मुंबईत हिंदू एक होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तेचे भुकेले असलेले स्वार्थी राजकारणी मराठी, हिंदी, गुजराती वगैरे आपसात प्रांतवादातून द्वेष पसरवत असतील का? दुसरीकडे मुंबईपासून काही अंतरावर साकिब नाचण याने भारतात धर्मांध दहशतवाद्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, म्हणून पडघा बोरिवलीला ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केले होते. त्यासाठी त्याची प्रेरणा ‘इसिस’ होते. ‘इसिस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया.’ ‘इसिस’ने हजारो, लाखो लोकांना मारले असेल, हजारो महिलांवर अत्याचार केले. या साकिब नाचणचा दि. २८ जून रोजी नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानिमित्ताने या सगळ्या घटनांचा मागोवा घेणारा हा लेख.
आपणच मराठीचे ठेकेदार आहोत, या खोट्या समजुतीत काही नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना इतर भाषिकांवर (जे गरीब होते आणि विरोध करू शकत नव्हते ते) हल्ला करण्यास प्रवृत्त करत असतात. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा नाही, हे कधीच कोणी म्हटले नव्हते आणि म्हणू शकतही नाही. पण, मराठी माणसाला कामधंदे सोडून त्यांच्या तालावर नाचण्यासाठी ते हे करत होते. या सगळ्या गदारोळात ठाण्याच्या पडघ्याजवळ बोरिवली गावात दहशतवाद्यांचा तळ उभा राहत होता, याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. पडघ्यातले बोरिवली हे ठाणे शहरात भिवंडीजवळचे नाशिक हायवेवरचे सुमारे सात हजार लोकवस्तीचे गाव. बोरिवलीत कोकणी मुस्लीम बहुसंख्य आहेत. ‘एटीएस’ आणि ‘एनआय’च्या मते, या बोरिवली गावाला ‘शरीयत-ए-अल-शाम’नुसार कट्टर इस्लामी कायदा प्रणालीअंतर्गत भारतापासून वेगळे एक विशेष ‘राज्य’ घोषित करण्याचा प्रयत्न सुरू होता. शरियत शासनानुसार इथे १५ मुस्लीम युवकांना मंत्र्याचे अधिकार दिले गेले होते. या सगळ्याचा कर्ताधर्ता होता साकीब नाचण. त्याने बोरिवली गावाला ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केले. दि. २ जून रोजी ‘एटीएस’, ‘एनआयए’ आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी मिळून पडघा आणि भिवंडी परिसरात एकाच वेळी २२ ठिकाणी छापे टाकले. तेव्हा तिथे घातक शस्त्रे, सीमकार्ड्स, मोबाईल्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. बोरिवली गावाचे ‘अल-शामा’ स्वरूप उघड झाल्यावर देश हादरला होता. साकिब नाचण याला दहशतवादी कृत्यांसाठी अटक झाली. मात्र, त्याआधीही त्याचे गुन्हे दुर्लक्षित करण्यासारखे नव्हतेच. देश आणि समाजविरोधात कट्टरपंथी कारवाया करण्यात तो ‘मास्टरमाईंड’चा होता.
काही दशकांपूर्वी घाटकोपरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले. त्यांपैकी दोन पाकिस्तानी आणि एक काश्मीरमधला दहशतवादी होता. त्यांनी डायरीमध्ये दहशतवादी कृत्यासाठी सहकार्य करणार्यांची नावे लिहिली होती. त्यामध्ये साकिबचेही नाव होते. १९९२ सालच्या ‘सीबीआय’च्या आरोपपत्रामध्येही त्याच्यावर भारतीय मुस्लीम आणि शीख तरुणांना विस्फोटक आणि गुरिल्ला युद्ध प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणे आणि ‘इसिस’च्या ‘के२’चे समर्थन करण्याचे आरोप लावण्यात आले. १९९२ सालीच त्याला खलिस्तानी दहशतवादी लाल सिंहसोबत ‘टाडा’ अधिनियमांतर्गत अहमदाबादमध्ये अटक आणि नंतर जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कमी करून दहा वर्षे केली. (तेव्हा केंद्रात कुणाचे राज्य होते बरं? अरे, हो तेव्हा काँग्रेसची सत्ता होती.) तो सुटला. मात्र, पुढे त्याने त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या. २००२ ते २००३ सालच्या दरम्यान मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. त्यामध्ये अनेक लोक हकनाक मृत्यू पावले, तर शेकडोजण जखमी झाले. अनेकांना कायमचे अपंगत्वही आले. शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली. या घटनांचा तपास करतानाही साकिबचे नाव पुढे आले होतेच. ‘मपोटा’कायद्याअंतर्गत त्याला शिक्षा सुनावण्यात आली. २०१७ साली तो तुरुंगाबाहेर आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने गावातल्या काही मुस्लीम तरुणांना कट्टरतेचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांना दहशतवादी संघटनामध्ये भरती होण्यास प्रेरित केले जाऊ लागले. या गावातील काही तरुण तुर्कस्तानात ‘इसिस’च्या म्होरक्याला भेटलेले असावेत, असाही पोलिसांचा दावा आहे. तसेच, देशातल्या काही हॅण्डलर्सनी सीरियामधून एका व्यक्तीला साकिब नाचण याची भेट घेण्यासाठी बोरिवली गावात पाठवले होते. येत्या काळात ‘इसिस मॉड्यूल’ कसे मोठे करायचे आणि घातपाताच्या कारवाया कशा आणि कुठे करायच्या, यासंदर्भात त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती, अशी माहितीही ‘एनआयए’च्या चौकशीतून समोर आली होती. असो या गावात ८० टक्के लोकसंख्या कोकणी मुसलमानांची आहे. विरोध तरी कोण करणार? करावासा वाटला, तरी साकिब आणि कोण आवाज उचलणार? इथे संविधान ना इतर संविधानयुक्त संस्थांना काय मान्यता असेल?
मुंबईच्या जवळचे हे गाव असे भारताबाहेरील इस्लामिक राष्ट्रांशी जोडण्याचे कटकारस्थान होते. अर्थात, साकिबने हे सगळे आरोप फेटाळले होते. या गावात या कुटुंबाचा इतका दरारा की, साकिब विरोधात कुणीही पुढे येत नव्हते. एकदा तर पोलीस त्याला पकडण्यासाठी गावात आले, तर गावातल्यांनी पोलिसांवर शेण फेकले. हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करताना पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. अटक झाल्यानंतर साकिब तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होता. ब्रेन हॅमरेज झाल्याने सफदरजंग रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आणि तिथेच गेल्याच आठवड्यात दि. २८ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
पण, साकिब नाचणचा मृत्यू झाला म्हणून त्याच्यासारख्या प्रवृत्तींचा नाश झाला का? रामजन्मभूमी अयोध्या राममंदिराऐवजी बाबरी पुन्हा तिथेच बांधण्याचे किंवा औरंगजेबाचे किंवा कट्टर इस्लामिकतेचे राज्य हिंदूबहुल भारतामध्ये स्थापित करण्याचे मनसुबे असणारे सगळेच संपले असे आपण म्हणू शकतो का? छे अजिबात नाही! देशाचे सोडा, आपल्या मुंबईमध्येही प्रांतवाद, भाषावाद करत हिंदू समाजामध्ये फूट पाडण्यात काही नेते आसुरी आनंद व्यक्त करत असतानाच, धर्मांध दहशतवाद्यांचे चांगलेच फावणार आहे. कारण, हिंदू समाज पुन्हा भाषा आणि प्रांतवादामुळे विभागला जाईल, असे त्यांना नक्कीच वाटत असेल. त्यामुळेच देशप्रेमी हिंदू समाज त्याचबरोबर देशाचे कल्याण व्हावे, ही इच्छा असणार्या गैरहिंदूंनीही भाषा प्रांतविरोधात एकत्र यायला हवे, तरच या महाराष्ट्रात पुन्हा बोरिवलीसारखे ‘अल-शाम’ (भारतात कट्टर इस्लामिक वेगळे राज्य) निर्माण करण्याची कुणाची हिंमत होणार नाही.