रविंद्रदादा चव्हाण : गौरव कार्यकर्त्याचा, विश्वास नेतृत्वाचा!

    05-Jul-2025
Total Views |

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर हा अभिनंदनपर लेख लिहिताना अत्यंत आनंद होत आहे. ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर भाजपमधून अनेक चांगले, संवेदनशील आणि तितकेच कार्यक्षम नेते दिले. त्यामध्ये रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, डॉ. अशोकराव मोडक अशी काही नावे सहज डोळ्यासमोर येतात. या सर्वांनी पक्षविस्तार केला, पक्षाची पाळेमुळे समाजामध्ये घट्ट केली आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा समाजातील सर्व स्तरांमध्ये रुजवली. परिणामी, अनेक लोक पक्षाशी जोडले गेले. याच पंक्तीमध्ये आता डोंबिवलीचे विद्यमान आमदार आणि सर्वांचे लाडके ‘दादा’ म्हणून लोकप्रिय असलेले रविंद्र चव्हाण यांचे नावही जोडले गेले आहे. त्यांची प्रदेशाध्यपदी निवड ही पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्याचा गौरव करणारी आणि त्यांच्या संघटनकौशल्यावरील नेतृत्वाचा विश्वास अधोरेखित करणारी आहे. यानिमित्ताने रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहताना जे दिसते ते असे...

वर्ष २००२ मध्ये भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदापासून सुरू झालेल्या रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रवासाचे काही टप्पे ठळकपणे नजरेस येतात, ज्यामध्ये २००५ साली कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये नगरसेवक, २००७ साली कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापती, त्यानंतर २००९ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आलेले पहिलेच आमदार म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाने आज विजयी चौकार मारलेला आहे. याच काळात २०१६ ते २०२० सालापर्यंत भाजप कल्याण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत निरपेक्षपणे पेलली. कदाचित या कामाची दखल म्हणूनच की काय, देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात रविंद्र चव्हाण यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रवेश झाला आणि तेव्हादेखील रायगड, पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्रिपददेखील रविंद्र यांनी चांगल्याप्रकारे सांभाळले.त्यानंतरदेखील बंदरे, माहिती-तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली, तर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारीदेखील अत्यंत समर्थपणे निभावली आहे. या काळात रविंद्र चव्हाण यांच्याकडून साकार झालेली अनेक कामे आहेत, त्यांचा उल्लेख करायचा असेल, तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.

हा सर्व आढावा घेत असताना त्यांचे मुखत्वे दिसून येणारे गुण, हे संघटन कौशल्य, संवाद कौशल्य, आपले पद मानमरातब बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकांशी समरस होऊन असलेला संपर्क, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे पूर्ण ऐकून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग काढणे. या सर्व गोष्टी वाटतात, तितया सोप्या नक्कीच नाहीत.

एखादी व्यक्ती अशा गुणांच्या जोरावर जेव्हा राजकारणाच्या क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेते, तेव्हा त्यामागे समाजाचेदेखील तेवढेच पाठबळ लाभलेले असते. राजकारणात जसे रविंद्र चव्हाण आज आघाडीवर आहेत, तसेच सामाजिक क्षेत्रातदेखील असेच उत्तम काम डोंबिवली शहर परिसरांत त्यांच्या संकल्पनेतून ‘डोंबिवलीकर प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविले जात आहे, ज्यामध्ये ‘डोंबिवलीकर प्रतिष्ठान,’ या सामाजिक संस्थेअंतर्गत रविंद्र चव्हाण संपादक असलेले, ‘डोंबिवलीकर’ मासिक जे अत्यंत उत्तम विषय, उत्तम मांडणी, उत्तम छपाईसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या मासिकासाठी लेखन केले आहे. त्याशिवाय ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार’, ‘डोंबिवलीकर सुपर सिंगर पुरस्कार’, ‘डोंबिवलीकर स्टुडिओ’, ‘गुण गौरव सोहळा’, ‘बुक बँक’, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, ‘डोंबिवलीकर दिनदर्शिका’ असे अनेक उपक्रम आहेत. त्याशिवाय लहान मुलांसाठी ‘किलबिल फेस्टिवल’, अन्य वयोगटासाठी ‘रोझ फेस्टिवल’, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री असे विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी रविंद्र चव्हाण कायमच पुढाकार घेत असतात.

हे सर्व उपक्रम राबविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाशी रविंद्र चव्हाण यांची नाळ अजूनही तितकेट जुळलेली आहे, तिथेदेखील केवळ गावासाठी नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठीदेखील ते सक्रिय आहेत. अगदी उदाहरणच द्यायचे झाले, तर गावातील काही कातकरी कुटुंबाच्या घराच्या जागेचा प्रश्न शासनाकडे तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होता, तो सुटावा आणि या कातकरी मंडळींना हक्काचे घर मिळावे, म्हणून त्यांनी स्वतःची जमीनच संबंधित कातकरी कुटुंबाना दान केली. आजकाल इतका त्याग कोण करतो? हा रविंद्र चव्हाण यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

आजचे राजकारण वेळोवेळी बदलणारे आणि त्याचा पोतही हा फारच बदलता आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानाचादेखील मोठा वाटा आहे. तंत्रज्ञानाची कास धरणे हे देखील तितकेच आवश्यक झाले आहे. हे सर्व ओळखून रविंद्र चव्हाण यांनीदेखील स्वतःला आधुनिक तंत्रज्ञान प्रसारमाध्यमांशी योग्य रीतीने जोडून घेतले.

कोणतेही ‘संघटन’ मग ते राजकीय असो वा सामाजिक, विविध ध्येय-धोरणे, विचार हे लोकांमध्ये राबविणे, लोकसंग्रह करणे हे महत्त्वाचे काम असते. त्यासाठी जनसंपर्क हा उत्तमच असावा लागतो. त्यासाठी ‘डोयावर बर्फ, पायाला भिंगरी आणि तोंडात साखर’ हे मूळ तत्त्व पक्के असावे लागते.

रा. स्व. संघाचे यंदा शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने संघ स्थापनेवेळी असणारे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या पुढील काही ओळी सहज आठवतात, "योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे सर्व क्षेत्रांना व्यापणारे व्हायला हवेत. भौगोलिकदृष्ट्या सगळ्या ठिकाणी तसेच राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रांना व्यापणारे व विद्यार्थी कामगार, सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच असामान्यांनाही सहभाग घेता येईल, असे प्रयत्न असावेत, मग यश हे हमखास मिळते.” मोरोपंत पिंगळे यांची ही वाये रविंद्र चव्हाण यांना अत्यंत समर्पक आहेत.
"ज्या पक्षाने मला मोठे केले, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची आपली तयारी आहे. भाजप हीच माझी ओळख आहे,” असे रविंद्र चव्हाण कायमच कृतज्ञतेने मानतात. याच गुणांच्या बळावर ते वरिष्ठ नेतृत्वाने, अत्यंत विश्वासाने सोपवलेली ‘भाजप प्रदेशाध्यक्ष’ या पदाची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडतील, अशी खात्री आहे. त्यासाठी रविंद्र चव्हाण यांना मनापासून शुभेच्छा!

शैलेश निपुणगे
९९३००११२७३