चले जाव चळवळ आणि रा. स्व. संघ

    09-Aug-2025
Total Views |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली १०० वर्षे देशहिताच्या प्रत्येक कामासाठी अहोरात्र झटत आहे. संघातील प्रत्येक स्वयंसेवक मातृभूमीच्या यशासाठी तन,मन, धनाने तिची सेवा करतो. मात्र, देशातील काही तथाकथित बुद्धीवादी मंडळी रा.स्व. संघावर स्वातंत्र्यलढ्यातील सहभागावरून दुषणे देत, अफवा पसरवण्यातच धन्यता मानतात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात रा.स्व. संघाचा असलेला सहभाग आणि स्वयंसेवकांचे बलिदान याचा घेतलेला मागोवा..


रतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नव्हते किंवा स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता, असा कांगावा देशातील पाखंडी टोळ्या नेहमी करत असतात. तसेच, काही तथाकथित पुरोगामी मंडळीच्या मायावी टोळ्या, १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, संघ मुक्त भारत किंवा संघावर बंदी घालण्याच्या घोषणासुद्धा देतात किंवा केविलवाणा प्रयत्न करतात. तसेच, देशात दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाला फार महत्त्व असून, तो दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. दि. ९ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्टच्या काळात, स्वातंत्र्यलढ्यातील योद्धांचे स्मरण करण्यासाठी देशात देशभक्ती पर्व सप्ताहसुद्धा साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ तथा समाजप्रबोधन करणार्या संस्थामध्ये, देशभक्ती पर्वाचे युवक मेळावे घेतले जातात. देशातील सर्व वृत्तवाहिन्यावर चर्चासत्रे घेतली जातात, वर्तमानपत्रात लेखसुद्धा प्रसिद्ध होत असतात. एकूणच शालेय विद्यार्थी वर्गापासून, महाविद्यालयीन तरुणासमोर स्वातंत्र्यलढ्यातील वीर पुरुषांचे स्मरण केले जाते. पण, याच देशभक्ती पर्वाच्या काळात संघविरोधी मायावी टोळ्या, दुटप्पी सेयुलर मंडळी, साहित्यिक, प्रसारमाध्यमांतील पत्रकारांच्या पाखंडी टोळ्या, व्हॉट्सअॅप विद्यापीठामधील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पोंगापंडित आणि राजकीय पक्षसुद्धा, भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये तथा १९४२ सालच्या ‘चले जाव चळवळी’त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीच संबंध नव्हता, असा कंगावा करून, स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नाकारण्याचा करंटेपणा करतात. तसेच, यामाध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील संघाच्या सहभागावर प्रश्नचिन्हही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक पाहता, स्वातंत्र्य चळवळीत संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या सर्वानुमते ठरलेल्या धोरणानुसार संस्थात्मक नव्हे, तर व्यक्तिशः मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. वेळप्रसंगी बलिदानसुद्धा दिले आहे. १९४२ सालच्या ‘चले जाव चळवळी’मध्ये, संघाच्या स्वयंसेवकांनी बलिदान दिले आहे. चिमूर, आष्टी, रामटेक, नंदुरबार येथील ‘चले जाव आंदोलन’मध्ये, संघ स्वयंसेवकांचे बलिदान आहे. या सर्व घटनांचे पुरावेसुद्धा आज उपलब्ध आहेत पण, भारतीय दुटप्पी पत्रकार आणि इतिहासकरांनी त्याची दखल घेतलेली नाही. उलट संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, अशी सतत कोल्हेकुई केली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसने ऑगस्ट १९४२ साली ‘करो की मरो’ घोषणा करीत, ‘चले जाव चळवळ’ सुरू केली होती. दि. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गोवालिया टँक येथून, महात्मा गांधी यांनी बिटिशांविरुद्ध ‘चले जाव’ची घोषणा केली. त्याचे पडसाद देशातील ‘भारत छोडो’ आंदोलनात उमटले. काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड होऊन, त्यांना तुरुंगातही डांबण्यात आले. महात्मा गांधी यांच्यापासून पं. नेहरू यांच्यापर्यंत सार्यांचीच तुरुंगात रवानगी झाली होती. ‘भारत छोडो आंदोलना’मध्ये, संपूर्ण देशच बिटिशांविरुद्ध उभा ठाकला होता. जागोजागी ‘चले जाव आंदोलना’ने जोर पकडला. संघाचे स्वयंसेवकही ‘चले जाव आंदोलना’मध्ये जागोजागी सहभागी झाले होते.

ब्रिटिशांची गोळी छातीवर झेलणारा बालाजी रायपूरकर

देशात ‘चले जाव’ चळवळ सुरू झाली, तेव्हा चळवळीचे पडसाद विदर्भात उमटले. विदर्भातील चिमूर जि. चंद्रपूर येथे दि. १६ ऑगस्ट १९४२ रोजी, ब्रिटिश सरकारविरुद्ध चले जाव आंदोलनाला सुरुवात झाली व आंदोलन देशात फार गाजले. संघाचे स्वयंसेवक, काँग्रेस सेवा दल कार्यकर्ते व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ‘गुरुदेव सेवा मंडळ’ यांनी हे आंदोलन उभे केले होते. त्याची दखल दि. १७ ऑगस्ट रोजी बर्लिन नभोवाणीनेसुद्धा घेतली होती. संघाचे अधिकारी दादा नाईक, बाबुराव बेगडे, अण्णाजी सिरास, काँग्रेसचे उद्धवराव कोरेकर संघ शाखेचे मुख्यशिक्षक माधवराव कठाणे यांच्या नेतृत्वात, चिमूरचा स्वातंत्र्य संग्राम लढला गेला. विदर्भातील याच चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या बंदुकीची गोळी, आपल्या छातीवर झेलणारा हुतात्मा बालाजी रायपूरकर हा संघाचा स्वयंसेवकच होता. या लढ्यात बालाजी रायपूरकरसह श्रीराम बिंगेवार, बाबूलाल झीरे, रामाजी बारापात्रे, उद्धवराव खेमसकर अशा पाच चिमूरकरांना वीरगती प्राप्त झाली. जवळपास १२५ चिमूरकारांना बंदिस्त करण्यात येऊन, १९ लोकांना फाशीचीही शिक्षा झाली. काही काळानंतर ती शिक्षा रद्द झाली, ज्यामध्ये असंख्य संघाचे स्वयंसेवक होते. चिमूरचा स्वातंत्र्य संग्राम घराघरामधून लढला गेला असून, दि. १६ ते दि. १९ ऑगस्ट असा चार दिवस तो लढा चालला. चिमूरच्या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान फार महत्त्वाचे असून, ते नाकारता येत नाही.

रामटेकमधील आंदोलन

देशात ‘चले जाव चळवळ’ सुरू झाली, तेव्हा संघाचे स्वयंसेवक अनेक ठिकाणी त्यामध्ये सहभागी झाले होते. चिमूरप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील आष्टी येथेही ‘चले जाव चळवळी’ने जोर धरला होता. तसेच, नागपूरजवळच्या रामटेक येथे झालेल्या आंदोलनामध्ये, संघाचे स्वयंसेवकही सहभागी झाले होते. रामटेक नगर कार्यवाह रमाकांत केशव उपाख्य, बाळासाहेब देशपांडे यांनी आंदोलनामध्ये उडी घेतली आणि आंदोलन सुरू झाले. बाळासाहेब देशपांडे तेव्हा वकिलीचा व्यवसाय करत होते. हजारोंच्या संख्येने लोक रामटेक तहसील कार्यालयावरचा ब्रिटिश युनियन जॅक काढून, तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी जमले आणि तिरंगा ध्वज फडकवला गेला. पोलिस गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असताना, बाळासाहेब देशपांडे यांनी हातात बंदूक घेतलेल्या पोलिसांच्या कंबरेला विळखा घालून गोळीबार होऊ दिला नाही. ब्रिटिश सरकारने बाळासाहेब देशपांडे यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून, त्यांना तुरुंगात डांबले. तुरुंगात असताना त्यांना विनोबा भावे आणि पंडित रविशंकर शुला यांचा सहवास लाभला. बाळासाहेब देशपांडे यांना फाशीची शिक्षा सुनावली होती पण, पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली.पुढे बाळासाहेब देशपांडे ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक, तर प. शुला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसने पुकारलेल्या स्वतंत्र चळवळीत संघाचे स्वयंसेवक सहभागी होत असत. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नाही, असे म्हणणे चुकीचेच ठरेल.

प्रतिज्ञित स्वयंसेवक शशीधर केतकरांचे बलिदान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिज्ञित स्वयंसेवक शाशिधर केतकर यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन, ‘बलिदान करणार्यांच्या रक्ताशिवाय स्वातंत्र्याचे मंदिर उभे राहत नाही,’ हे वाय खरे करून दाखवले आहे. देशात जेव्हा ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू झाले, तेव्हा देशाच्या विविध भागांत ते आंदोलन पेट घेत होते. तसेच, मुंबईमध्येच ते आंदोलन सुरू झाल्याने, महाराष्ट्रात त्यास विशेष महत्त्व होते. आंदोलन सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला असताना, सप्टेंबर महिन्यात नंदुरबार शहरात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत होता. शाळकरी मुलांनी दि. ९ सप्टेंबर १९४२ रोजी ‘चले जाव आंदोलना’स पाठिंबा व ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी, आंदोलन करून मोर्चा काढला होता. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणा देत, मोर्चा सरकारी कार्यालयाजवळ येताच ब्रिटिश पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी कठोर पावले उचलून, अंदाधुंद लाठीचार्ज केला. शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या मोर्चावर अचानक गोळीबारसुद्धा करण्यात आला. नंदुरबारमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत शिरीषकुमार मेहता, धंपख्लाल वाणी, शाशिधर केतकर यांच्यासह आंदोलनातील इतरही कार्यकर्त्यांना वीरमरण आले. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिज्ञित स्वयंसेवक शाशिधर केतकर यांचा समावेश होता. शाशिधर केतकर १९४२ सालच्या ‘भारत छोडो-चले जाव आंदोलना’त सहभागी एक क्रांतिकारक होते. त्यांचे पूर्ण नाव शाशिधर लक्ष्मण केतकर असून, ते नंदुरबारचे प्रतिज्ञित स्वयंसेवक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात सन्मानाने घेतले जात असून, ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य ज्ञात-अज्ञात युवकांपैकी एक आहेत; ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले. त्यांचे बलिदान युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि त्याग यांची प्रेरणा देणारे ठरते. संघाच्या कार्यपद्धतींमध्ये पद्य हा देशभक्तीचा संस्कार असतो. खालील पद्याची ओळ शाशिधर केतकर यांनी तंतोतंत खरी करून दाखविली

देश हैं पुकारता, पुकारती हैं भारती|
खून से तिलक करो और गोलीयों से आरती॥

बलिदानी स्वयंसेवक देविपद चौधरी व जगपती कुमार

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी, देशाच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. १९४२ सालच्या ‘भारत छोडो’ आंदोलनामध्येसुद्धा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्च्य स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग होता. देशात जेव्हा आंदोलन सुरू झाले, तेव्हा संघ स्वयंसेवकांनी बिहारमधील पाटणा, रामटेक आणि चिमूर कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला. तिरंगा फडकवत असताना, संघ स्वयंसेवकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलून हासत वीरमरणही स्वीकारले. दि. ११ ऑगस्ट १९४२ रोजी बिहारमधील पाटणा शहरात ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू झाले. तेव्हा स्थानिक तरुण युवकांनीही पुढाकार घेऊन आंदोलन केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणा देत, पाटणा शहरातील ब्रिटिश सरकारच्या सचिवालयावर तिरंगा ध्वज फडकवला. चवताळलेल्या ब्रिटिश सरकारने पोलिसांकरवी, आंदोलकांवर अंदाधुंद लाठीचार्ज आणि गोळीबार केला. ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे, सहा युवकांना वीरमरण आले. देविपद चौधरी आणि जगपती कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. १९९७ साली बिहार सरकारने शूर वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, पाटणा सचिवालयजवळच हुतात्मा स्मारकाचे निर्माण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, तत्कालीन क्षेत्र प्रचारक व विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य देशभक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला होता.

आतातरी संघ विरोधाचा करंटेपणा सोडा

स्वातंत्र्यलढ्यातील उपरोक्त तिन्ही घटनांचा विचार केल्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग अधोरेखित होतो. तसेच, संघाच्या स्वयंसेवकांनी असहकार आंदोलन, सायमन कमिशनला विरोध, मिठाचा अर्थात जंगल सत्याग्रह आणि चले जाव चळवळीत मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला होता. यासाठी अनेक स्वयंसेवकांना कारावाससुद्धा झालेला असून, या सर्व घटनांचे पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत. आपण जे काही करतो, ते राष्ट्रासाठी करीत आहोत या उदात्त भावनेने संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या सहभागाचा लेखाजोखा ठेवला नाही. तसेच देश स्वतंत्र झाल्यावर सरकारी सुविधा व पेन्शनसुद्धा नाकारली आहे. परंतु, संघ विरोधकांच्या पाखंडी टोळ्या सतत स्वातंत्र्यलढ्यात संघ आणि संघ स्वयंसेवकांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, थेट स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभागच नव्हता, असा खोटा प्रचार करून समाजाची दिशाभूल करीत असतात. आता ही त्यांची दिशाभूल किंवा खोटा प्रचार थांबवून, आतातरी संघ विरोधाचा करंटेपणा सोडला पाहिजे.

अशोक राणे
९४२३६५८३८५