
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रा. स्व. संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उपाख्य भैयाजी जोशी लिखित ‘हमारा सांस्कृतिक चिंतन’ या ग्रंथाचा आरती देवगांवकर यांनी ‘मृत्युंजय भारत’ या नावाने केलेला मराठी अनुवाद मोरया प्रकाशनाच्यावतीने, येत्या दि. १३ ऑगस्ट रोजी पुण्यात प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने ‘मृत्युंजय भारत’ ग्रंथातील ‘राष्ट्रीयता हीच भारताची ओळख‘ या प्रकरणातील काही अंश येथे देत आहोत.संस्कृत आणि इतर भारतीय भाषांचे संवर्धन, पहिलीपासून संस्कृतचे शिक्षण, प्रत्येक गावात संस्कृतसाठी गुरुकुल, शिस्त बाणावण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण, मूल्यशिक्षणाचा आग्रह अशा सगळ्या विषयांचा समावेश असलेली शिक्षणपद्धती भारतात सुरू करणे शय आहे का? स्वतंत्र भारतात आपल्याला स्वातंत्र्य आणि अधिकार आहे. प्रश्न असा आहे की, लोकशाहीत सरकार चालवणारे लोक जनतेच्या गरजा तसेच, जनतेच्या भावनांचा विचार करून धोरणे आखतात का? अर्थात काहीवेळा काही गोष्टींच्या संदर्भात फक्त लोकमानसाचा विचार करून चालत नाही. तेव्हा देशाच्या हिताचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते. मला वाटते की, कोणत्याही देशाचे भविष्य घडवण्याचे काम त्या देशातील युवक करत असतात. ही युवा पिढी शिक्षणाने ते करण्यास सक्षम होते. फक्त पुस्तके-ग्रंथ वाचून मिळणारे ज्ञान म्हणजे शिक्षण असे नाही. दुर्दैवाने इंग्रजांच्या काळात त्यांनी काही मनसुबा आखून अशा प्रकारचे शिक्षण प्रचलित केले. खरेतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या सरकारने यात बदल घडवून आणायला हवा होता; पण ते झाले नाही. आजही तीच शिक्षणपद्धती तशीच चालू आहे. इंग्रजांनी आखलेली ही पद्धत ७० वर्षांच्या काळात अधिकच स्थिरावली, दृढ झाली. शिक्षणाने माणसाच्या मनातला स्वाभिमान जागा होतो, त्याला त्याची ओळख मिळते, त्याच्या जीवनाची दिशा शिक्षण निश्चित करते. अशा वेळी या देशाचे भविष्य जर शिक्षणाने ठरवायचे असेल, तर शिक्षणही त्या प्रकारचे असले पाहिजे. जे लोक धोरणे तयार करतात, त्यांची ही जबाबदारी आहे; पण तसे झाले नाही.
प्रत्येक शाळेत संस्कृत आणि नैतिक शिक्षण दिले जाऊ शकते की नाही, असा प्रश्न विचारला गेला. कदाचित, सरकारला दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल. मी हे सरकारला सांगतो आहे, कारण लोकशाहीत सरकार हे अनेक निर्णयांचे केंद्र असते. आपण जो आकृतिबंध स्वीकारला आहे, त्यात आपले स्वतंत्र धोरण आखून शिक्षण देणे येथे कोणालाही शय नाही. इथे आपल्याला सरकारच्या धोरणांचेच पालन करावे लागते. मात्र, ज्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांना यश आले. रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, पुदुच्चेरीतील अरविंदाश्रम यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शैक्षणिक केंद्रे या सर्वांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत.
संस्कृत ही या देशातील सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेशिवाय भारत समजणे कठीण आहे. त्यामुळे मग आपल्या जवळच्या व्यक्तीला ते चांगले वाटते आहे की, वाईट याचा विचार न करता संस्कृतला योग्य ते स्थान मिळायलाच हवे. यात काही शंका नाही.
शिस्तीची समस्या उरणार नाही; पण त्यासाठी गुरुकुलाला नवे रूप द्यावे लागेल. त्यांना व्यवसायाची केंद्रे न मानणार्या, शिक्षणाला जणू आपले जीवितकार्य मानून काम करणार्या संस्थांची आज गरज आहे. दुर्दैवाने आज हे व्यवसायाचे क्षेत्र बनत चालले आहे, असेच म्हणावे लागेल. जोवर शिक्षण क्षेत्र आपण व्यवसाय क्षेत्रातून बाहेर काढत नाही, तोवर आपल्याला त्यात समस्या येत राहणार. देशाच्या हितासाठी आपण सर्व प्रकारचे अभ्यासक्रम आणू शकतो. मात्र, त्यासाठी सरकारी पातळीवर धोरणांमध्ये लवचिकता आणावी लागेल. भारतात यासंदर्भात काही प्रयोग चालू आहेत. शासनाचे सर्व नियम पाळूनही ते प्रयोग करत आहेत. मला वाटते की, असे प्रयोग करणार्या लोकांना आणखी प्रोत्साहन दिले जाऊ शकते. आपण एक आदर्श प्रस्थापित करू शकतो. त्यासाठी जे काही प्रयोग चालू आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजेत, असे माझे मत आहे.
स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, तरुणांसाठी उत्तम आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे आर्थिक वाढही तेवढीच महत्त्वाची आहे. याबाबत संघाचे काय मत आहे? प्रत्येक देशाचा निसर्गतः स्वतःचा एक स्वभाव असतो. स्वामी विवेकानंद जे म्हणाले ते खरे आहे. "उत्तम आरोग्य केवळ तरुणांसाठीच नाही, तर समाज आणि देशासाठीही आवश्यक आहे,” असे ते म्हणाले असतील. कोणत्याही देशाच्या विकासात अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. १९४७ सालानंतर त्यात बदल घडवून आणण्याच्या अनेक संधी आपल्यापुढे आल्या होत्या; पण जिथे बराच काळ गुलामगिरी असते, तिथे त्याच प्रकारची मानसिकता तयार झालेली असते. येथे लोकांना असे वाटले की, भारताचे कोणतेही आर्थिक धोरण नाही. काही लोकांना वाटले की, समाजवाद तर काही लोकांना वाटले की, भांडवलशाही आपल्या आर्थिक धोरणाचा आधार बनेल. काही लोकांना वाटले होते की, ते साम्यवादातून घडून येईल. या तिन्ही प्रकारच्या धोरणांचे अंतिम ध्येय एकच आहे. याव्यतिरिक्त आणखी एक कल्पना असायला हवी होती. या तिन्हींचे मापदंड आर्थिक असल्याने आनंदाची एकसमान संकल्पनाच त्या सर्वांच्यात रुजली आहे. पं. दीनदयाळ म्हणाले होते की, यामध्ये ‘अखंड मानवतावाद’ विचारात घ्यावा लागेल. माणूस म्हणजे फक्त शरीर नाही. माणसाच्या इतर आयामांचा विचार केला पाहिजे. साम्यवाद, समाजवाद, भांडवलशाही या सर्वांमध्ये माणूस फक्त एक शरीर आहे, असा विचार मांडला गेला आहे. त्याच्या आनंदाची कल्पना केली आहे. त्याच्या समाधानाची कल्पना केली गेली. त्या आधारावरच धोरणे आखली गेली. परंतु, भारतीय विचारवंतांनी सांगितले की, मनुष्य म्हणजे केवळ एक शरीर नसून त्याला विवेक, मन, बुद्धी, आत्मा हेही आहे. या प्रत्येकाची समाधानाची पातळी वेगळी असते. जोपर्यंत आपण माणसांचा एकात्मतेने विचार करणार नाही, तोपर्यंत कोणतेही धोरण योग्य होणार नाही.
विकेंद्रीकरण हा भारताचा स्वभाव आहे. प्राचीन काळापासून हे भारताचे एक वैशिष्ट्य आहे. येथे नियोजन आणि निर्णय घेणे यांच्यासाठी स्थानिक ते केंद्रीय अशी विविध पातळ्यांवरील विकेंद्रित व्यवस्था प्रचलित आहे. एवढ्या मोठ्या देशात सर्व काही एकाच ठिकाणी केंद्रित होणे शय नाही आणि योग्यही नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आजच्या औद्योगिकीकरणाच्या युगात १०० टक्के विकेंद्रीकरण कदाचित शय होणार नाही. परंतु, काही क्षेत्रांमध्ये केंद्रीकरणाचा घटक निर्माण न करता, त्यांना विकेंद्रित ठेवणे शय होऊ शकते. अर्थव्यवस्थेचा विचार करताना भारताचा अजून एक पैलू लक्षात घ्यायला हवा. आपण कट्टरवादी नसून उदारमतवादी आहोत. दीनदयाळ यांनी म्हटले आहे, "आमच्या भावना एककल्ली नाहीत. आम्ही बदलायला तयार आहोत. मात्र, ज्यात देशाचे आणि समाजाचे हित असेल, त्याचा आम्ही स्वीकार करू.” ठीक आहे, आज औद्योगिकीकरण झाले आहे. पण, तरीही कशाचे केंद्रीकरण करायचे आणि कशाचे विकेंद्रीकरण करायचे यात समतोल असायला हवा. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपले सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही कोणाच्या मागे जाणारे लोक नाही, आम्ही स्वतःच्या मार्गावर चालतो. या संदर्भात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपले आधुनिक रूप जगासमोर मांडण्याची जबाबदारी भारताची आहे. भारताकडे ती क्षमता आहे, त्यामुळे आपल्याला समतोल साधत पुढे जावे लागेल. कोणत्याही अतिरेकाने जग नीट चालू शकत नाही.
एक सामान्य स्त्री आपली नोकरी आणि संसार सांभाळते. जागतिक नेता बनू पाहणार्या भारतासाठी ती काय करू शकते? स्त्री जर नोकरी करू शकते, व्यवसाय करू शकते, कलेच्या क्षेत्रात पुढे जाऊ शकते, तर सामाजिक क्षेत्रातही ती उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडू शकते. जेव्हा आपण महिलांचा विचार करतो, तेव्हा आपण समानतेबद्दल बोलत नाही. सामाजिक जीवनात प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. मुलांचीही भूमिका असते, तरुणांचीही भूमिका असते, प्रतिभावंतांचीही भूमिका असते. महिलांचीही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. येथील इतिहास पाहिला तर समजते, सर्वच क्षेत्रांत महिलांनी चांगली भूमिका निभावली आहे. वैचारिक क्षेत्रात, अभ्यास क्षेत्रात, धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रात अनेक विदुषी आहेत. त्यांनी ‘पुरुषार्थ’ जागृत केला आहे. स्त्रिया आणि ‘पुरुषार्थ’ हे शब्द परस्परविरोधी वाटतात. पण, ‘पुरुषार्थ’ या शब्दाला वेगळे परिमाण आहे. असा पुरुषार्थ गाजवणार्या झाशीची राणी, राणी दुर्गावती, चेन्नम्मा या इथे होऊन गेल्या. अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय सक्षमपणे त्यांच्या संस्थानाचा कारभार सांभाळला होता. कल्पना चावलासारख्या मुली अंतराळापर्यंत पोहोचल्या. ‘मंगळयान’ निर्मितीमध्ये अनेक महत्त्वाची कामे महिलाच करत होत्या.
महिलांच्या क्षमतेबाबत कधीच प्रश्न नव्हता. आपल्याला सगळ्याचा समतोल साधत वाटचाल करावी लागणार आहे. समतोल साधणे म्हणजे अन्याय नाही. तर ती कामाची, कामाच्या क्षेत्रांची विभागणी आहे. आजच्या शिक्षणपद्धतीमुळे महिला सर्व क्षेत्रांत आगेकूच करत आहेत. ‘विश्वगुरू भारत म्हणजे सर्वश्रेष्ठ भारत’, असा माझा विश्वास आहे. यातील ‘विश्वगुरू’ हा शब्द बाजूला ठेवून केवळ ‘सर्वश्रेष्ठ भारत’ याचा विचार केला, तर लक्षात येईल की, भारताला अधिक चांगला बनवण्यात महिलांची भूमिका वेगळी पण परिणामकारक असू शकते. त्या चांगल्या माता असतात. गरज पडल्यास आई कदाचित वडिलांचे काम करू शकते. परंतु, वडील आईची भूमिका निभावू शकत नाहीत. येथील जीवनातील परंपरा, मूल्ये आणि नैतिकता जपण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. नव्या पिढीला तयार करण्याचे काम मुले लहान असतानाच आई करत असते, पिढी घडवण्यात महिलांची भूमिका खूप मोलाची आहे. आज स्त्रियांनी शिक्षणात तर प्रगती केली आहेच; शिवाय इतर क्षेत्रांतही भरीव योगदान दिले आहे. आज महिला सैन्यातही उच्च पदावर पोहोचल्या आहेत. मात्र, हे सारे करताना महिला कुटुंबव्यवस्थेपासून दुरावल्या जातात.
२००० सालच्या सुमारास पुण्यात ‘सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रघुनाथ माशेलकर त्याचे अध्यक्ष होते. तेव्हा बोलताना त्यांनी ‘पंचशील’ सांगितले होते. त्यात दोन गोष्टी होत्या, भारताला पुढे जायचे असेल, तर इथले शिक्षण क्षेत्र बालकेंद्रित असले पाहिजे आणि कुटुंबे स्त्रीकेंद्रित असावीत. हे एका मोठ्या शास्त्रज्ञाने म्हटले आहे, याचा विचार करायला पाहिजे. पिढी घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. याचा आपण अनुभव घेत आहोत. आजच्या युगात इतर क्षेत्रांत पुढे जाणे चांगले आहे, हे स्वागतार्ह आहे. पण, ‘आई’ या भूमिकेशी तडजोड न करता स्त्रियांना पुढे चालावे लागेल. मला वाटते की, स्त्रिया ही खूप मोठी भूमिका बजावू शकतात.
काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातीयवादी का म्हणतात, हिंदू संघटित नाहीत म्हणून असे होते का? जे लोक असे म्हणतात त्यांना त्यांची जातीयवादाची व्याख्या काय, असा प्रश्न विचारायला हवा. समाजात सामुदायिकता असते. काही वेळा लहान गटात एखादी गोष्ट सांगितली, तर ते जातीयवादी मानले जाते. कोणत्याही एका ग्रंथाबद्दल, एका पंथाबद्दल काही बोललो, वेगळ्या बाबी सहन केल्या नाहीत की, लगेच त्यांना सांप्रदायिक म्हटले जाते. आजकाल ‘जातीयवादी’ ही एक शिवी बनली आहे. देशातील हिंदूंना आम्ही कधीच सांप्रदायिक मानणार नाही. तो कधीच जातीयवादी नसतो. सांप्रदायिक शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे ‘पंथ’. ‘हिंदू’ नावाचा कोणताही पंथ नाही. येथे शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, नाथ संप्रदाय, शाक्त संप्रदाय आहे. हे सर्व जातीय, पंथीय आहेत. जिथे एक धर्मग्रंथ, उपासनेची एकच पद्धत, एकच आद्यपुरुष आहे, अशी पंथाची व्याख्या आहे. हिंदूंमध्ये असे नाही. आपल्याकडे कोणताही एकच धर्मग्रंथ, एकच देवता, कोणतीही एकच उपासना पद्धत, एकाच गोष्टीवर श्रद्धा असे अजिबात नाही. हिंदू समाज विविध प्रकारच्या श्रद्धा मानतो. मग हिंदू जातीयवादी कसा झाला? जो हिंदुत्वावर विश्वास ठेवतो, तोसुद्धा हिंदू आहे आणि जो हिंदुत्व मानत नाही तोदेखील हिंदूच आहे. मंदिरात जाणारेही हिंदूच, जे जात नाहीत तेही हिंदूच. जे यज्ञयाग आणि होमहवन करतात तेदेखील हिंदू आहेत आणि जे करत नाहीत तेदेखील हिंदूच आहेत. मग तुम्ही नेमया कोणत्या पंथात हिंदू येतो असे म्हणाल, त्याची व्याख्या कशी कराल? तशी करताच येणार नाही आणि म्हणूनच हिंदू समाज आणि हिंदू समाजासाठी काम करणार्यांना जातीयवादी समजणे चुकीचे आहे. हिंदूंचे कार्य कधीही जातीयवादी असू शकत नाही. आम्ही कोणत्याही एका देवतेचे किंवा कोणत्याही एका शास्त्राचे वर्णन करत नाही. त्यामुळे संघाला जातीयवादी म्हणणार्यांना विचारावे की, जातीयवादाची व्याख्या काय, तुम्ही संघाला कोणत्या आधारावर जातीयवादी मानता? मला खात्री आहे की, त्यांच्याकडे याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. आम्ही संघाला जातीयवादी मानतो, एवढे नुसते बोलून काही उपयोग होणार नाही. ते पटवून द्यावे लागेल. हिंदू कधीच जातीयवादी असू शकत नाही असे मला वाटते. इथे कोणी ‘एक’ नाही, सगळे वेगवेगळे आहेत. येथे आपापसात सांप्रदायिक संघर्ष झाले आहेत, शैव आणि वैष्णव यांच्यात संघर्ष झाला आहे. आम्ही एक असतो, तर ही भांडणे झाली नसती! पण, ही भांडणे नाहीतच, हा मतांमधील वाद आहे. शंकराचार्यांनी ‘अद्वैत सिद्धांत’ मांडला, मध्वाचार्यांनी ‘द्वैत सिद्धांत’ मांडला. पुढे अद्वैत विशेष सिद्धांत आला. हे असे इथे चालतच राहते. आपल्याला इथे अशी मोकळीक आहे, आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या इथे पंथ असेल, तर हा असा पंथ आहे. हिंदू कधीच जातीयवादी नसतात. ते लोक हिंदूंना सांप्रदायिक मानतात आणि संघ हिंदूंना मानतो, म्हणून ते संघालाही जातीयवादी ठरवतात. अगदी कमी वेळा मंदिरांमध्ये जाणारे आणि कमी वेळा पूजाअर्चा करणारे अनेक लोक आपण पाहतो. खरे तर ते करायला हवे, यात शंका नाही. ते जर सांप्रदायिक असते, तर चित्र वेगळे दिसले असते! पण, यांना हेच (जातीयवादी) म्हणावे लागेल, असा विचार ज्यांनी केला आहे, ते तसे म्हणत राहतील.
हिंदू, हिंदुत्व या संकल्पना स्पष्ट करून सांगाल का? हिंदू धर्म ही जीवनपद्धती आहे, असे वारंवार सांगितले गेले आहे. हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालय ही येथील सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. हिंदू हा संप्रदाय नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, हे हिंदुत्व आहे, ही एक जीवनपद्धती आहे, जीवनमूल्ये आहेत. आमच्या या जीवनशैलीचा आम्हाला अभिमान आहे. यातून आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन निर्माण होतो आणि त्याच्या आधारे जीवनमूल्ये निर्माण होतात. मूल्यांच्या आधारावर जीवनपद्धती विकसित होते. तिलाच ‘हिंदुत्व’ म्हणून ओळखले जाते. पाप आणि पुण्य, जन्म आणि पुनर्जन्म याची आपली अशी कल्पना आहे. आपण एकमेकांशी कसा संवाद साधला पाहिजे, याबद्दलही आपली विशेष कल्पना आहे. भारतात ‘धर्म’ची व्याख्या व्यापक आहे. ‘धर्म’ म्हणजे पंथ नाही. अशा कित्येक शब्दांच्या संदर्भात लोकांच्या मनात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथे ‘आचारधर्म’ म्हटले आहे. त्यात ‘धर्म’ हा शब्द वापरला आहे. वडिलांचा धर्म आहे, आईचा धर्म आहे, मुलाचा धर्म आहे, राजाचा धर्म आहे; शेजार्यांचा धर्म आहे. धर्माकडे या व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास धर्म ही जीवनपद्धती आहे, कर्तव्य आहे हे समजेल. हिंदुत्व कर्तव्य अधोरेखित करते. आपली कर्तव्ये काय आहेत, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? तो म्हणजे हिंदुत्व. आपला निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? आपली सृष्टी पंचमहाभूतांनी निर्माण केली आहे, असे आपण मानतो. हा हिंदुत्वाचा दृष्टिकोन आहे. त्याच्या आधारे, निसर्गाशी छेडछाड न करणारी जीवनमूल्ये तयार केली गेली. त्याच्या आधारे जीवनशैली निर्माण झाली. झाडांची पूजा, नद्यांची पूजा, पक्ष्यांची पूजा हे सारे जीवनशैलीचा भाग बनले. त्याचा मंदिरांशी काहीही संबंध नाही. धर्मादाय रुग्णालये आहेत, तेथे कुठे कोणते पूजाविधी केले जातात? जेव्हा एखादी व्यक्ती घर बांधते, तेव्हा तो कुटुंबातील एखाद्या आदरणीय व्यक्तीचे नाव, आईचे नाव, इष्टदेवतेचे नाव देतो. पण, स्वतःच्या पैशाने समाजासाठी वास्तू बांधली, तर त्याला ‘धर्मशाळा’ म्हणतात. ‘धर्म’ची व्याख्या अशी व्यापक आहे. हिंदुत्वाचा विचार आपण धर्म म्हणून, जीवनपद्धती म्हणून, जीवनमूल्य म्हणून केला, तर कुठेही गोंधळ होणार नाही. हिंदू म्हणजे मंदिर, हिंदू म्हणजे स्त्रियांवर अत्याचार, हिंदू म्हणजे फक्त पूजा असा विचार करणार्यांनी समाजात भ्रम निर्माण केला. हिंदू म्हणजे आचार-धर्म. समाजजीवनासाठी जे पोषक असते त्यालाच ‘शुद्ध आचरण आणि धर्म’ म्हणतात. हेच आचरण जे करायला सांगते, त्याला ‘हिंदुत्व’ म्हणतात. याला मान्यता देणं म्हणजे हिंदुत्व, अशी साधी व्याख्या करता येईल. अशी जीवनशैली अंगीकारणारी व्यक्ती हिंदू आहे, असे मानले जाते.
ज्या युगात विज्ञान आणि तांत्रिक ज्ञान मानवी कल्पनेत बदल घडवून आणत आहे, अशा युगात काम करत असताना, संघ आणि कुटुंब संस्थांना स्वावलंबी राष्ट्रवाद आणि जागतिक धर्म यांची सांगड घालणारी नवीन ठाम विचारधारा स्वीकारणे अपरिहार्य ठरेल का? विज्ञान आणि वेद भिन्न आहेत, अशी एक धारणा आहे. खरे तर यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. आपली सर्व विचारसरणी पूर्णपणे वैज्ञानिक आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. ते वेदांत लिहिले गेले आहे, त्यामुळे वेदांचा अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय सांगितलेले उदाहरण खरोखरच वैज्ञानिक कसोटीवर उतरते आहे की नाही, हे आपण कशाच्या आधारावर म्हणणार? वेदांच्या अनेक प्रकारच्या परिभाषा आहेत. त्या समजून घेण्यासाठी व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. वेद हे विज्ञानापासून वेगळे आहेत असे मानण्याचे कारण नाही. हिंदूंची श्रद्धा हीच विज्ञाननिष्ठ, वैज्ञानिक आहे. ती समजून घेतली पाहिजे. इथे प्रत्येक कृतीमागे शास्त्रीय कारण आहे. त्याचा अभ्यास न केल्यामुळे नवीन पिढी प्रश्न विचारते त्याची उत्तरे आपण देऊ शकत नाही. मग साहजिकच हे सगळे निरुपयोगी आहे, असे नवीन पिढी म्हणते. त्यामुळे आपण सर्वांनी आधी हे समजून घेऊन मग नव्या पिढीला समजावून सांगायला हवं. ती आपली जबाबदारी आहे. अशीच रीत चालत आलेली आहे. मधल्या काळात मात्र समजावण्याची प्रक्रिया संपली आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहिली. त्यामुळेच आता कालांतराने हे प्रश्न उपस्थित होत आहेत. समजून घेणारा वर्ग समाजात असेल, तर तो समजावणाराही बनतो. हे पूर्णपणे वैज्ञानिक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तर्कसंगत कारण आहे.केवळ वरवरच्या अभ्यासाने काही फायदा होणार नाही. त्यामुळे अभ्यास करणारे लोकही हवेत आणि समजावून सांगणारे लोकही हवेत. एक हिंदू म्हणून आपली सर्व विचारसरणी पूर्णपणे वैज्ञानिक आहे, असा विश्वास ठेवून सर्व गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू. काही वेळा कालबाह्यतेचा प्रश्न निर्माण होतो. ही कालबाह्यता अनुभवाने सिद्ध होते. जे सद्यकाळाला सुसंगत नसते, ते आपोआप बदलले जाणार आहे. निसर्ग वेळोवेळी कालबाह्य गोष्टी नष्ट करेल. कोणे एके काळी आपल्यालाही शेपूट होती, कालांतरात ती गेली. तिची माणसाला गरज उरली नव्हती. निसर्ग त्याचे काम योग्य प्रकारे करत असतो. त्याचप्रमाणे वागण्यात जे अयोग्य आहे, तेही काळाच्या ओघात नष्ट होते. काही वेळा मात्र जे अन्यायकारक आहे, ते दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. समाजसुधारक हे काम करतात. ज्यांच्याकडे दूरदृष्टी असते तेच सांगू शकतात की, कालसुसंगत काय आहे आणि कालानुरूप काय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाची वाटचाल सुरू आहे. हे प्रत्येकच पिढीत घडत आले आहे. आपण जी पूजा करतो, त्यात ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ म्हणतात. इथे श्रुतीकार होते, स्मृतीकार होते, त्यांनी वेळोवेळी कालानुरूप गोष्टी सांगितल्या. ज्यांनी वेळोवेळी ‘हे निवडा, हे सोडा’ असे सांगितले, अशा स्मृतिकारांची संख्या मोठी आहे. जे काही कालबाह्य ठरेल ते हळूहळू नाहीसे होईल. अशा प्रकारे विचार करणारा वर्ग समाजात मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. तो कसा निर्माण होईल, याचीच सध्या आम्हाला चिंता आहे. फक्त हिंदूच काळाला अनुसरून बदल करतो. आपण परिवर्तनशील आहोत, म्हणूनच आजवर काळाशी सुसंगत जीवनशैली विकसित होत आली आहे आणि भविष्यातही विकसित होत राहील. मला वाटते की, निसर्गालादेखील याची काळजी असतेच.
जेथे सर्व हिंदू प्रार्थना करण्यासाठी एकत्र येतील, असे हिंदू प्रार्थनास्थळ किंवा मंदिर कधी सुरू होईल? प्रार्थनास्थळाची अशी एकच जागा कशी काय असू शकते? माणसाने स्वतःच्या कल्पनेनुसार देवाची मूर्ती निर्माण केली आहे. स्वतःच्या स्वभावानुसार आणि आवडीनुसार तयार केलेल्या विविध प्रकारच्या मूर्तींचा तो पूजनीय म्हणून स्वीकार करतो. प्रत्येकाला असणारे हे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य, म्हणजेच हिंदुत्व आहे. याबाबतीत आपण शक्तिशाली आहोत, सामर्थ्य-संपन्न आहोत. आपल्याकडे आराधनेची एकच जागा, एकाच प्रकारची प्रार्थना, एकाच प्रकारची मूर्ती कधीही असणार नाही. जीवनशैलीचा विचार केला, तर अशी एकच प्रार्थना होणार नाही. एकच प्रार्थना करायची असेल, तर संघाने अशा एकाच प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. आपण सगळे मिळून ‘भारत मातेची’ प्रार्थना करू. आपल्यासाठी तीच देवता आहे. थोडं मागे गेलं, तर स्वामी विवेकानंदांनी १५० वर्षांपूर्वी हेच अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. म्हणून आपापल्या देवांवर विश्वास ठेवा; पण भारताला आपले आदर्श केंद्र समजा! महर्षी अरविंदांनी म्हटले आहे की, "भारतात अध्यात्माची कमतरता नाही, धार्मिकतेची कमतरता नाही. भारतात पांडित्याची कमतरता नाही, प्रयत्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती, आपण भारताला नीटसे ओळखत नाही ही. ज्या दिवशी भारतात राहणार्या लोकांना भारत समजेल, त्या दिवशी या देशातील सर्व समस्यांचे निराकरण होईल.”
डॉ. हेडगेवार म्हणाले होते, "ही आमची मातृभूमी आहे. ही गोष्ट समजावून सांगा,” असे कुणीतरी त्यांना म्हणाले. तर ते म्हणाले की, "भारत ही आपली मातृभूमी आहे, हे तर्कसंगत आहे. हा समजावून सांगण्याचा विषय नाही. ही आमची श्रद्धा आहे. कारणमीमांसा देऊन श्रद्धेचे स्पष्टीकरण कधीच करता येत नाही. ती आमची आई आहे असे आम्ही मानतो.” अनेक महापुरुषांनीही सांगितले आहे की, ती निर्जीव नाही, ती जिवंत आहे, त्यात चैतन्य आहे. संघात एक पद्य म्हटले जाते, "मृण्मयी, हो तुम पुरातन, तुम अचेतन हो परंतु चैतन्य तुमसे प्राण लेता (तू प्राचीन आहेस, निर्जीव, चेतनारहित आहेस. पण, चैतन्य तुझ्याकडून जीवनशक्ती घेते.)” सावरकरांनी ‘सागरा प्राण तळमळला’ असे का म्हटले? या निर्जीव भूमीकडे बघत, थोडेच त्यांनी असे उद्गार काढले असतील? जर ही फक्त एक निर्जीव भूमी असती, तर या मातृभूमीसाठी लोक सर्व प्रकारचे बलिदान का देत असतील? भारत म्हणजे पर्वत, भारत म्हणजे हिमालय, भारत म्हणजे नद्या, असे जे लोक मानतात; त्यांना खर्या अर्थाने भारत समजलाच नाही. भारत निर्जीव नाही अशा प्रकारची भावना मनात ठेवून विचार करावा लागेल. त्यामुळे एकच प्रार्थना करायचीच असेल, तर भारतमातेची प्रार्थनाच देशाला शक्ती आणि ऊर्जा देईल.
पुस्तक : मृत्युंजय भारत
लेखक : सुरेश उपाख्य भैयाजी जोशी (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, रा. स्व. संघ)
मराठी अनुवाद : आरती देवगांवकर
सवलतीत घरपोच मागवण्यासाठी संपर्क - मोरया प्रकाशन
संपर्क क्रमांक : ८६००१६६२९७