कुटुंब प्रबोधन : वंदनीय मावशींचे विचार आजही कालातित

    06-Jul-2025
Total Views |

‘राष्ट्र सेविका समिति’च्या संस्थापिका आणि आद्य प्रमुख संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांची आज जयंती. त्यानिमित्ताने कुटुंब प्रबोधनाविषयी त्यांच्या विचारांचा घेतलेला आढावा...


वंदनीय मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर यांचे व्यक्तिमत्त्व हे ‘वज्रादपि कठोर आणि मृदुनि कुसुमादपि’ या उक्तीप्रमाणेच. त्या तत्त्व व शिस्तपालन यांबाबत अत्यंत कठोर, तर आपल्या सेविकांबाबत मात्र अत्यंत हळूवार.

स्वातंत्र्यपूर्व काळातील आजूबाजूच्या समाजाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर स्त्रियांनी संघटित होऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यातही मदत करणे गरजेचे आहे, असा विचार वंदनीय मावशींच्या मनात येत होता. या विचाराला फक्त मनात न ठेवता, त्यांनी ‘राष्ट्र सेविका समिति’ ही महिलांची संघटना स्थापन करून, त्याला मूर्त रूप दिले. हे मूर्त रूप देण्यापूर्वी मात्र त्यांनी भारतीय समाजाचा, इतिहासाचा अभ्यास केला. अनेकांशी चर्चा केल्यानंतर 1936 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर या संघटनेची स्थापना केली.

स्त्री ही समाजाची पुरुषाइतकीच महत्त्वाची घटक असल्यामुळे, स्त्री राष्ट्राची आधारशक्ती आहे. तिच्यात राष्ट्राला उन्नतीप्रत नेण्याचे सामर्थ्य आहे. मावशींना हा स्त्रीशक्तीचा साक्षात्कार झाला आणि त्यातूनच ‘राष्ट्र सेविका समिति’चा जन्म झाला. स्त्रियांना पर्यायाने भावी पिढीला सुसंघटित, सुसंस्कारित करण्याचे कार्य अविरत चालू आहे. 1936 ते 2026 जवळजवळ नऊ दशके पूर्णत्वाकडे चाललेल्या या संघटनेच्या संस्थापिकेने त्यावेळी जो विचार केला, तो आजही प्रगतशील भारतीय समाजासाठी आवश्यक आहे. मावशींनी सांगितलेल्या अनेक विचारधनांपैकी, कुटुंबाशी संबंधित विचार हे अत्यंत मोलाचे व आजही आचरणीय असेच.

कुटुंबाला भारतातील समाजाचे मूलभूत एकक मानले जाते. कुटुंब म्हणजे संस्कारांची शाळा. घरातच पहिले शिक्षण मिळते. मावशींनी मातेला गुरुस्थानी मानून, स्त्रीच्या भूमिकेचे कुटुंबातील महत्त्वच अधोरेखित केले. स्त्री ही केवळ गृहिणी नाही, तर ती एकाच वेळी माता, कन्या, बहीण व पत्नी या विविध रूपांनी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. तिची भूमिका कुटुंबाच्या उन्नतीसाठी पर्यायाने राष्ट्राच्या उन्नतीसाठी खूप खूप महत्त्वाची आहे.

प्रत्येक मुलाची ‘कुटुंब’ ही पहिली शाळाच असते व पालक पहिले शिक्षक! पालकांनी आपल्या मुलांबरोबर स्नेह, सकस संवाद ठेवला पाहिजे. पालक जर सक्षम असतील, तर राष्ट्र बांधणी, राष्ट्रहित व राष्ट्रकार्य करण्याचे बाळकडू मुलांना कुटुंबातच मिळते. त्यामुळे भावी पिढी आपोआपच घरातूनच तयार व्हायला सुरुवातही होते.

कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणे नसते, तर एकत्र जगणेही असते. त्यासाठी एकमेकांशी सकारात्मक संवाद असणे आवश्यक आहे. या संवादांमध्ये विचारांची देवाणघेवाण, एकमेकांचे विचार ऐकणे, आदर करणे असेल तर कुटुंबात समाधानकारक वातावरण असते. अशा समाधानकारक कुटुंबामुळेच समाज व पर्यायाने राष्ट्र उभारणीला मदत होते.

कुटुंबाचा आत्मा असलेली माता कशी असावी? हे वंदनीय मावशींच्या चरित्रातील पुढील काही प्रसंगांतून आपल्याला सांगता येते.

कित्येक माता दुखापत होईल या भीतीने, त्यांच्या मुलांना खेळण्यापासून परावृत्त करीत असतात. पण, मावशींनी त्यांच्या मुलांना कधीच असे परावृत्त केले नाही. मार्‍यामार्‍या, पडणे व लागणे हे प्रकार तर नित्यच घडतात पण, म्हणून त्यांनी मुलांना कधीच खेळण्यापासून मज्जाव केला नाही. कारण, ‘पडे तो बडे’ असे मावशींचे म्हणणे होते.

मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे, मुलांना त्यांची चूक दाखवून देणे, सत्य परिस्थिती असेल तर ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहणे, हे घरातील मातेने केलेच पाहिजे.

यासाठी एक उदाहरण आहे ज्यामध्ये मावशींनी आपल्या मुलांना त्यांची चूक आहे म्हणून दंड भरा पण, माफी मागायची नाही असे एका प्रसंगात सांगितलेले दिसते. एकदा मावशींचा मुलगा नववीच्या वर्गात असताना, त्यांच्या वर्गातील अब्दुल नावाचा एक मग्रूर आणि आक्रमक विद्यार्थी जो सर्वांना त्रास द्यायचा. शिक्षकांकडे तक्रारी करूनही त्याचा इतरांना होणारा त्रास काही कमी झाला नाही. म्हणून एक दिवस खेळाच्या तासाला मावशींच्या मुलाने व इतर दोघांनी मिळून त्याला मारले. या मारामारीमध्ये त्या मुलाचे कपडे फाटले, घड्याळही फुटले. त्यावेळी अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या मुख्याध्यापकांकडे त्याने तक्रार केली. जुजबी चौकशी केल्यानंतर प्रत्येकाला तीन रुपये दंड आणि त्या विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागेपर्यंत वर्गात न बसण्याची शिक्षा झाली. हा प्रकार मावशींना समजला त्यावेळी मावशींनी हा प्रसंग नीट समजून घेतला. तसेच त्या मुलांना म्हणाल्या की, “शाळेच्या कक्षेत तुम्ही असे करायला नको होते. तुम्ही त्याला मारले ही तुमची चूकच आहे. दंड देण्याची शिक्षा आपण पूर्ण करू पण, माफी मात्र अजिबात मागायची नाही.” प्रथम त्यांनी इतर मुलांच्या पालकांशी संवाद साधून त्यांची भूमिका समजून घेतली. पण, त्यांची कोणतीच भूमिका नव्हती. त्यामुळे मावशीं स्वतः मुख्याध्यापकांना भेटल्या. माफीची अट का मंजूर नाही, हे मावशीने त्यांना सांगितले पण, मुख्याध्यापक ऐकायलाच तयार नव्हते. मावशीही “माफीची शिक्षा मान्य नाही दंड आम्ही भरू, आपल्या या भूमिकेवर ठाम राहिल्या. जर हे मान्य नसेल, तर आम्ही आमच्या पाल्यांची शाळा बदलून दुसरीकडे घालू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर मात्र मुख्याध्यापकांना आपल्या शिक्षेचा पुनर्विचार करावा लागला व त्यांनी अटही मागे घेतली. मावशी ज्याप्रमाणे आपल्या मुलांच्या पाठीमागे त्या ठामपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचे बाळकडू मुलांना आईकडून मिळाले. असेच, आजच्या काळातील मातांनी वागले पाहिजे.

शाळेव्यतिरिक्त आपली मुले काय काय करतात? याकडेही मावशींचे बारकाईने लक्ष असे. जेव्हा मावशींच्या लक्षात आले की, आपली मुले संघाच्या शाखेत जातात व संघामध्ये मुलांवर उत्तम संस्कार घडत आहेत, तेव्हा त्यांची काळजी दूर झाली. म्हणूनच सुरुवातीला एखाद्या दिवशी कोणी संघात गेला नाही हे त्यांना कळले, तर ते संघ शिक्षकापूर्वी त्या स्वतःच आपल्या मुलाला जाब विचारत. अशा प्रकारे ज्या ठिकाणी चांगले संस्कार होतात, त्या ठिकाणी आपली मुलं गेली पाहिजेत, हा आग्रह पालकांचा असावा.

संघाच्या शाखेत जाऊन आपली मुलं काय काय शिकतात? याकडेही मावशींचे अत्यंत बारकाईने निरीक्षण असे. घरी आल्यानंतर त्या त्यांच्याशी संवाद साधून काय आज नवीन शिकले, ते विचारत आणि आवश्यक गोष्टी त्यांच्याकडूनही शिकत. आज हाच संवाद कुठे तरी थांबला आहे, तो सुरू व्हावा. फक्त कुटुंबातच नाही, तर समितिची शाखा हासुद्धा मावशींसाठी एक परिवारच होता. समिति कार्यवाढीच्या दृष्टीने प्रवास करताना, त्या सेविकांशी संवाद साधत.

असेच एकदा संवाद साधत असताना एक सेविका त्यांना म्हणाली, “आमची शाखा त्या शाखेसारखी छान नाही. त्यामुळे कोणी येत नाही, तर काय करता येईल.” त्यावेळी मावशी म्हणाल्या की, “आपल्या शाखेला आपले मूल मानावे आणि आपण जसे आपले मूल असेल, तसे त्याला आपण स्वीकारतो आणि घडवत जातो. अगदी तसेच आपली शाखा स्वीकारून, तिला घडवत जावे. विचार करून बघ, तुमची शाखा खूप छान चालेल.”

वंदनीय मावशींच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आहेत, ज्या प्रसंगांमध्ये कुटुंबाचा आत्मा असलेली गृहिणी म्हणजेच माता तिने कसे असले पाहिजे? तिने कसे वागले पाहिजे? हे त्या सांगतात. जसजसे समितिचे काम वाढत गेले, तसतसे समितिचे काम, कौटुंबिक जबाबदार्‍या मावशींनी हसतमुखाने पार पाडल्या.स्त्रीशक्तीच्या जागृतीसाठी आणि संस्कारक्षम कुटुंब व्यवस्थेसाठी, मावशींनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांचे विचार कुटुंब हाच राष्ट्राचा पाया आहे, या तत्त्वाभोवती फिरत राहिले आणि त्याप्रमाणेच त्याही कार्य करत राहिल्या, सेविकांना घडवत राहिल्या. आज वेगवान बदलणार्‍या जीवनशैलीतही कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल, तर त्यांचे हे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात.
सध्याची ताणतणाव असलेली परिस्थिती, विभक्त कुटुंबपद्धती, मोबाईल तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, त्यात वाहत चाललेली पिढी यांना जर एकत्रित बांधून ठेवायचे असेल, तर घरातील गृहिणीने म्हणजेच मातेने एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली पाहिजे.मावशींचे विचार म्हणजे केवळ एक तात्विक चर्चा नाही, तर ते व्यवहारात उतरवण्यासारखे मार्गदर्शक आहेत. शक्ती, संस्कार आणि समाज भान या यावर आधारित हे विचार आजही तितकेच प्रभावी वाटतात.

आजची स्त्री शिक्षणामुळे थोडीशी स्वावलंबी बनली आहे. आजच्या सुधारलेल्या, हक्काची जाणीव झालेल्या, तेजस्वी जीवन जगू पाहणार्‍या सुशिक्षित स्त्रीला मावशींचे विनयी, नम्र, संस्कारी, तेवते जीवनचरित्र हा फार मोठा आदर्श आहे. स्त्री एक प्रेरक शक्ती आहे. ही शक्ती चैतन्य युक्त आहे, जी व्यक्तीच्या रूपात कुटुंबाची आणि कुटुंबाच्या रूपात राष्ट्राची चैतन्य शक्ती होते, अशा या शक्तीला शत शत प्रणाम!

स्नेहा आठवले
(लेखिका राष्ट्र सेविका समितिच्या गोवा विभाग बौद्धिक प्रमुख आहेत.)