ऑपरेशन महादेव: एक धाडसी युद्धमोहीम!

    09-Aug-2025
Total Views |

पहलगाममधील भ्याड हल्ल्याने प्रत्येक भारतीयांच्या मुठी त्वेषाने बंद झाल्या होत्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ने काही अंशी मनातील अंगार शांत केला असला, तरीही पहलगाममध्ये नृशंस कृत्य करणार्यांचा बळी हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आणि मागणी भारतीय सैन्याकडे होती. भारतीय सैन्यानेही दरवेळीप्रमाणेच भारतीयांची ही मागणीदेखील पूर्ण केली, महादेवाच्या डोंगरात हर हर महादेवच्या गर्जनेत. ‘ऑपरेशन महादेव’मधील अनेक लहान तपशीलांचा घेतलेला आढावा...


ऑपरेशन महादेव’ यशस्वी झाले, कारण ४ ‘पॅरा स्पेशल फोर्सेस’चे शौर्य, धैर्य आणि नेतृत्व.

भारतीय लष्कराचे राष्ट्रीय सन्मान आणि शौर्य यांचे सर्वांत प्रखर उदाहरण म्हणजे स्पेशल फोर्सेस आणि त्यातही विशेषतः ४ पॅरा स्पेशल फोर्सेस. ‘ऑपरेशन महादेव’ ही कारवाई केवळ तंत्रज्ञानावर आधारित नव्हती, तर ती भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याचे, अपार धैर्याचे आणि थेट लढाईतील धाडसी नेतृत्वाचे एक ज्वलंत उदाहरण ठरली आहे.

धैर्याची कसोटी, शौर्याचा सर्वोच्च विचार :

ज्याप्रकारे ४ पॅरा स्पेशल फोर्सेसच्या तुकडीने थेट दहशतवाद्यांच्या गडावर झेप घेतली, ते शौर्य कल्पनेपलीकडे आहे. दहशतवाद्यांचे ठिकाण ओळखणे आणि त्यांच्यावर थेट हल्ला करणे, यामध्ये जीवाचीही पर्वा न करता जे काम हे करतात, ते फक्त खर्या वीरांनाच शय आहे. त्यांनी दाखवलेले शौर्य हे राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी दर्शवणारे आहे.

कठोर हवामान, कठीण भूप्रदेश आणि सतत मृत्यूची छाया असतानादेखील हे कमांडो निर्भय राहतात. ‘ऑपरेशन महादेव’मध्ये त्यांनी अनेक दिवस दहशतवाद्यांचा पाठलाग केला. त्यात त्यांनी शांतपणे परिस्थितीचा आढावा घेत अचूक निर्णय घेतले. हे धैर्य सहजसाध्य नाही; ते आत्मिक मनोधैर्य, कठोर प्रशिक्षण आणि देशभक्तीमुळेच शय होते. धैर्य ही स्पेशल फोर्सेसची ओळख आहे.

नेतृत्वाची ताकद, धाडस आणि जवळून मारा :

दहशतवाद्यांविरुद्ध लढताना ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारखी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते खरी; पण अंतिम विजय हा सैनिकांच्या धाडसावरच अवलंबून असतो. जेव्हा सैनिक थेट दहशतवाद्यांच्या तळांमध्ये घुसतात, तेव्हा संशय, धोका, मृत्यू हे सगळं झुगारूनच ते केवळ विजय आणि देशभक्तीचाच विचार करतात. हे धाडस सामान्य नाही; ते स्पेशल फोर्सेसच्या वीरांचा पराक्रम आहे. संघटनेचे यश हे फक्त शौर्य आणि ताकदीमुळेच शय होत नाही, तर त्यामागे असतं चतुर नेतृत्व. ‘ऑपरेशन महादेव’मध्ये एका अनुभवी अधिकार्याने त्याच्या जवानांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले, टप्प्याटप्प्याने योजना राबवल्या. कोणत्याही परिस्थितीत निर्णयानं गोंधळून न जाता, थंड डोयाने निर्णय घेणं ही स्पेशल फोर्सेसच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.

‘ऑपरेशन महादेव’मध्ये पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना मारल्यानंतर गेल्या सात दिवसांमध्ये काश्मीरमध्ये सात दहशतवाद्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय सैन्याने यमसदनी धाडले आहे. याची किंमत भारतीय सैन्याचे तीन सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. याशिवाय दि. ३० जुलै रोजी दोन दहशतवादीही पुंछमध्ये घुसखोरी करताना मारले गेले.

नेमके कसे ऑपरेशन झाले?


पहलगाममधील दहशतवाद्यांचा शोध चालूच होता. परंतु, ते सारखे आपल्या जागांमध्ये बदल करत होते. ते कुठल्याही रेडिओ कम्युनिकेशनचा वापर करत नव्हते. याशिवाय त्यांनी जवळपास राहणार्या स्थानिकांशी असलेला संबंधही तोडला होता आणि त्यांना केवळ पाकिस्तानमध्ये परत जायचे होते.

भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दोन प्रकारच्या कारवाया करत आहे. एक ‘अॅण्टी इनफ्लिट्रेशन ऑपरेशन,’ जी ‘एलओसी’वर केली जाते. यामध्ये पाकिस्तानमधून येणार्या दहशतवाद्यांना किंवा भारताच्या बाजूने पाकिस्तानात परत जाणार्या दहशतवाद्यांना ‘एलओसी’वरच मारले जाते.

दुसर्या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांना काश्मीरच्या आत शोध मोहीम राबवून मारले जाते. शोध मोहिमेमध्ये काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्य भाग घेते. मात्र, दहशतवाद्यांचे स्थान मिळाल्यानंतर शेवटची लढण्याची कारवाई ही, केवळ भारतीय सैन्यच करते. यामध्ये काही वेळा स्पेशल फॉर्सेसला बोलवले जाते.

महादेवच्या सावल्या

पहलगाममधील रक्तरंजित घटनेनंतर भारताच्या सुरक्षा दलांनी व देशाने बदला घेण्याची प्रतिज्ञा केली, तीही घाईगडबडीत नव्हे, तर अचूकतेने. महादेव शिखराखालील गूढ आणि निस्तब्ध जंगल, डाचिगामच्या रम्य दरीवर डोंगरागत पसरलेले एका काळ्या रहस्याला लपवून होते. समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचीवर, टेहळणी पथकांनी चिनी लष्करी दर्जाचे एनक्रिप्टेड सिग्नल पकडले. हे सिग्नल कोडबद्ध आणि घातक होते. संकेत स्पष्ट होते. थध-डचड २०१६ साली ‘लष्कर-ए-तोयबा’ने वापरलेली कुख्यात प्रणाली पुन्हा सक्रिय झाली होती. मूळ स्थान? मुलनार, हरवान, महादेवच्या पायथ्याशी. शोध सुरू झाला होता. शेवटचे ऑपरेशन १५ दिवस चालले.

दिवस ३ - जंगलातील गुहेत लपलेले दहशतवादी मिळालेली माहिती थक्क करणारी होती. पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार याठिकाणी लपलेला होता. त्याचे नाव सुलेमान शाह उर्फ हाशिम मूसा! एक रक्तरंजित भूतकाळ असलेला पाकिस्तान ‘एसएसजी’ कमांडोचा माजी सैनिक. जंगल युद्ध, टिकाव आणि बंडखोरी तंत्रात तो पारंगत होता. तो पाकिस्तानकरिता एक अत्यंत महत्त्वाचा दहशतवादी होता. उपग्रह छायाचित्रे, भौगोलिक निरीक्षण आणि दिशादर्शक रडारच्या साहाय्याने भारतीय लष्कर व गुप्तचर संस्थांनी त्या संकेतांचे स्थान निश्चित केले. लक्ष्य होते मुलनारच्या खोल जंगलात लपलेली ऑपरेशनल तळे.

दिवस ५ - जाळे घट्ट होते


४ पॅरा स्पेशल फोर्सचे जवान लपत जंगलात घुसले. तेही लहान १२ सैनिकांच्या तुकड्यांमध्ये; निःशब्द, अदृश्यपणे. जंगलात पळवाटी, स्फोटके, सेन्सर्स लावले होते. प्रत्येक हालचाल विचारपूर्वक करावी लागणार होती. जवळचे हिमनदीचे प्रवाह इतके थंड व वेगवान होते की, प्रत्येक पाऊल झाकले जात होते. या ऑपरेशनला नाव देण्यात आले ‘ऑपरेशन महादेव.’ फक्त पवित्र शिखरावरून नव्हे, तर भारतीय पौराणिक महादेव यांच्यावरील श्रद्धेने. त्यामुळे वाईटाचा अंत आता अटळ होता.

दिवस ९ -सूचक संदेश


सकाळी ४ वाजता सैन्याच्या सिग्नल इंटेलिजन्स पथकाने एक संदेश पकडला, ‘पूर्ण चंद्र होण्याआधी हालचाल करा.’ याचा अर्थ होता, श्रीनगरमध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू होती. ऑपरेशनला विलंब परवडणारा नव्हता. पुढची ४८ तास म्हणजे वेळेशी चाललेली शर्यत होती.

दिवस ११ - अंतिम लक्ष्य साधले

ड्रोनच्या उष्णताशोधक कॅमेर्यांद्वारे एका बकरवालाच्या रिकाम्या झोपड्याजवळ हालचाल दिसून आली. तळाशी झाडीत धातूची चमक दिसली. खात्री केली गेली. शाह, अफगाण आणि गिब्रान सर्व प्रकारात प्रमुख असे लक्ष्य होते. ‘कार्बाइन’, ‘एके ४७’ आणि ग्रेनेड लॉन्चर्ससह सज्जता दहशतवाद्यांकडे होती. लष्कराने सर्व पळवाटांवर आपल्या तुकड्यांना बसवले. पथके गुप्तपणे टेकड्यांवर तैनात झाली, आजूबाजूचा भाग आता एका बंद प्रेशर कुकरसारखा होता, कधी पण एकदम मोठा स्फोट होईल असेच सारे वातावरण होते.

दिवस १३ - अंतिम टप्पा सुरू

१०० तासांच्या थकवणार्या शोधानंतर, एक मिनिटांची शत्रूशी लढाई झाली. झडप घालण्याआधी लहानसे नॅनो ड्रोन उडाले. ‘एआय’ व थर्मल इमेजिंगच्या साहाय्याने, ते जंगलात स्थायिक तंबूपाशी स्थिर झाले. आतमध्ये तिघे दहशत्वादी झोपलेले. त्यांची शस्त्रे त्यांच्याजवळच होेती. ४ पॅरा मेजरच्या हातातील कमांड टॅब्लेटवर प्रत्यक्ष दृश्ये प्रसारित झाली. त्याने पुढचे आदेश दिले. त्यासरशी ४ पॅरा हल्लापथक सावधतेने लक्ष्याजवळ सरकले. अंतर फक्त ४० मीटर उरले होते. तीव्र उतार असल्याने गोळी मारण्यास योग्य अंतरावर सैन्य उभे होते.

पहाटे ०३.४६ मिनिटांनी पहिली गोळी ़झाडली गेली आणि पहिला दहशतवादी मारला गेला. दुसरा हल्ला, दुसरी गोळी ़झाडली व दुसराही ठार झाला. तिसरा हालण्याआधीच ४ पॅरा मेजरने गोळी झाडली छातीमध्ये थेट, तिसराही संपला. एकूण वेळ: ५८ सेकंद, गोळ्या: ६. भारतीय बाजूचे नुकसान शून्य, हे ४ पॅराने केलेले हे लिनिकल टर्मिनेशन होते. मिळालेल्या मोबाईल्स, रेडिओंवरून मुजफ्फराबादशी संपर्काची पुरावे मिळाले. ‘जीपीएस’वरून घुसखोरीचे मार्ग निश्चित झाले.

मिळालेल्या साहित्यामध्ये तीन ‘एके४७’, ‘१७ रायफल ग्रेनेड्स’, चिनी बनावटीचे ‘एनक्रिप्टेड रेडिओ’, ‘नाईट व्हिजन स्कोप्स’, पाकिस्तानी उष्मांकयुक्त युद्ध भोजन मिळाले. ही केवळ दहशतवादी टोळी नव्हती, तर ती एक फिरती नियंत्रण यंत्रणाच होती आणि त्याचे मस्तक छाटण्यात आले होते. प्रत्येक वस्तू ओरडून सांगत होती, मी पाकिस्तानातून आले आहे.

अखेर न्याय मिळाला

पहलगाममध्ये वाहणार्या अश्रूंना आता शांती लाभली आहे. अत्यंत अचूक न्याय झाला होता. ‘ऑपरेशन महादेव’ म्हणजे केवळ यशस्वी कारवाई नव्हे, तर एक संदेश होता. ज्यांना वाटते ते लपून राहू शकतात, त्यांना भारत शोधून काढेल, घेरून मारेल. ‘ऑपरेशन महादेव’ ही केवळ एक शोध मोहीम नव्हती, ती भारताच्या वाढत्या तांत्रिक आणि सामरिक क्षमतेचे प्रतीक होती.
आजच्या काळात तंत्रज्ञान महत्त्वाचं असलं, तरी जमिनीवरचा अंतिम विजय हे फक्त आणि फक्त जवानांच्या शौर्यावर, धैर्यावर, धाडसावर आणि नेतृत्वावर अवलंबून असतो. ४ पॅरा स्पेशल फोर्सेसने ‘ऑपरेशन महादेव’मध्ये हे सिद्ध केलं की, आपले वीर सुंदर काश्मीर वाचवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहेत. ‘ऑपरेशन महादेव’मध्ये ४ पॅरा स्पेशल फॉर्सेसचे योगदान सर्वांत महत्त्वाचे होते. हे वीर आपल्या देशाचे खरे रक्षक आहेत.

(नि.) ब्रि.
हेमंत महाजन