला मिळत नाहीत. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, जरी भगवान शिवाला अर्पण केलेले मंदिर असले, तरी या ठिकाणी शिव आणि शक्ती यांची एकत्रित आराधना केली जाते. ओडिशामधले हे खूप दुर्मीळ असे उदाहरण आहे. मंदिर स्थापत्याच्या विकासामधला परशुरामेश्वर मंदिर हा एक अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणून आपल्याला याकडे बघावे लागते.

यानंतर तिथूनच अगदी शंभर-सव्वाशे मीटरवर असलेले मुक्तेश्वर हे मंदिर बघूया. मुक्तेश्वर मंदिर हे कलिंग वास्तूकलेचा सर्वोत्तम बिंदू. आकाराने जरी हे मंदिर लहान असले, तरी त्याच्यामध्ये साधलेले स्थापत्य संतुलन आणि सौंदर्य हे त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. या मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला एक दगडी तोरण दिसते. अर्धवक्राकृती प्रवेशद्वार आहे आणि त्यात अतिशय सुंदर बारीक बारीक कोरलेले नक्षीकाम. मुक्तेश्वर मंदिराचे ‘विमान’ म्हणजेच ‘शिखर’ हे ‘रेखा देऊळ’ या प्रकारामध्ये मोडते. हे सडसडीत उंच असून याची वक्राकार रचना आहे. त्या शिखराचा प्रत्येक स्तर आपल्याला छोट्या छोट्या सजावटींनी भरलेला दिसतो. शिखराच्या सर्व बाजूंना वेगवेगळ्या देवता, गंधर्व आणि पुष्पदंड यांची रचना केलेली बघायला मिळते. या मंदिराचा सभामंडप म्हणजेच ‘जगमोहन’ हा चौरसाकृती असून, त्याच्या छतावर म्हणजेच वितानावर अतिशय सुंदर मंडल केलेले दिसते. याच्यामध्ये वेगवेगळ्या नृत्यांगनादेखील कोरलेल्या दिसतात. या जगमोहनावर कोरलेल्या जाळीदार खिडक्या लक्ष वेधून घेणार्‍या आहेत. याच खिडकीवर बाहेरच्या बाजूला आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. जी आपण पुढे बघूया.

परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या काहींचा परिचय आपण आता इथे करून घेऊया.

परशुरामेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या देवकोष्ठामध्ये कार्तिकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. कार्तिकेयाच्या खाली त्याचे वाहन म्हणून मोर कोरलेला असून, त्या मोराच्या पंजाखाली पकडलेला नाग हा आपले लक्ष वेधून घेतो. अंगावरचे दागिने हे खूप नक्षीकाम केलेले असून त्यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवानी त्याला दिलेली वाघनखे ही कार्तिकेयाने गळ्यात घातलेली आपल्याला बघायला मिळतात. कार्तिकेयाची जी केशरचना आहे, त्याला ‘त्रिशिखंड केशरचना’ असे नाव आहे. तीन भागांमध्ये झालेले केसांचे विभाजन इथे आपल्याला बघायला मिळते. त्याने हातामध्ये भाला पकडलेला आपल्याला दिसतो. खपाटीला गेलेले पोट आणि हातामध्ये कोरलेला त्रिशूल या अतिशय सुंदर पद्धतीने तिथे आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर चामुंडेचे वाहन असलेला घुबड हा पक्षीदेखील पायाशी खाली कोरलेला आपल्याला बघायला मिळतो.

परशुरामेश्वर मंदिरामध्येदेखील मुक्तेश्वर मंदिराप्रमाणेच आपण लहानपणापासून ऐकत असलेली मगर आणि माकड यांची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. माकड चातुर्याने त्या मगरीच्या तावडीतून आपली कशी सुटका करून घेतो, अशी ती गोष्ट आहे. बुद्धिचातुर्य आणि संवाद याचे उत्तम उदाहरण म्हणजे ती गोष्ट! मंदिराच्या खिडकीवर जो खांब आहे, त्या खांबावर एका झाडावरती बसलेले माकड, खाली मगरीच्या पाठीवर बसलेले माकड आणि नंतर वर जाऊन परत मगरीकडे बघणारे माकड अशा पद्धतीने ही गोष्ट कोरलेली आहे. म्हणजे आज आपण ज्या गोष्टी बघतो, त्या गोष्टींचे प्राचीनत्व हे मंदिरांमध्ये गेल्यावर आपल्याला लक्षात येते.

ओडिशामध्ये पुरी, कोणार्क आणि लिंगराज यानिमित्ताने अनेकांचे जाणे होते. पण, तिकडे गेल्यानंतर ओडिशामधील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी असणारी ही काही मंदिरे नक्कीच तुमच्या यादीमध्ये समाविष्ट करा. त्याचबरोबर भुवनेश्वरपासून जवळच अगदी तास-सव्वा तासाच्या अंतरावर सुभाषचंद्र बोस यांचे कटक हे जन्मस्थान आहे. आपण एवढ्या दूर जातो. पण, आपल्या देशासाठी प्रचंड बलिदान दिलेल्या या स्वातंत्र्यवीरांच्या, सैनिकांच्या स्मृतींना परत जागे करण्यासाठी कटक गावालासुद्धा सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि आपले ऋण व्यक्त करावे.

कुठल्याही राज्यात फिरताना तिथली अशी महत्त्वाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेची जोपासना करणारी फारशी प्रचलित नसणारी अशा जागांना, स्थळांनादेखील आपण भेट देणे आवश्यक आहे. यातूनच आपले वैभव, संस्कृती वारसा टिकण्यात आपला सगळ्यांचा हातभार लागेल आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग या संवर्धन कार्यात होईल!

इंद्रनील बंकापुरे
9960936474