बिबट्या हा प्राणी आता माणसाच्या आसपास वावरणार्या प्राण्यांच्या यादीत सामील झाला आहे. बर्याच वेळा त्याचा माणसाशी अपघाताने संबंध येतो आणि त्यातूनच मानव-बिबट्या संघर्ष सुरू होतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येकाची स्वतःच्या मालकीची शेत किंवा घर विहीर वा आड असतोच. प्रत्येक गावात ठरावीक अंतरावर अशा प्रकारे विहीर किंवा आड पाहायला मिळतात. या विहिरींवरती काही ठिकाणी शेडनेट किंवा जाळीच्या आधारे विहिरीचा वरचा काठ बंदिस्त केला जातो.
मात्र, सर्वच विहिरी अशा बंदिस्त नसतात. जास्तीत जास्त विहिरी या उघड्या आणि जमिनीच्यावर कठडा नसणार्या आहेत. त्यामुळे अशा विहिरींमध्ये वन्यजीव पडण्याच्या घटना रत्नागिरी वनपरिक्षेत्रामध्ये सतत घडत असतात. गेल्या वर्षभरात रत्नागिरी वनपरिक्षेत्रात बिबट्या विहिरीत पडण्याच्या १५ घटना घडल्या असून, त्यातून सुखरूप बाहेर काढलेल्या बिबट्यांची संख्या १२ इतकी आहे. त्याचबरोबर गवे, रानडुक्कर, साळींदर, खवले मांजर यांसारखे प्राणीदेखील अशा विहिरीमध्ये पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. वन्यप्राणी अन्नाच्या शोधात असताना, शारीरिक दुखापतीमुळे, आजारपणामुळे किंवा अपघाताने विहिरींमध्ये पडतात. अशा घटना घडू नये, म्हणून विहिरींच्या कठड्यांची उंची वाढवून, त्यावरती भक्कम असे सुरक्षित झाकण असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘रोजगार हमी योजना’ किंवा कृषी तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत काही ठरावीक योजनेचा वापर करून, अशा विहिरींची कामे करणे गरजेचे आहे.
प्रकाश सुतार
वनपरिक्षेत्र अधिकारी, रत्नागिरी