शिल्पायन - रामायणाचा शिल्पप्रवास

    10-Aug-2025
Total Views |

आपण या लेखमालेमध्ये वेगवेगळी मंदिरे समजून घेतो आहोत. या मंदिरांमध्ये असणारी शिल्पं हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. याच शिल्पांना न्याय देण्यासाठी, आपण आज या लेखात फोटोस्टोरी बघणार आहोत. रामायण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मागच्या हजारो वर्षांपासून आपण वेगवेगळ्या स्वरूपात रामकथा ऐकत आहोत. आतापण या कथेवर आधारित अनेक चित्रपट, सिरीज निघाल्या पण, कथेचा गाभा मात्र तोच राहिला. असेच एक ताकदीचे माध्यम म्हणजे शिल्प. या कलाकारांनी दगडांच्या माध्यमातून, मंदिरांवर रामायणातले वेगवेगळे प्रसंग साकारले आहेत. वेगवेगळ्या मंदिरांवर असणार्या रामायणाच्या शिल्पांचा हा घेतलेला मागोवा...

प्रसंग - शिकारीदरम्यान दशरथाची अचानक झालेल्या हल्ल्यातून रक्षा करताना कैकयी, याच प्रसंगाच्या अनुषंगाने तिला दशरथाने वचन दिले आणि त्या वचनाचा वापर कैकयीने रामाला वनवासात पाठवण्यासाठी केला.

शिल्पं वर्णन -
चालून आलेल्या जंगली श्वापदापासून दशरथ आपले रक्षण करत आहे. एक हात उगारलेला असून, हातात चाकू पकडलेला आहे. वरच्या बाजूला हातात धनुष्यबाण घेतलेली कैकयी, तिने सोडलेला बाण वाघाच्या चेहर्याजवळ दिसतो आहे.

स्थान - मोढेरा सूर्य मंदिर, गुजरात

देवि तव सुस्मिते वाक्यम् श्रुत्वा शत्रुघ्नवत्सला|
प्रतिज्ञाम् प्रतिपद्याहम् किम् अन्यत् करवानि ते॥


प्रसंग - रावणाचा कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न - रावणाचे गर्वहरण

शिल्पं वर्णन - महाशक्तिशाली रावण आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत उचलतो आहे. शिवाने फक्त पायाच्या बोटाने पर्वत खाली दाबला आणि सगळा भार रावणाच्या अंगावर आला. आपण यात गाडले जाऊ या भीतीने, शिवतांडव स्तोत्र गाऊन यातून सुटका करून घेतली.

स्थान - लकुण्डी गावातील शिव मंदिर, कर्नाटक

कैलासं पर्वतश्रेष्ठं जग्राह दशकन्धरः|
नादयन् सकलं लोकं कम्पयामास मेदिनीम्॥

प्रसंग - मारीच राक्षसाची चाल आणि वैदेहीचे हरण

स्थळ - कैलास लेणे, वेरूळ, महाराष्ट्र

मार्गमाणः तु वैदेहीं रावणः क्रूरकर्मकृत्|
आदाय ताम् हृषीकेशो ययौ लङ्काम् यशस्विनीम्॥


प्रसंग - जटायूचे स्वतःचे प्राण पणाला लावून सीतेला वाचवण्यासाठी प्रयत्न

स्थान - पापनाथ मंदिर, पट्टडक्कल, कर्नाटक

स तु दृष्ट्वा तदा सीताम् रावणेन हृताम् बलात्|
उवाच लज्जया युक्तम् शब्दम् आर्तस्वरम् महत्॥


प्रसंग - वाली आणि सुग्रीव युद्ध, रामाकडून वालीचा वध आणि नंतर तारा विलाप

स्थळ -
बांते स्रि मंदिर, सियाम रिप, कंबोडिया

गर्जमानौ महावेगौ सिंहनादौ प्रचोदितौ|
युध्येते तौ महात्मानौ बभूवतुरिव वायवौ॥


प्रसंग - सेतू बांधकाम

स्थान - पळसदेव मंदिर परिसर, पुणे

रामेण समनुज्ञाताः समन्तात् वनचाऱिणः|
सेतुबन्धं समुद्रस्य चक्रुः प्लवगसत्तमाः॥
आदौ रामतपःवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्|
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणम्॥
वालीनिघ्ननं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्|
पश्चाद्रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायणम्॥


संपूर्ण रामायणाचे सार या चार श्लोकांमध्ये आलेले आहे आणि त्याच ताकदीने कलाकारांनी ते सार, या शिल्पपटात कोरलेले आहे. रामाचा प्रवास, वैदेही हरण, जटायू युद्ध, सुग्रीव भेट, लंका दहन आणि शेवटी रावणाबरोबर युद्ध असे सर्व प्रसंग इथे कोरलेले आहे.

आजचा प्रयत्न शब्दांच्या पलीकडे जाऊन शिल्पांची जी भाषा आहे, ती शिकता यावी यासाठी केलेला होता. हा प्रयत्न कसा आहे हे सुजाण वाचकवर्गाला ठरवायचे आहे पण, एक मात्र नक्की, या शिल्पांमधून उलगडत जाणारा प्रवास हा भारतीय सांस्कृतिक गाभ्याचे दर्शन घडवणारा प्रवास आहे. कर्तव्य, निष्ठा, न्याय आणि त्याग या कालातीत बोधांची ओळख करून देणारे शिल्पमय रामायण कसे वाटले, हे नक्की सांगा आणि या दृष्टिकोनातून मंदिरांना भेट द्यायला सुरू करा.

धन्यवाद.

इंद्रनील सदानंद बंकापुरे
७८४१९३४७७४