
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ याचा प्रसार आता सर्वच क्षेत्रामध्ये झाला आहे. एखाद्या विषयातील तज्ज्ञ ते सर्वसामान्य माणसे सारेचजण या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहिनीने भारावून गेले आहेत. पण, एका गोष्टीचे जसे चांगले परिणाम असतात, तसेच वाईटही असतात. ‘एआय’च्या दुष्परिणामांची चर्चा आता जगभर होऊ लागली आहे. याच दुष्परिणाम आणि त्यावरचा सुवर्णमध्य यांचा घेतलेला आढावा...दित्य, एक विचारू का? जयंतरावांनी सुरुवात केली, हे सगळं ‘एआय’, ‘चॅटजीपीटी’ छान वाटतं. पण, हल्ली कॉलेजातली मुलं स्वतः विचारच करत नाहीत. असं वाटतंय की, त्यांच्या डोक्याचा वापर कमी होतो आहे. मी कालच ‘चॅटजीपीटी’ वापरून आमच्या मंडळात सादरीकरणासाठी एक छानसे भाषण लिहिले. सुरुवातीला मला खूप मस्त वाटले. पण, त्यातून मला काहीच समाधान न मिळाल्याचे जाणवले. माझ्या एका मित्राने मला माझ्या भाषणातील मुद्द्यावर एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर देणेही मला अवघड गेले.
आदित्य हसला. तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे आणि याच विषयावर नुकताच एक मोठा आंतरराष्ट्रीय अभ्यासही प्रकाशित झाला आहे ,‘र्धेीअॅ इअॅरळप ेप उहरींॠझढ’ हा अमेरिकेतील ‘एमआयटी’ने प्रकाशित केलेला अभ्यास आणि दुसरा ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि उरअॅपशसळश चशश्रश्रेप णपर्ळींशीीळीूं ने केलेला अभ्यास. दोन्ही अभ्यासांनी दाखवून दिलं की, ‘जनरेटिव्ह एआय’चा सतत वापर केल्यामुळे माणसाची चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलता कमी होण्याचा धोका असतो. असं का होतं? असे मंगलकाकूंनी विचारले.
जेव्हा आपण विचार करणं थांबवतो...
पहिलं लक्षात घ्यायला हवं की, ‘क्रिटिकल थिंकिग’ म्हणजे चिकित्सक विचार करण्याची प्रक्रिया. ज्यामध्ये आपण माहिती गोळा करतो, तिचं विश्लेषण करतो, प्रश्न उपस्थित करतो आणि स्वतःचे निष्कर्षही काढतो. हा मेंदूचा व्यायाम असतो. पण, जर हे सगळं काम ‘एआय’ करू लागला, तर आपला मेंदू ‘शॉर्टकट’ घेऊ लागतो, असे आदित्यने स्पष्ट केले.
आता आपण ‘एमआयटी’ने केलेल्या संशोधनाबद्दल बोलू. या अभ्यासात त्यांनी ५४ लोकांना तीन गटांत विभागले. हे सर्व लोक उच्च शिक्षित होते. त्यातील निम्म्याहून अधिक लोक ‘पीएच.डी’ किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. ‘एआय’च्या वापराचा तार्किक विचार करण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करणे हाच या प्रयोगाचा हेतू होता. त्यासाठी अमेरिकेत घेतल्या जाणार्या ‘सॅट’ या परीक्षेत विचारले जाणारे निबंध या लोकांना लिहायला दिले गेले. या तीन गटांमधील एका गटाला फक्त स्वतःची विचारक्षमता वापरून निबंध लिहायला सांगितलं, दुसर्या गटाला ‘गूगल सर्च इंजिन’ वापरायला दिलं, तर तिसर्या गटाने ‘चॅटजीपीटी’ वापरलं. अशा प्रकारे थोड्या थोड्या कालावधीनंतर या लोकांना तीन निबंध लिहायला सांगितले गेले. काही कालावधीनंतर ज्या लोकांनी स्वतःच्या मनाने निबंध लिहिले होते, त्यांना ‘चॅटजीपीटी’ वापरून आणि ज्या लोकांनी चॅटजीपीटी वापरले होते, त्यांना स्वतःच्या मनाने चौथा निबंध लिहायला सांगण्यात आले. ही प्रक्रिया चालू असताना, ‘ईईजी’ मशीनने त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता मोजली आणि त्यांचे सर्व निबंध तज्ज्ञ लोकांनी तपासले. या सर्व प्रयोगाचे अनुमान डोळे उघडणारे होते.
ज्यांनी स्वतः निबंध लिहिला, त्यांचा मेंदू सर्वाधिक सक्रिय होता. या गटातील लोकांच्या मेंदूमधील विविध भागांमधील प्रवाह सर्वाधिक होते. यातून मेंदूची सक्रियता दिसून आली. पण, जे लोक ‘चॅटजीपीटी’ वापरत होते, त्यांचा मेंदू तब्बल ५५ टक्के कमी सक्रिय होता, तर गूगल वापरून निबंध लिहिणार्यांचा मेंदू ३०-३५ टक्के कमी सक्रिय होता. परीक्षकांना ‘चॅटजीपीटी’ वापरून लिहिलेल्या निबंधांमध्ये वैविध्याचा अभाव आढळून आला. या निबंधांमध्ये वाक्यातील शब्दांची संख्या, शब्दांची पुनरावृत्ती, लेखनशैली यामुळे तोचतोचपणा आढळला. ‘चॅटजीपीटी’ वापरून ज्यांनी निबंध लिहिले, त्या लोकांना आपल्या निबंधांमधील उदाहरणे आणि वाक्ये नंतर सांगता आली नाहीत.
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ज्या लोकांनी पहिल्या तीन प्रयोगांमध्ये स्वतःच्या मनाने निबंध लिहिला आणि चौथ्या प्रयोगात ‘चॅटजीपीटी’ वापरून निबंध लिहिला, त्या लोकांचा मेंदू ‘चॅटजीपीटी’ वापरतानासुद्धा अधिक सक्रिय होता. आता यातून काय सिद्ध होत? पाहिलं म्हणजे स्वतःची बुद्धी वापरून काम करण्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कामे करत असताना मेंदू कमी सक्रिय राहतो. दुसरं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्याने केलेल्या कामात सर्जनशीलतेचा अभाव असू शकतो. तिसरा मुद्दा असा की, आधीच्या टप्प्यात स्वतःची बुद्धी वापरून मग कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली, तर मेंदूच्या कार्यक्षमतेवर जास्त परिणाम होत नाही. आपण वाचलेले गुंतागुंतीचे संशोधन आदित्यने सोप्या भाषेत आजी आजोबांना समजावून सांगितले.
माहिती मिळवण्यापेक्षा माहितीचं विश्लेषण महत्त्वाचं...
सामान्य कामांमध्ये जसं की एखाद्या गोष्टीबद्दल माहिती मिळवण्यासाठी ‘एआय’ फार उपयोगी ठरतो. पण, यामुळे माणूस माहिती मिळवण्याच्या बरोबरच माहिती पडताळण्याचा भागच विसरतो. म्हणजे? गणपतरावांनी विचारलं. म्हणजे तुम्ही काहीतरी विचारलंत आणि ‘चॅटजीपीटी’ने उत्तर दिलं. जर तुम्ही ते तसंच स्वीकारलंत, तपासलच नाहीत, तर विचार करण्याची क्रिया झालीच नाही. अभ्यासात हेही दिसून आलं की, जेव्हा वापरकर्त्यांना ‘एआय’वर खूप विश्वास वाटतो, तेव्हा ते कमी विचार करतात. पण, जेव्हा स्वतःच्या कौशल्यावर विश्वास असतो, तेव्हा माणूस समोर आलेली माहिती तपासतो, विश्लेषण करतो आणि मगच उत्तर स्वीकारतो.
स्मरणशक्ती आणि आत्मविश्वासाचा ऱ्हास
या अभ्यासात आणखी एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली की, ज्या लोकांनी ‘चॅटजीपीटी’ वापरून निबंध लिहिला, त्यांना नंतर स्वतःच्या निबंधातील वाक्य आठवत नव्हती. म्हणजेच, ‘एआय’ने तयार केलेल्या मजकुरामध्ये स्वतःची मानसिक गुंतवणूक न झाल्यामुळे दीर्घकालीन स्मरणशक्ती विकसित होत नव्हती. हे तर फारच गंभीर आहे! जयंतराव उद्गारले.
विचारांची जबाबदारी कोणाची?जरा विचार करा आदित्य म्हणाला, पूर्वी आपण स्वतः एखाद्या गोष्टीवर विचार करत होतो, ज्ञान शोधत होतो, तुलना करत होतो, निर्णय घेत होतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कामे करताना, आपण प्रश्न विचारतो आणि उत्तर मिळवतो. हे जसं सोयीचं आहे, तसंच ते धोकादायकही आहे. कारण विचार करणं ही सवय असते, ती रोज वापरली तरच ती टिकते. ‘एआय’च्या अतिवापराने आपण ही सवयच हरवून बसतो. पुढे जाऊन आपल्याला जेव्हा खरोखर गंभीर निर्णय घ्यावे लागतील, जिथे ‘एआय’ अपुरा पडेल आणि तिथेच आपण गोंधळलेले असू शकतो.
सुवर्णमध्य गेले कित्येक आठवडे आपण ‘एआय’च्या फायद्यांबद्दल आणि उपयोगांबद्दल बोललो. ‘एआय’ मानवतेसाठी एक वरदान नक्कीच आहे. शिक्षण, कृषी, संरक्षण, बँकिंग आणि इतर क्षेत्रात ‘एआय’चे प्रचंड फायदे आहेत. परंतु, ‘एआय’चा वापर करताना काही पथ्य पाळावी लागतील. आपण आता चर्चा केली तो प्रयोग म्हणजे, अशी पथ्य पाळण्याची आठवण करण्याबद्दल काढलेला एक चिमटच आहे. मग कसा साधता येईल ‘एआय’चा वापर, त्याचे फायदे आणि होणारे नुकसान याचा सुवर्णमध्य?
‘एआय’चा वापर साधी आणि नेहेमी करावी लागणारी कामे करायला (जसे एखाद्या अकाऊंटंटने अकाऊंटिंग सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणे) किंवा मानवी क्षमतेबाहेरची कामे करायला (जसे माणसाच्या जीन्सचा अभ्यास करून कॅन्सरची शक्यता वर्तवणे) करू शकतो. पण, हे करताना आपली स्मरणशक्ती, विश्लेषण कौशल्य आणि निर्णय क्षमतांचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. यामुळे ‘एआय’ने केलेल्या कामाची पडताळणी होते आणि आपल्या बौद्धिक क्षमतेचा र्हासही होत नाही. आपण मगाशी चर्चा केलेल्या प्रयोगाप्रमाणे कोणत्याही शिक्षण प्रक्रियेत प्रथम बुद्धीचा वापर करून आणि ‘एआय’चा वापर न करता, नवीन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. एकदा बौद्धिक कौशल्याची वाढ झाली की, मग ‘एआय’चा वापर केल्यास ‘एआय’चा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येतो.
नवीन कौशल्ये आत्मसात करताना ‘एआय’चा वापर कमीत कमी करणे, वारंवार बौद्धिक कौशल्याचा वापर करून ‘एआय’वर नियंत्रण ठेवणे, हे विविध क्षेत्रात आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या आर्थिक तज्ज्ञाने ‘एआय’ने केलेले अर्थव्यवस्थेचे भाकित स्वतः तपासून पाहिले पाहिजे, एखादा लेखक जर ‘एआय’चा वापर करत असेल, तर वारंवार त्याने स्वतः लिहिण्याचा सराव ठेवला पाहिजे. जरी ‘एआय’ने डॉक्टरांचे काम सोपे केले, तरी त्यांनी ‘एआय’चा वापर न करता निदान करण्याची सवय ठेवली पाहिजे. शेवटी ‘एआय’ हे फक्त एक साधन आहे. आपला मेंदू हीच खरी ताकद आहे. त्या ताकदीची नियमित काळजी घ्यायला हवी, आदित्य म्हणाला.
जयंतराव हसले. म्हणजे काय ‘एआय’चा वापर करा, पण विचार करणं थांबवू नका.
डॉ. कुलदीप देशपांडे
(डॉ. कुलदीप देशपांडे हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
९९२३४०२००१