मेहनतीनंतर यशाचा दरवाजा उघडतोच. त्यानंतरचा प्रवास हा सातत्याने यशाकडेच जाणारा असतो. मात्र, या यशाची धुंदी ज्यांच्या डोक्यात भिनली, त्यांना शून्यावर येण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी कलाकाराच्या अंगी नम्रता असावी लागते. हीच नम्रता नाटकांमध्ये विविध भूमिका करताना भिनते. जशी ती नाटकांमध्ये भिनते, तशीच ती बालनाट्यांमधूनही भिनते. म्हणून यशाच्या महामार्गावर स्वार असतानाही, मुलांना बालनाट्य आपलेसे वाटते. असे का? याचा घेतलेला हा आढावा...
चमचमत्या तार्यांच्या मांदियाळीत माझ्या विद्यार्थी बालकलाकारांना बघायला मला का नाही आवडणार? मला अभिमान वाटतो त्यांचा आणि तितकीच काळजीसुद्धा. अभिमान याकरिता कारण व्यावसायिक गणितं फार वेगळी असतात. त्याकरिता वेगळ्या प्रकारची तयारी लागते. यासाठीची आवश्यक असलेली सर्व तयारी ती मुले करतात. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना अभिनय करायला आवडतो. चमचमत्या दुनियेतून परत आल्यानंतर सर्वसामान्य म्हणून जगणे, त्यांना परत शिकावे लागते. कारण, विशिष्ट वातावरणातून नेहमीच्या वातावरणात आला, तरीसुद्धा परत सवय बदलायला वेळ लागतो हा माणसाचा स्वभाव आहे. माझे अनेक विद्यार्थी व्यावसायिक सिनेमा, माहितीपट, वेबसीरिज, टिव्ही मालिकांमधून काम करतात, त्यांचे कौतुकही होते. अचानक मिळालेली प्रसिद्धी, गरजेपेक्षा जास्त केलेले कौतुक आणि सतत मिळालेली शाबासकी घातकच. ती तुमची प्रगती कुंठित करू शकते, अति आत्मविश्वास तुम्हांला धूळ चाटवू शकतो. त्यामुळे मी सतर्क होऊन त्यांना समजून घेऊन, काळजीपूर्वक त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्यावर काम करायला घेते. एक प्रशिक्षक म्हणून माझे ते कर्तव्य आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तमातून उत्तम अभिनेता-अभिनेत्री, तंत्रज्ञ कला क्षेत्राला लाभण्यासाठी आणि याही पलीकडे जाऊन उदात्त उत्तम माणूस म्हणून ते आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे, याकडे माझा कल असतो. क्षणार्धात मिळालेली प्रसिद्धी, अवकाळी पडणार्या पावसाप्रमाणे असते. मुलांचे बीज व्यक्तिमत्त्व म्हणून खुलायचे असेल, तर रोज त्याला खत पाणी घालणे आवश्यक. फक्त रासायनिक कीटकनाशकांच्या फवार्याने कसे चालणार? म्हणून बालनाट्य आवश्यक! आजच्या आणि पुढच्या आठवड्याच्या लेखात माझे असे तीन विद्यार्थी मी निवडले. ज्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर आणि व्यावसायिक चित्रनगरीत काम केले आहे. ते मोकळेपणाने माझ्याशी बोलले आहेत. त्यांची मतं महत्त्वाची आहेतच; पण त्याही पलीकडे जाऊन ज्या मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना आपल्या मुलांनी अभिनेता व्हावे, असे वाटते त्यांच्याकरिता हा लेख अधिक महत्त्वाचा ठरेल.
रुही जावीर वयवर्षे सात, रुद्र कोळेकर वयवर्षे दहा, हर्षित देसाई वयवर्षे १२. हे विद्यार्थी अतिशय मेहनती, गुणी, शिस्तप्रिय; ज्यांचा अभिनय क्षेत्रातील अनुभव तीन वर्षांहून अधिक आहे. यांच्याबद्दल थोडीशी माहिती आधी देते. रुहीनी ‘झी’चा प्रोमो, ‘झी’ची ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका आणि दोन बालनाट्यांमधून काम केले आहे. रुद्रने एक वेबसीरिज आणि एक सिनेमा केला असून, चार बालनाट्यांमधूनही कामे केली आहेत. हर्षितने दोन सिनेमे, दोन जाहिराती त्यातील एकामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले असून, पाच बालनाट्यांमधूनही रंगभूमीची सेवा केली आहे.
तुमचा स्क्रीनवर काम करण्याचा अनुभव थोडयात सांगा. तिथे मी नव्हते, तुमचे मित्र नव्हते. कसे असते वातावरण?
रुही - सुरुवातीला खूप छान मज्जा आली. सगळेच नवीन होते पण, मग एका वर्षापेक्षा जास्त चालली आमची मालिका, तेव्हा अभ्यास, पुण्यातल्या घराची आठवण यायला लागली. वेळापत्रक खूप वरखाली असायचे. मला मज्जा येत होती; पण कधीकधी शाळेची आठवणसुद्धा यायची. खूप शिकायला मिळाले. खूप चांगली माणसेही भेटली, तर काही ठीकठाक अनुभव पण होते. म्हणजे मोठी माणसं इतकी वेड्यासारखी वागू कशी शकतात, याचेही मला आश्चर्य वाटायचे. माझी आई सतत माझ्याबरोबर असायची. मला कधीकधी तिच्याबद्दल वाईट वाटायचे की, आई माझ्यासाठी किती करते. माझा दादा आणि बाबा पुण्यात आणि आम्ही दोघी इकडे पण, शूट करताना मला खूप म्हणजे, खूप मज्जा यायची. सुरुवातीला रिटेक व्हायचे कारण, कळायचे नाही नेमके दिग्दर्शकाला माझ्याकडून काय हवे आहे. पॅन कर, मुंडी काप, अॅक्शन म्हटल्यावर पाच सेकंदांनी डायलॉग म्हण, शूट जड म्हणजे नेमके काय? मी कोणाशीतरी बोलते आहे पण, ते पात्र माझ्या समोर उभे नाही. एकच वाय वेगवेगळ्या पद्धतीने का म्हणायचे आणि माझ्याबरोबर जी माझ्या बहिणीचे काम करायची, तिचे आणि माझे भांडण व्हायचे आणि एक सीन यायचा ज्यात आम्ही खूप प्रेमाने वागतो आहे एकमेकांशी. मला हे सारे इतके कठीण गेले कारण, मला राग आला होता तिचा. आठवले की, आता हसायला येते. शूट करायला मला आवडते; पण खूप वेळ आणि खूप दिवस नसले, तर जास्त मज्जा येईल. म्हणजे नवीन मालिका करेन ही; पण ब्रेक मिळाला तर आवडेल. आमच्या मालिकेमध्ये आमचे सतत सीन होते. आधी एवढे ठरले नव्हते पण, आमचे काम प्रेक्षकांना आवडत होते म्हणून वाढले. मालिका संपल्यावर वाटते, का संपली म्हणून. या प्रवासात खूप छान कलाकारांबरोबर सेल्फीही काढायला मिळाल्या.
रुद्र - वेबसीरिजच्या सेटवर खूप मज्जा आली, मला आणि तनुषला (माझा अजून एक विद्यार्थी) रागवायचे नाहीत. आम्ही एकदा तर तीन ते चार रिटेक घेतले. आम्हाला वाटले, आता आम्हाला रागावणार; पण ते आम्हाला दरवेळी शांतपणे समजावून सांगत होते. मी एकाग्र होऊन वाय पाठ करत होतो पण, तिथे तुम्हाला शांत जागा मिळत नाही. कारण, इतकी माणसं फिरत असतात अवती भवती आणि माझ्याकरिता सगळे नवीन असल्यामुळे, माझा अर्धा वेळ कोण काय करत आहे हे बघण्यातच जायचा. आम्हाला व्हॅनिटी दिली होती पण, त्यात खूप आर्टिस्ट होते. मग मी बाहेरच बसायचो. बाहेर बसलो तर मेकअप उतरायचा. वेगळाच अनुभव होता. नाटकात काम करून मिळतो त्यापेक्षाही वेगळाच. नाटकात डायलॉग्स मोठ्याने घ्यावे लागतात पण, इथे हळू म्हणजे, जसे मी आता सहज बोलतो आहे ना तसे. पण, रॅडी तालमीला खूप कमी वेळ मिळतो गं. म्हणजे आपल्याकडे कसे, नाटकात ज्याच्याबरोबर काम करायचे आहे, त्याच्याबरोबरच तालीम करायची. एकदा, दोनदा नाही, तर हवी तितया वेळा करा, पण इथे मी वेगळेच पाहिले. मी माझी तालीम वेगळी करायची आणि मग ज्याच्याबरोबर सीन आहे, त्याच्याबरोबर एक किंवा फक्त दोनदा. मी जाऊन जाऊन विचारायचो अजून तालमीची गरज आहे का? पण, ते म्हणायचे ओके आहे. मला जरा आश्चर्यच वाटायचे पण, मला खूप मोठ्या कलाकार दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळाले, मी त्यांचे आशीर्वाद घेतले.
हर्षित - शूट बिग बजेटवाले होते, त्यामुळे सगळीकडे फाईव्ह स्टार सोय होती. शिवाय एकदा तर अमिताभ बच्चन सरांबरोबर मला काम करायचे भाग्य लाभले. आम्ही खूप आधी येऊन तयार होतो, मग सर आले आणि आमच्या एक दोन शॉट्सनंतर पॅकअपही झाले. सगळेच खूप छान होते, सगळे आपापले काम शांतपणे करत होते. कसलीच घाई नाही असे वाटले. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला लागते पण, आई सतत सोबत असते. मला खूप दिवस शूट झाले की, जरा कंटाळा यायला सुरुवात होते. कारण, खूप वेळ बसून राहावे लागते, हे माझे त्यावरचे प्रामाणिक उत्तर आहे. सेटवर वेळ कसा घालवायचा, हे मी अजून आत्मसात करतो आहे. नाटकात आपल्याला वेळ दिला जातो. आपल्यावर काम करायला, भाषेवर काम करायला, भूमिका समजून घ्यायलासुद्धा वेळ मिळतो. इथे सगळे घाईत असतात किंवा वेळ अजून हवा होता, असे वाटत राहते. समाधान नाटकातच मिळते. प्रगती ही नाटकात काम करूनच होते.
बरं मला सांगा नाटक का सिनेमा?
नाटक! नाटक! नाटक!
नाटकाची निवड पहिली! नाटकाचा पहिला नंबर, कधीही. नाटक आमचे पहिले प्रेम आहे.
बापरे! अगदी मोठ्यांसारखे बोलायला लागलात रे तुम्ही. मला तुम्ही आजपासून थोडं जास्त आवडायला लागला आहात बरं का. मुलं लहान आहेत, मला त्यांच्या पालकांचे कौतुक करावेसे वाटते की, त्यांनी त्यांचे बालपण जपले आहे. त्यांची उत्तरं अनुभवातून येत आहेत. कुठले ही आव्हान ते स्वीकारायला तयार आहेत. मोठ्यांच्या जगात त्यांनी चांगुलपणा जपला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आजही ते आनंद शोधता आहेत. मला त्यांना जपले पाहिजे. ते उद्याचे मिणमिणते तारे कशाला व्हायला पाहिजे, ते सूर्यच होवोत. त्यांच्या प्रकाशात एक कलादालन असेल, मी तयार केलेले. जिथे त्यांनी कधीही यावे त्यांचा प्रकाश घेऊन.(क्रमशः)
रानी राधिका देशपांडे