कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

    06-Jul-2025   
Total Views |

 विरार : आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला होता. पालक व ग्रामस्थांनीही या सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला.

यानंतर "आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी परंपरा" या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते ह.भ.प. सौ. कृपालीताई महाराज पाटील यांनी आषाढी एकादशीचे अध्यात्मिक व सामाजिक महत्व विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, अनुशासन आणि संस्कारांची बीजे पेरली गेली. या उत्सवाचा एक वेगळाच पैलू म्हणजे 'वृक्ष दिंडी व वृक्षारोपण'. विद्यार्थ्यांनी हरित वेशभूषेत वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. त्यानंतर विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून ‘एक झाड- एक शपथ’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ह्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणाची जबाबदारी यांचा सुरेख मिलाफ घडवून आणला. विद्यालयाचे प्राचार्य तथा रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी ह्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.